Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराई तालुक्यातील राजापूरला पाण्याचा वेढा तर राहेरीसह गोदाकाठच्या अनेक गावचा संपर्क तुटला

गेवराई तालुक्यातील राजापूरला पाण्याचा वेढा तर राहेरीसह गोदाकाठच्या अनेक गावचा संपर्क तुटला

राजुरी मळा येथील नाल्यावरील पूल वाहून गेल्याने तलवाडा- टाकरवन- माजलगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प
लेंडी नदीला आलेल्या पुरात रोहितळ अर्धे गाव दुपारपर्यंत पाण्यात

गेवराई (रिपोर्टर) रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढयांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. दरम्यान गोदावरी नदीवर असलेला हिरडपुरी बंधारा तुडूंब भरल्याने या बंधार्‍याचे दोन दरवाजे उघण्यात आले असून गोदावरीला पूर आला आहे. सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असून गोदावरी काठी असलेल्या राजापूरला पाण्याने वेढा घातला असून दु 12 पर्यंत गावाचा संपर्क तुटला होता.
गावच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी आले होते. मात्र दुपारपर्यंत हे पाणी ओसरत असल्याचे दिसून आले. तर राहेरी जवळील पुलावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने तलवाड्याकडे येणारा रस्ता दुपारपर्यंत बंद असल्याने या गावाचा देखील संपर्क तुटला असल्याचे सांगण्यात आले. रात्रभर सुरु असलेल्या या जोरदार पावसाने गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या क्षमतेने वाढली आहे. दरम्यान या नदीवर असलेला हिरडपुरी ( गुळज ) बंधारा पुर्ण क्षमतेने भरला असून त्याचे 2 दरवाजे उघडले आहेत. तर जोगलादेवी व मंगरूळ बंधार्‍याचे प्रत्येकी 5 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे गोदावरीत सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असून गोदाकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पिकांचे मोठे नुकसान
रात्रभर सुरू असलेल्या या पावसाने शेतकर्‍यांची सर्व पिके मातीमोल झाली असून यामध्ये ऊस, कापूस, तूर, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या अती मुसळधार पावसामुळे नदीवरील प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाली आहे. हिरडपुरी बंधारा भरला असून दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. तरी नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे , जीविताची , पशुधनाची , वीटभट्टी साहित्य इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी , असे देखील आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!