रात्रीपासून जिल्हा रुग्णालय परिसरात गोंधळ, दुपारी एक वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते
बीड (रिपोर्टर) तीन वर्षांपुर्वी लग्न झालेल्या एका 22 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री गजानन नगर नाळवंडी नाका परिसरात घडली. या घटनेनंतर मयत महिलेच्या माहेरच्यांनी रुग्णालयात धाव घेत सासरच्या लोकांना चोप दिल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी सासू-सासर्यास ताब्यात घेतले असून नवरा मात्र फरार झाला आहे. जोपर्यंत दोषींविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा दुपारी एक वाजेपर्यंत माहेरच्या लोकांनी घेतला होता.
सीमा निलेश राठोड (वय 22 वर्षे) या महिलेचे तीन वर्षांपुर्वी लग्न झाले होते. रात्री महिलेने आपल्या राहत्या घरी गजानन नगर नाळवंडी रोड या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सीमा हिच्या माहेरच्या लोकांना झाल्यानंतर माहेरच्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आमची मुलगी तुम्ही मारली, असा आरोप करत सासू, सासर्यासह इतरांना चोप दिला असल्याचे सांगण्यात आले. या गोंधळाने जिल्हा रुग्णालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सासू-सासर्यास अटक केली असून नवरा मात्र फरार झालेला आहे. जोपर्यंत दोषींविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आम्ही मयत सीमा हिचे शवविच्छेदन करू देणार नसल्याचा पावित्रा घेतला होता. दुपारी एक वाजेपर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते.