Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedविजया दशमीच्या मुहुर्तावर खर्डा किल्ल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा -आ. रोहीत...

विजया दशमीच्या मुहुर्तावर खर्डा किल्ल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा -आ. रोहीत पवार


खर्डा (डॉ. महेश गोलेकर) मराठा विजयाचा प्रतिक असणार्‍या ऐतिहासिक खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वात उंच ७४ मिटरचा भगवा ध्वज १५ ऑक्टोबर दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर फडकविण्यात येईल, अशी घोषणा कर्जत-जामखेडचे आ. रोहीत पवार यांनी केली आहे.
सन १७९५ ला याच किल्ल्यावर मराठ्यांनी निजामाविरुद्ध शेवटचा मोठा विजय मिळवला. मराठ्यांच्या या पराक्रमाचा साक्षीदार असणार्‍या ऐतिहासिक भोईकोट किल्ल्याला या निमित्ताने नवीन ओळख मिळणार आहे. या संबंधी घोषणा करताना आ. रोहीत पवार यांनी हा ध्वज शौर्य, त्याग, पराक्रम, एकतेची गाथा सांगेल, असे स्पष्ट केले. या ध्वजाची उभारणी करण्याआधी हा ध्वज श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर याचे पुजन संत-महंतांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच दोन महिने देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक व धार्मिक स्थळांवर संतपिठाच्या ठिकाणी देखील संत-महंतांच्या हस्ते या ध्वजाचे पुजन करून दि. १५ ऑक्टोबर दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर या देशातील सर्वात उंच भगव्या ध्वजाचे खर्डा किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येईल. या निमित्ताने खर्डा (शिवपटण) या ऐतिहासिक गावास देशात नवीन ओळख निर्माण होईल. हा ध्वज पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असा विश्‍वास आ. रोहीत पवार यांनी व्यक्त केला. हा भगवा ध्वज कोण्या एका जाती-धर्माचा नसून आपल्या पुर्वजांच्या शौर्याचा, त्यागाचा, स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी सांडलेल्या रक्ताचा आदारार्थी प्रतिक असेल. या भगव्या ध्वजाचे स्वराज्य ध्वज असे नामकरणही रोहीत पवार यांनी केले आहे. स्वराज्य रक्षणाची प्रेरणा देणारा हा ध्वज खर्डा गावात उभारण्यात येणार आहे. यामुळे खर्डा वासियात समाधानाची, आनंदाचा भावना व्यक्त करण्यात येत आहे. ऐतिहासिक खर्डा गावास असा लोकप्रिय आमदार मिळाल्याने सर्वसामान्य जनतेमधून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे पं.स.सदस्य विजयसिंह गोलेकर यांनी सागितले आहे.

Most Popular

error: Content is protected !!