मुंबई (रिपोर्टर): मुबंई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे आणि मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. 22) सकाळी 10 वाजता मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत 24 तासांत आरोपीला अटक केली आहे.
मुंबईतील अंधेरी, कुर्ला भागात शनिवारी (दि. 24) संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी आरोपीने दिली होती. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी वेगाने तपास करत उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने धमकीचा फोन करणार्याला अटक केली आहे. आरोपीचे वय 25 ते 30 वर्षांच्या आसपास असल्याची माहिती आहे. आरोपीचे नाव अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, तपासात आरोपी त्याचे वेगवेगळी नाव सांगत आहे. आरोपीने अद्याप त्याचे खरे नाव सांगितलेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीने गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. फोनवर 24 जून रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार असल्याचे आरोपीने सांगितले. तसेच, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर बॉम्बस्फोट थांबवू शकतो, अशी ब्लॅकमेलिंगही आरोपीने केले.