गणेश जाधव । बीड
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात जिल्हाभरातून अनेक अल्पवयीन मुली-मुलांसह 189 महिला बेपत्ता झालेल्या सापडल्याच नाहीत. त्यांच्या शोधासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बीड पोलिसांना खडसावले असून विशेष मोहीम राबवून यांचा शोध घ्या आणि अहवाल रोजच्या रोज आम्हाला पाठवा, अशी तंबी दिली आहे. त्यानुसार बीड पोलिसांनी विशेष मोहीम राबविली असली तरी अद्याप पर्यंत हरवलेल्यांपैकी एकही जण बीड पोलिसांना सापडलेले नाहीत.
बीड जिल्ह्यात हरवलेल्या महिला व अल्पवयीन बालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामध्ये वाढ होत आहे. ते सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याबाबत थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी बीड पोलिसांना हरवलेल्या अल्पवयीन बालकांसह महिलांची शोध मोहीम राबविण्याची तंबी दिली आहे. दि. 10 जुलै 2023 पासून 16 जुलै 2023 पर्यंत मोहीम राबवून हरवलेल्या बालकांचा शोध घ्यावा, अशी विशेष महानिरीक्षकांनी बीड पोलिसांना सूचीत केले आहे.
आतापर्यंत बीड शहर पोलिसांकडून 4 महिला, बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 5 महिला, एक बालक, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 13 महिला, 6 अल्पवयीन बालक, पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतून सहा महिला, पिंपळनेर हद्दीतून 2 महिला, गेवराई हद्दीतून 20 महिलांसह एक अल्पवयीन बालक, चकलांबा 8 महिला, तलवाडा 4 महिला, आष्टी 7 महिलांसह दोन अल्पवयीन बालके, शिरूर 6 महिलांसह 2 अल्पवयीन बालके, पाटोदा 8 महिला, अंमळनेर 3 महिला, अंभोरा 4 महिला, माजलगाव शहर 3 महिलांसह एक अल्पवयीन बालक, माजलगाव ग्रामीण 10 महिलांसह एक बालक, दिंद्रुड 5 महिला, सिरसाळा 2 महिलांसह दोन बालके, वडवणी 4 महिला, केज 14 महिलांसह तीन बालके, धारूर 10 महिलांसह 3 बालके, नेकनूर 9 महिलांसह एक बालक, यूसुफवडगाव दोन महिलांसह दोन बालक, अंबाजोगाई शहर 8 महिलांसह एक बालक, अंबाजोगाई ग्रामीण 12 महिलांसह 1 बालक, परळी शहर 4 महिला, परळी ग्रामीण 11 महिला, संभाजीनगर 3 महिला, बर्दापूर पोलिस ठाणे हद्दीतून 2 महिला असे बीड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 189 महिला बेपत्ता असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही तर 27 अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लागलेला नाही. हरवलेल्या व्यक्तींचा तत्काळ शोध लावावा, पोलीस महानिरीक्षकांनी बीड पोलिसांना सूचीत केले आहे.
विशेष पथक तयार
हरवलेल्या महिला, मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी प्रत्येक ठाण्यात विशेेष पथक तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक किंवा एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस कॉन्स्टेबल व दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.