Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडकुंडलीकाच्या कुंडलीत शॉर्टक्रेटचा दोष

कुंडलीकाच्या कुंडलीत शॉर्टक्रेटचा दोष


कुंडलीका प्रकल्पाच्या कॅनॉलमध्ये दगडांचा खच,ओपन कॅनॉलला शॉर्टक्रेट ट्रिटमेंटची गरज
तब्बल ३०० ते ४०० मीटरच्या परिसरात कोसळतात कॅनॉलमध्ये दगड; कुंडलीका प्रकल्पातून २ हजार ८०० हेक्टर जमिनीचे होते सिंचन, या दिमाखदार प्रकल्पामुळे डोंगरदर्‍यात पोहचले पाणी विशेष म्हणजे कुंडलीकाचे पाणी सिंदफनाच्या खोर्‍यात

सोनाखोटा ते पुसरा पंधरा किलोमीटर कॅनॉलची लांबी, यात सव्वा किलोमीटरचा बोगदा, पावणेचार किलोमीटरचे ओपन कॅनॉल व दहा किलोमीटरची पाईपलाईन तब्बल ३१६ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आला हा प्रकल्प
बीड पाटबंधारे विभागाच्या जिगरबाज अधिकार्‍यांनी जीवाची परवा न करता बांधले प्रकल्प; कुंडलीका बोगद्याचे काम सुरू असतांना अभियंता अपशिंगेकर व सेवानिवृत्त अभियंता भैरट हे बालंबाल बचावले एक मजूर झाला होता जखमी, असे अभियंता सन्मानापासून वंचित
२००६ ते २०१७ असे अकरा वर्ष चालले प्रकल्पाचे काम; बोगदा कॅनॉल तयार करण्यासाठी लागले तब्बल एक वर्षे, बोगद्यात सारखे दगड पडत असल्याने मजूर आणि अधिकारी दहशतीच्या सावटीत करत होते काम
प्रकल्प बांधल्यानंतर कॅनॉलच्या देखभाल दुरूस्तीला निधी नसल्याने प्रकल्पात झाडाझुडपांचे साम्राज्य, कुंडलीका प्रकल्पाच्या बोगद्याजवळ जावून केली रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पाहणी; अभियंता यांनी बोगद्यात मोठ-मोठे अजगरसारखे घातक प्राणी असल्याची दिली माहिती
कॅनॉल तयार करतांना बोगदा आणि पाशान फोडून मिळालेल्या दगडातून संबंधित विभागाला मिळाला मोठा महसूल; दगडे चोरीला गेल्याचीही चर्चा
कॅनॉल तयार करतांना त्यातून निघालेल्या मुरूम दगड माती, तीन वर्षापासून भाड्याच्या जागेत सुरक्षित, दरवर्षी वेस्ट सांभाळायला ५० हजाराचे भाडे
दरवर्षी आठ ते दहा लाख पाणी पट्टी अपेक्षित असतांना फक्त दोन ते अडीच लाख पाणी पट्टीची वसुली, शेतकरी पाणी मागणी अर्ज देत नसल्याने वसुली फक्त अर्जदारांकडूनच
आता सिमेंटचे फलक आऊटलेटच्या ठिकाणी लावून सिमेंट फलकावर लाभार्थ्यांचे नाव लिहणार, पाणी पट्टी वसुलीत होणार वाढ
बोगद्याच्या दुसर्‍या बाजूला पाशान फोडून कॅनॉल तयार केले, ६० ते ७० फुट खोल कॅनॉलला सुरक्षा भिंत नाही; फक्त फलक लावून सावधानतेचा इशारा, जनावरांच्या जीवाला मोठा धोका
ओपन कॅनॉलमध्ये काही ठिकाणी अस्तरीकरण झाले परंतू काही ठिकाणी पाशान न फोडताच करण्यात आले अस्तरीकरण, त्या अस्तरीकरणातून झाकतात दगडे, उर्वरित ओपन कॅनॉललाही शॉर्टक्रेट प्लास्टर करण्याची अत्यंत गरज

