बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत 13 हजार 822 घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी काही घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे मात्र त्यापैकी 2 हजार 578 घरकुल लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत पंचायत समितीला आपली कागदपत्रे जमा केली नाहीत, वारंवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने संबंधितांना स्मरणपत्र पाठविल्यानंतरही हे लाभार्थी घरकुसंदर्भातील कागदपत्रे दाखल करत नाहीत. 30 जूनपर्यंत ही घरकुलाची कागदपत्रे लाभार्थ्यांनी पंचायत समितीला दाखल केली नाही तर ती रद्द होणार आहेत.
राज्य शासनाच्या महाआवास या कक्षाअंतर्गत राज्यातील विविध योजनेअंतर्गत जी घरकुले मंजूर आहेत, त्या घरकुलांच्या बांधकामाचा आढावा घेण्यात येतो. बीड जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षात 13 हजार 822 घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी 2578 घरकुलांची लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे पंचायत समितीला दाखल केलेले नाहीत. त्याती मोठ्या प्रमाणात मालकी हक्काची जागा नाही. त्यातील शंभरच्या आसपास लाभार्थी हे मयत आहेत. उर्वरित लाभार्थी हे भोगवटदार आहेत. महसूल विभाग आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा जागा घेण्यासाठी लाभार्थ्यांना 50 हजाराचे अनुदान देण्यास तयार आहेत, मात्र या लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्र शासनाने 30 जून ही शेवटची तारीख दिली असून तोपर्यंत या लाभार्थ्यांनी घरकुलासंदर्भात कागदपत्रे पंचायत समितीत दाखल केले नाही तर ते रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.