Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीड१९३८ नंतर बीड जिल्ह्यात वाघ आढळून आलेला नाही पिंपरगव्हाण, खापरपांगरी शिवारात वाघ...

१९३८ नंतर बीड जिल्ह्यात वाघ आढळून आलेला नाही पिंपरगव्हाण, खापरपांगरी शिवारात वाघ आल्याच्या अफवा

वन विभागाने शिवारात जावून केली पाहणी
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ग्रामीण भागामध्ये शेतीचे हंगाम सुरू असतांना वाघ आणि बिबट्या आढळून आल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात येतात. मात्र बीड जिल्ह्यामध्ये १९३८ नंतर वाघ हा प्राणी नामशेष झालेला आहे. तर मराठवाड्यातून १९७५ नंतर कोठेही वाघ आढळून आल्याच्या नोंदी नाहीत. दोन दिवसापासून पिंपरगव्हाण आणि खापरपांगरी शिवारामध्ये वाघ, वाघाचे पिल्लू आणि बिबट्या असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यानुषंगाने आमच्या सामाजिक वनीकरण विभागाने सलग दोन दिवस शोध मोहिम घेतली असता या शिवारात कोठेही वाघाचे किंवा बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आलेले नाहीत. त्यामुळे जी चर्चा वाघ किंवा बिबट्या आल्याची होती ती निव्वळ अफवा आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी मुंडे यांनी सांगितले.
खापरपांगरी आणि पिंपगव्हाण शिवारामध्ये वाघ आल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात आहेत. काही जण म्हणतात हा बिबट्या आहे. त्यानुषंगाने साामजिक वनीकरण विभागाच्या वतीने वनरक्षक पवार यांच्या नेतृत्वाखालील वनीकरण विभागाच्या पथकाने सलग दोन दिवस या शिवारामध्ये वाघ किंवा बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून येतात का? याची शोध मोहिम घेतली. मात्र या दोन्ही गावच्या शिवारामध्ये अशा कोणत्याही प्राण्याचे ठसे आढळून आलेले नाहीत. तरीही या दोन गावच्या लोकांनी शेतातील काम करत असतांना किंवा जात असतांना कशाचा तरी आवाज करत जावा, उघड्या शौचास जावू नये, सोबतच आता जरी वाघ किंवा बिबट्याचे ठसे आढळून येत नसले तरी याशिवारामध्ये बिबट्या दिसून आल्यास त्याला कोणतीही इजा होईल असे नागरिकांनी वागू नये. कारण बिबट्या हा प्राणी सर्वात जास्त लाजाळू आहे. त्याला स्वत:ला आपल्यावर कोणी हल्ला करेल आणि आपला जीव धोक्यात आहे असे वाटले तरच तो आपला जीव वाचवण्यासाठी प्रति हल्ला करतो हेही नागरिकांनी ध्यानी घ्यावे. बीड जिल्ह्यात १९३८ नंतर वाघ, पट्टेदार वाघ हे प्राणी आढळून आलेले नाही आणि मराठवाड्यामध्ये १९७५ नंतर वाघ हा प्राणी आढळून आलेला नाही असेही बीड जिल्ह्याच्या वन परिक्षेत्र विभागाचे अधिकारी मुंडे यांनी रिपोर्टरशी बोलतांना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!