बीड जिल्ह्यातील काही भाग डोंगराळ असल्याने पावसाचे पाणी त्या डोंगरात टिकत नाही. ज्या भागात डोंगर आहे त्याच्या विपरीत भागात पाण्याचा प्रवाह असल्याने पाणी जमिनीत सिंचन होत नसल्याने अशा डोंगर भागातील शेतकर्‍यांवर नेहमी दुष्काळाचे सावट असायचे यासाठी प्रशासनाने उपाय योजना करावी म्हणून बीड पाटबंधारे विभाग बीड यांच्या अंतर्गत वडवणी तालुक्यात उर्ध्व कुंडलीका प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय एवढा लाभदायक ठरला की आज या कुंडलीका प्रकल्पातून तब्बल २८०० हेक्टर जमीन सिंचन होत असल्याचे दिसून येत आहे. हे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्याही प्रकारची कमतरता न करता ३१६ कोटी रूपये या प्रकल्पाला निधी दिला आणि तब्बल ११ वर्षे या प्रकल्पाचे काम सुरू होते. सुरूवातीला प्रकल्पाचे पाणी कोठून घेवून जायचे हा वाद झाला. या वादात अनेक वर्षे प्रकल्पाचे कामही रखडले. प्रशासनाचे उद्देश होते की दुष्काळग्रस्त ठिकाणी व ज्या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन असतांनाही पाण्याअभावी शेतकरी हवालदिल आहेत अशा ठिकाणी पाणी पोहचावे. शेवटी वडवणी तालुक्यातील सोनाखोटा येथे कुंडलीका प्रकल्प तयार करण्यात आले आणि हे पाणी वडवणी तालुक्याकडे कॅनॉलद्वारे वळविण्यात आले. पाणी घेवून जाण्यासाठी कॅनॉल तयार करतांना ज्या संकटाचा सामना बीड पाटबंधारे विभाग येथील शाखा अभियंता यांना करावा लागला ते ऐकून थरकाप होतोय. परंतू असा दिमाखदार प्रोजेक्ट तयार करणारे अभियंता आजही सन्मानापासून वंचितच आहेत. सध्या कार्यरत असलेले व त्यावेळी शाखा अभियंता असलेले एस.व्ही.अपसिंगणकर व सेवानिवृत्त झालेले त्यावेळचे शाखा अभियंता एम.एस.भैरट यांनी जीवाची पर्वा न करता हे प्रोजेक्ट तयार केले. अशा अभियंत्यांना साधा पुष्पगुच्छ देवून सन्मानीतही करण्यात आले नसल्याचे दिसून येते. या प्रोजेक्टवर प्रशासनाने ३१६ कोटी रूपये खर्च केले. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे तयार झालेल्या या प्रोजेक्टवर रिपोर्टरच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून त्यातील दोष शोधून काढला. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रोजेक्टच्या कॅनॉल दुरूस्तीला एक रूपयाही निधी नसल्याने या प्रोजेक्टच्या कामाला पुढे चालून गालबोट लागणार यात काही शंका नाही. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या या प्रोजेक्टवरून पाणी पट्टी वसुली समाधानकारक होत नसल्याने व शेतकरी पाणी मागणी करत नसल्याने भविष्यात शेतकर्‍यांना या पाण्याचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
२००६ साली वडवणी तालुक्यातील सोनाखोटा येथे कुंडलीका प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेतला. यात ३१६ कोटी रूपये या प्रकल्पाला निधी मिळाला आणि कामाला सुरूवात झाली. प्रकल्प तयार करणे सोपे असले तरी पाणी घेवून जाण्यासाठी मोठी कसरत करायची असल्याचे अभियंत्यांना माहित होते. पाणी घेवून जाण्यासाठी रस्त्यात तब्बल दोन किलोमीटरचे डोंगर जे डोंगर पाशानाने झाकलेले होते ते डोंगर फोडून पाणी घेवून जाणे सोपे नसल्याने मोठे संकट समोर होते. परंतू त्याकाळी शाखा अभियंता असलेले भैरट व अपसिंगणकर यांनी या डोंगरासमोर न जुमानता डोंगरातून बोगदा तयार करून पाणी दुसरीकडे म्हणजे पुसरा या गावी घेवून जाण्याचा निर्णय घेतला आणि शंभर मीटर डोंगर खालून पोखरून बोगद्याचे काम सुरू झाले. या बोगद्याचे काम सुरू असतांना अनेक घटना घडल्या. दोन घटनेत वरील दोघे अभियंता बालबाल बचावले. या घटनेत एक मजूरही जखमी झाला होता. तब्बल एक वर्षाच्या मेहनतीनंतर सव्वा किलोमीटर लांब असा मजबूत दर्जेदार बोगदा तयार झाला. या पुढचे काम ओपन असल्याने सोपे होते. पुन्हा पुढे डोंगर आडवे येवू नये म्हणून पुसरा गावापर्यंत ओपन कॅनॉल घेवून जाण्यात आले आणि त्यापुढे पाईपलाईनने दहा किलोमीटर लांब पाणी पुरवठा सुरू केला. या कामासाठी तब्बल ११ वर्षे लागली. या मेहनतीचे फळ शेतकर्‍यांना मिळू लागले. २८०० हेक्टर जमिन पाण्यातून सिंचन होवून शेतकर्‍यांना याचा मोठा लाभ झाला. या संदर्भात रिपोर्टरच्या प्रतिनिधीने कॅनॉलला जावून भेट दिली. तब्बल २ किलोमीटर कॅनॉलच्या बाजूने फिरून बोगद्यापर्यंत रिपोर्टरचे प्रतिनिधी पोहचले. या संदर्भात संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता माहिती मिळाली की, बोगद्याजवळ मोठ-मोठे अजगर सारखे घातक प्राणी असून या प्राण्यापासून सावध राहण्याची गरज आहे. विशेेष म्हणजे या बोगद्यासमोरून ओपन कॅनॉल तयार करण्यासाठी मोठ-मोठे पाशान फोडून पुढचे कॅनॉल तयार करण्यात आले आहे. या पाशानावर स्प्रे प्लास्टर करून दगडे कॅनॉलमध्ये पडू नये याची दक्षता घेतली. परंतू पुढे ओपन कॅनॉल असून या कॅनॉलला अस्तरीकरण नसल्याने यातून दगडे कॅनॉलमध्ये पडत असल्याचे दिसून आले. एवढा मोठा खर्च करून बांधलेल्या या कुंडलीका प्रकल्पाच्या कॅनॉलला काही भागात शॉर्टक्रेट (प्लास्टर) केले नसल्याने शॉर्टक्रेट नावाची ट्रिटमेंट मिळाली नसल्याने कॅनॉलच्या कुंडलीतील हा दोष रिपोर्टरच्या प्रतिनिधीने समोर आणून दिला असून भविष्यात ओपन कॅनॉलच्या काही भागात शॉर्टक्रेट प्लास्टर करण्याची अत्यंत गरज असून प्रशासनाने या दिमाखदार प्रोजेक्टकडे लक्ष देवून त्याची देखभाल दुरूस्तीही वेळेवर करण्याची गरज आहे.

