पोलीस महानिरीक्षक चव्हाणांच्या उपस्थितीत पोलिस अधिकार्यांची बैठक, चांगलं काम करणार्यांना अवॉर्ड
बीड (रिपोर्टर) पोलीस हा समाजाचा महत्वपुर्ण घटक आहे. त्यामुळे पोलिसांनी फिर्यादीला फिर्याद देताना चांगल्या भाषेत बोलावे, गुन्ह्याचा तपास करताना सुद्धा पोलिसांची वर्तवणूक चांगली असावी, पोलिसांविषयी समाजात चांगला संदेश जाईल, असेच काम पोलिसांनी करावे, असे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या सभागृहामध्ये उत्कृष्ट तपास करणारे पोलीस अधिकारी, बिट अमलदार, कोर्टाची ड्युटी पार पाडणारे पोलीस अमलदार यांचा विशेष सत्कार करताना ज्ञानेश्वर चव्हाण बोलत होते. बीड जिल्ह्यातील जवळपास शंभरच्या आसपास पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा विशेष अवॉर्ड देऊन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कविता नेहरकर, सर्व विभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी या वेळी उपस्थित होते. पोलिसांकडून गुन्हेगाराला वचक बसला पाहिजे, समाजात शांतता प्रस्थापीत झाली पाहिजे, अशी अपेक्षा समाजाची पोलिसांकडून असते. विनाकारण एखाद्या निर्दोष व्यक्तीला गुन्ह्यात त्रास होईल, अशी वागणूक पोलिसांकडून मिळू नये जेणेकरून समाजात पोलिसांप्रती चांगला संदेश जाईल, असे काम ठाणे अमलदार, बिट अमलदार यांनी करावे. एखादा फिर्यादी फिर्याद देण्यासाठी आला तर ठाणे अमलदाराने त्याला सौजन्याची वागणूक द्यावी, बिनकामाच्या प्रश्नांचा भडीमार करू नये, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले. यानंतर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही अवॉर्ड प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करून भार्गदर्शन केले.