लोकाभिमुख अधिकारी म्हणून राज्यभरात केंद्रेकरांची ओळख; स्वेच्छा निवृत्ती मागच्या निर्णयाने सर्वसामान्यात नाराजी
शिंदे-फडणवीस सरकारकडूनही स्वेच्छा निवृत्ती तात्काळ मंजूर; गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्रेकरांनी शेतकर्यांसाठी केली होती दहा हजाराची मागणी
बीड (रिपोर्टर): धडाकेबाज आयएएस अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केेलेला अर्ज राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर केला आहे. अचानक केंद्रेकरांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून आजपर्यंत सुनील केंद्रेकर यांनी कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य यांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देत आपले कर्तव्य पार पाडले आहे. सरकारने त्यांच्यावर जीही जबाबदारी दिली ती जबाबदारी इमाने इतबारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेले आहेत. त्यामुळे केंद्रेकर हे जिथे जातील तेथे प्रशासनातले हिरो ठरत आले आहेत. बीडमधून बदली झाली तेव्हा त्यांची बदली रद्द करण्यासाठी अवघा जिल्हावासिय एकवटून रस्त्यावर उतरला होता. संभाजीनगरमध्येही त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचे कौतुक होत आले आहे. शहर पाणीपुरवठा योजना पुर्ण त्यांच्याच नेतृत्वाखाली व्हावी, यासाठी कोर्टानेच बदली रोखली होती. अशा सनदी अधिकार्याने स्वेच्छा निवृत्ती घ्यावी, हे सर्वसामान्यांसाठी धक्कादायक आहे.
विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात 10 हजार एकरी मदत शेतकर्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकार्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी 2019 मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील 30 जून 2023 पर्यंत त्यांची बदली रोखली होती.
आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्या विभागीय आयुक्त आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले.
मला ‘माननीय’ म्हणू नका
साधी राहणीमान आणि लोकांत मिसळून काम करणारे, कोणत्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. मागील वर्षी कामानिमित्त खुलताबाद येथे गेले असता पत्नीसह त्यांनी बाजार केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. अगदी खांद्यावर पिशवी घेऊन केंद्रेकर यांनी बाजार केला होता. दरम्यान, त्यांनी पुणे येथे कृषी आयुक्त असताना, मला माननीय, सर वगैरे म्हणू नका, अशी भूमिका घेत तसे परिपत्रकच काढले होते. अधिकारपदामुळे मिळणारी विशेष प्रतिष्ठा’ नाकारण्याचे धाडस नाकारणारा, लोकांची नेमकी अडचण ओळखणारा अधिकारी अधिक काळ जनसेवेत राहावा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
बीडमधला कार्यकाळ अविस्मरणीय
अवघा जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना अशा परिस्थितीत दुष्काळ हाताळताना चार्यापासून पाण्यापर्यंत, जनावरांपासून माणसांपर्यंत योग्य नियोजन शासकीय मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत देण्याचा काटेकोर प्रयत्न केंद्रेकरांनी केला होता. त्यांच्याच काळात बीड शहरातले अतिक्रमणे काढण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांसाठी आठवड्यातून एकदिवस लोक दरबारासाठी दिला होता. यासह अन्य कामे तात्काळ पुर्ण करण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांची बदली झाल्यानंतर अवघा जिल्हा रस्त्यावर उतरला होता.