Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडधनंजय मुंडेंच्या कामाचा अभिमान -सुप्रिया सुळे, कायमस्वरूपी कर्णबधिर बांधवांच्या कानात आवाज ऐकू...

धनंजय मुंडेंच्या कामाचा अभिमान -सुप्रिया सुळे, कायमस्वरूपी कर्णबधिर बांधवांच्या कानात आवाज ऐकू येणे याचे समाधान फार मोठे – धनंजय मुंडेपरळीत ५८५ कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण
परळी (रिपोर्टर):-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली असून, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचे मत खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, बीड जिल्हा आरोग्य विभाग, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ५८५ गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे २५ हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आले, या कार्यक्रमात खा. सुप्रियाताई सुळे ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. जन्मजात कर्णबधिर असलेल्या किंवा काही कारणांनी श्रवणशक्ती गमावलेल्या व्यक्तीच्या कानात जेव्हा आपल्या प्रयत्नातून आवाज ऐकू येतो, त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा श्रेष्ठ ठरते, असे मत यावेळी सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

235418464 548580643152886 4309420733833906717 n


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्वीकारल्या-पासून खा. शरदचंद्रजी पवार, खा. सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यातील वंचित, दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ऊसतोड कामगारांचे महामंडळ असेल किंवा देशातील तृतीयपंथीयांचे पहिले महामंडळ असेल असे अनेक नवनवीन उपक्रम व योजना समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केल्या असल्याचा आनंद आहे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.


लातूर येथे सुरू केलेल्या ऑटिजम सेंटरच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ऑटिजम सेंटर उभारण्यात येणार असून यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे वितरित करून त्यांचे जीवन सुकर करण्याचा उपक्रम संबंध राज्यात सक्रिय करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक पावले उचलण्यात येतील असेही यावेळी ना. मुंडे म्हणाले. या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संचालक विजय कान्हेकर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, दत्ता आबा पाटील, जि. प. गटनेते अजय मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवाजी सिरसाट, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, या कार्यक्रमाचे कार्यवाहक डॉ. संतोष मुंडे, राजाभाऊ पौळ, माऊली गडदे, तुळशीराम पवार, प्रा.विनोद जगतकर, वैजनाथ बागवाले, अनंत इंगळे, अय्युब भाई, रमेश भोयटे, जयपाल लाहोटी, सय्यद सिराज यांसह आदी उपस्थित होते.

धनु भाऊंच्या चेहर्‍यावरचा आनंद खूप काही सांगून गेला – खा. सुप्रियाताई
दरम्यान या कार्यक्रमात पूर्व नोंदणी व तपासणी केलेल्या ५८५ कर्णबधीर दिव्यांगांना श्रवण यंत्र तज्ञ डॉक्टरांकडून बसवण्यात येत आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मशीन बसवलेल्या एका ताईला, ताई ऐकू येतंय का? असे विचारताच त्या महिलेने मोठ्या आवाजात ’हो भाऊ!’ असे उत्तर दिले, यावेळी हा कार्यक्रम खा. सुप्रियाताई सुळे लाईव्ह पाहत होत्या. खा. सुप्रियाताई सुळे यांनी याचा आपल्या मनोगतात आवर्जून उल्लेख केला, आमचे धनु भाऊ अत्यंत संवेदनशील नेतृत्व आहेत, त्या दिव्यांग व्यक्तीने हो, भाऊ आवाज येतोय म्हणून जेव्हा उत्तर दिले, तेव्हा धनु भाऊंच्या चेहर्‍यावरील आनंद केवळ केलेल्या कामाचे समाधान नाही तर खूप काही सांगून गेला!’ असे म्हणत खा. सुप्रियाताई सुळे यांनी ना. मुंडेंच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संचालक डॉ. विजय कान्हेकर यांनी केले. तर कार्यक्रमाची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा या वितरण कार्यक्रमाचे कार्यवाहक डॉ. संतोष मुंडे यांनी उपस्थितांना दिली आणि गोविंद महाराज केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Most Popular

error: Content is protected !!