Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडभाजपाच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का, उस्मानाबाद : साखर घोटाळ्याप्रकरणी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या...

भाजपाच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का, उस्मानाबाद : साखर घोटाळ्याप्रकरणी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक

उस्मानाबाद (रिपोर्टर): उस्मानाबाद जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २७.६३ कोटी रुपयांच्या साखर कारखान्याच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्याला अटक केली आहे. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना अटक करण्यात आली आहे. आरोपीला शुक्रवारी कळंब येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वैद्यनाथ अर्बन बँकेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे.

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज टिळक रौशन यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना यासंदर्भात माहिती दिली. “उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब स्थित शंभू महादेव साखर कारखान्याने २००२ ते २०१७ दरम्यान वैजनाथ सहकारी बँक, बीड येथून अनेक कर्ज घेतली होती. प्रत्येक कर्जासाठी, या कारखान्याद्वारे उत्पादित साखर गहाण ठेवण्यात आली होती. दरम्यान, गहाण ठेवलेल्या साखरेच्या पोत्या काढून टाकण्यात आल्या आणि नंतर थकित कर्जही नसल्याचे दाखवण्यात आले. बँकेत गहाण ठेवलेली आणि सीलबंद गोडाऊनमध्ये ठेवलेली एकूण १,५४,१७७ क्विंटल साखरसुद्धा गायब होती”.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. ८ मार्चला कळंब पोलीस स्टेशनमध्ये आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या सदस्यांपैकी एक असलेल्या सुभाष निर्मल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे फसवणूक आणि गुन्हेगारी षडयंत्राचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तपास अधिकारी आणि ईओडब्ल्यू निरीक्षक संतोष शेजल म्हणाले, “चितळे हा अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी आहे. यापूर्वी अटक केलेले इतर दोन आरोपीजामिनावर सुटण्यापूर्वी सुमारे ४५ दिवस तुरुंगात होते. जुलै २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान बँकेच्या सीलबंद गोडाऊनमधून साखरेचा कथितपणे वापर करण्यात आला. २०१४-१५ मध्ये गहाण ठेवलेली ५७,००० क्विंटल साखर आणि २०१३-१४ मध्ये ५७, १७७ क्विंटल साखर गहाण ठेवण्यात आली होती.”

तक्रारीमध्ये नाव असलेल्या आरोपींनी आधीच गहाण ठेवलेली साखर दाखवत बँकेकडून नवीन कर्ज घेतले. साखर कारखान्याने कर्जाची रक्कम चुकवल्यानंतरच हा सर्व कथित गैरप्रकार उघडकीस आला.  त्यानंतर बँकेने अंतर्गत चौकशी केली आणि निष्कर्षांच्या आधारे बँकेच्या सदस्याने पोलिस तक्रार दाखल केली.

वैद्यनाथ अर्बन बँकेवर भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात या बँकेच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!