पाणीपट्टी वसुलीचा नवा फंडा
या पंधरा किलोमीटरच्या कॅनॉलमधून २८०० हेक्टर जमिन सिंचन होणार यातून दरवर्षी किमान प्रशासनाला ८ ते ९ लाख रूपये पाणी पट्टीच्या रूपात मिळणार परंतू पाणी मागणी पाहिजे तशी झाली नाही. पाचशे शेतकर्‍यांनी पाणी मागणी करणे अपेक्षित असतांना फक्त शंभर ते सव्वाशे शेतकर्‍यांनी पाणी मागणीचा अर्ज केला. म्हणून नऊ लाख ऐवजी दोन ते सव्वा दोन लाख पाणी पट्टी सध्या प्राप्त होते. पाणी चोरीला लगाम लावण्यासाठी व जे लाभार्थी पाणी पट्टी भरतील अशा लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा म्हणून बीड पाटबंधारे विभागाने नवीन युक्ती केली असून आता पाण्याच्या आऊटलेटजवळ सिमेंट फलक लावून लाभार्थ्यांची नावे लिहिली जाणार आणि ज्या लाभार्थ्यांचे नाव फलकावर आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळेल. व पाणी पट्टी वसुलीपण होईल. म्हणून पाणीपट्टी वसुलीचा नवा फंडा म्हणून ही युक्ती करण्यात आली आहे.

वेस्ट मटेरियलला दरवर्षी भाडे
ज्या परिसरात बोगदा व कॅनॉल तयार करण्यात आले त्या परिसरात मोठ-मोठे डोंगर असल्याने सर्व डोंगर फोडून व बोगद्यातून पाशान फोडून निघालेल्या वेस्ट मटेरियल ठेवण्यासाठी त्या परिसरात संबंधित विभागाने जागा भाड्याने घेतली आहे. गेल्या चार वर्षापासून वेस्ट मटेरियल त्या भाड्याच्या जागेत असून दरवर्षी पन्नास हजार रूपये प्रमाणे भाडे आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे पाशान फोडल्यानंतर जी मोठमोठी दगडे निघाली ती दगडे विकून संबंधित विभागाला मोठा फायदा ही झालेला आहे. यातील काही पाशान चोरी गेल्याचेही चर्चा असून वेस्ट मटेरियलवर दरवर्षी भाड्यासाठी खर्च करण्याऐवजी हे वेस्ट मटेरियल एखाद्या गरजूला कमी पैशात विक्री केले तर यातून संबंधित विभागाला महसूलही प्राप्त होवू शकतो. सध्या ठेवलेल्या वेस्ट मटेरियलला कोणत्याही प्रकारची देखरेख नसल्याने ते मटेरियलही चोरी जात असावे.

शॉर्टक्रेटचा छोटासा दोष घातक
हे प्रकल्प तयार झाल्यानंतर या प्रकल्पाचे मोठे महत्त्व समोर आले. याचा लाभ शेतकर्‍यांना आजही भेटत आहे. पुढेही भेटणार कारण की अत्यंत दर्जेदार व दिमाखदार पद्धतीने हे प्रकल्प व कॅनॉल तयार करण्यात आलेले आहे. परंतू या कॅनॉलच्या काही ओपन भागात अस्तरीकरण नसल्याने त्या भागात दगडे कोसळून कॅनॉलमध्ये पडू लागली आहेत. ज्यावेळी शेतकर्‍यांना पाण्याची गरज आहे त्यावेळी पाणी सोडण्यापूर्वी संबंधित अधिकारी स्वखर्चाने त्या कॅनॉलमधील पडलेली दगडे काढुन घेतात. जर या ओपन असलेल्या चारशे ते पाचशे मीटर कॅनॉलला शॉर्टक्रेट नावाचे प्लास्टर करून घेतले तर दगड कॅनॉलमध्ये पडणार नाहीत. अत्यंत दिमाखदार पद्धतीने बांधलेल्या या प्रोजेक्टमध्ये फक्त शॉर्टक्रेटचा दोष असून यासाठी प्रशासनाने तात्काळ शॉर्टक्रेट प्लास्टर करून घेण्याची गरज असून हा छोटासा दोष भविष्यात एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला घातक ठरणार यात काही शंका नाही.

डोंगर फोडून बोगदा केला पण अस्तरीकरण
सव्वा किलोमीटर डोंगर फोडून बोगदा तयार करण्यात आला. सुदैवाने यावेळी घटना घडल्या पण सर्व काही सुरक्षित झाले. मुंबईच्या एका कंपनीने हा बोगदा तयार करून गेले. त्यानंतर पुढे ओपन कॅनॉल तयार करून काही कॅनॉलला अस्तरीकरण करण्यात आले. यावेळी अस्तरीकरण करतांना कॅनॉलच्या काही बाजूने पाशानची दगडे दिसून येत होती. आपल्या इकडच्या गुत्तेदारांनी साधे दिसणारे दगड न काढता त्याच्यावरच अस्तरीकरण केले. यातूनच आपल्या कामाची क्वालिटी दिसून येते. संबंधित अधिकार्‍यांनीही हे काम सुरू असतांना त्रुटी दिसत असूनही त्याची दुरूस्ती करून का घेतली नाही? हा भाग चौकशीचा नसला तरी एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला सुंदरीकरणाला दृष्टी लावणारा आहे.

फक्त सावधानतेचे फलक
वडवणीहून धारूरकडे जातांना पुसर्‍याच्या पुढे मोठी वेस तयार करण्यात आलेली आहे. यावर बोगदा असल्याचे लिहिलेले आहे. खास करून रस्त्याने जाताना हमखास त्या वेशीकडे नजर जाते. त्या रस्त्याने जावून बोगद्यापर्यंत पाहणी केली. बोगद्याच्या पहिले साठ ते सत्तर फुट खोल ओपन कॅनॉल आहे. पुढे बोगदा दिसून येतो. बोगद्यापर्यंत जाण्यासाठी झाडाझुडपातून वाट काढावी लागते. मोठ-मोठे अजगर असल्याने अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जात नसावे. बोगद्याजवळ एका पाटीवर सावधानतेचा इशारा देवून सूचना लावलेल्या आहेत. परंतू सत्तर फुट खोल कॅनॉलच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची सुरक्षा भिंत नाही. म्हणून पाटी वाचणारे सावधान होतील परंतू मुके प्राणी चरण्यासाठी तेथे जातात म्हणून त्यांच्या जीवाला या कॅनॉलपासून धोका होणार यात काही शंका नाही. विशेष म्हणजे त्या ठिकाणी मासे पकडण्याची सामुग्रीही दिसून आली. याचा अर्थ हमखास त्या परिसरात लोकांचा वावर आहे. म्हणून प्रशासनाने त्या परिसरात सुरक्षा भिंत बांधून एक प्रकारे पर्यटकस्थळ तयार केले तर याचा लाभ लोकांना मिळेल.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!