Monday, January 24, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- भिकारी

प्रखर- भिकारी


भीक मागणं ही काही अभिमानाची बाब नाही. भिकार्‍यांची संख्या दिवसे-दिवस वाढत आहे, हा चिंतेचा विषय आहे. एखाद्याला कुणी सांभाळत नाही. अपंगत्व आलं. काम होत नाही. अशी लोक भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असतात. भीक मागण्याला गरीबी तितकीच कारणीभूत आहे. ‘गरीबी हाटावचा नारा’ नेहमीच दिला जातो. गरीबी काही हाटली नाही. गरीबी हाटावचा नारा देणारे राजकीय पुढारी मात्र गब्बर होवून बसले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, आता पर्यंत दारिद्रयाचा आकडा शुन्यावर आणण्यास सरकारला यश आले नाही. उलट कोरोनाच्या काळात दारिद्रयाचं प्रमाण वाढलं असल्याचं समोर आलं. हजारो लोकांच्या नौकर्‍या गेल्या. बेरोजगारीत वाढ झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत आहे, हे ही तितकचं खरं आहे. देशाची आजची लोकसंख्या १३० कोटी आहे. भविष्यात लोकसंख्या आणखी वाढणार आहे, त्यामुळे समस्येत भर पडू शकते. ग्रामीण भागात नाही पण,शहरी भागात भीक मागणारांची संख्या मोठी असते. काहींनी भिक मागण्याचा धंदाच मांडला आहे. विशेष करुन पुणे, मुबंई, औरंगाबाद या सारख्या बड्या शहरात जास्त प्रमाणात भिकारी दिसून येतात. भीक मागणार्‍यात महिला आणि लहान मुलांचा ही समावेश आहे. काही लोक मुलांना विकत घेवून भीक मागायाला लावतात हे यापुर्वी अनेक वेळा सिध्द झालेलं आहे आणि आता हा प्रकार औरंगाबाद शहरात उघडकीस आला. लहान-लहान मुलाकडून भीक मागायला लावून भीकेतून जे काही पैसे येतील त्या पैशावर मजा मारणार्‍या प्रवृत्ती समाजात बळावत आहेत. पैशासाठी माणुस कुठल्या स्तराला जावू शकतो, हे औरंगाबादच्या घटनेने दाखवून दिलं.


मुलांची तस्करी
औरंगाबाद शहरामध्ये भीक मागणारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यात काही लहान मुलांचा समावेश आहे. दोन लहान मुलांना मारहाण होतांना देवराज वीर या समाजसेवकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा काय प्रकार आहे, याची चौकशी करण्यास सुरुवात केली. आई तर आपल्या मुलाला इतकं मारहाण करु शकत नाही, अशी शंका आल्यानंतर वीर यांनी खोलात जावून प्रकरण हाताळलं असता, ही मुलं विकत घेण्यात आल्याचे समोर आले. याबाबत वीर यांनी औरंगाबाद येथील मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात जावून आरोपी विरुध्द फिर्याद दाखल केली. त्यानुसार जनाबाई जाधव व सविता पगारे या दोन महिला विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलांना पोलिसांनी अटक करुन त्यांची चौकशी केली असता. यातील एक मुल पन्नास हजार व दुसरं मुल एक लाख रुपयाला खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी याची अधिक सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नूसार मुलांच्या तस्करीचं हे रॅकेट मराठवाडा, विदर्भात पर्यंत पोहचलेलं आहे. लहान-लहान मुलांना भीक मागायला लावणं आणि भीक न मागितल्यास त्यांना मारहाण करणं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. ज्यांची परस्थिती अत्यंत हालाखीची आहे. अशी काही लोक आपल्या पोटच्या मुलांना विक्री करतात, तर काही लोक मुल पळवून त्यांची विक्री करत असतात? मुलांची ही तस्करी पुर्णंता उध्दवस्त करण्यासाठी प्रशासन पातळीवर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.


कायदा काय सांगतो
इंग्रज राजवटीपासून भिक्षेकरीचा कायदा करण्यात आला. व्हिक्टोरिया राणी भारतात येणार होती, तेव्हा इंग्रज अधिकार्‍यांनी सर्व भिक्षेकरुंना एकत्रीत डांबवून ठेवलं होतं. सध्याच्या भिक्षेकरीगृहांची निर्मीती त्याच काळात झालेली आहे. महाराष्ट्रात १४ भिक्षेकरीगृह स्थापन करण्यात आलेले आहेत. ह्या भिक्षेकरीगृहाची क्षमता साडेचार हजार व्यक्तीची आहे. मात्र या भिक्षेकरीगृहात तितक्या प्रमाणात भिकार्‍यांची संख्या दिसत नाही. भिक्षेकरीगृहात काम करणारांना काही प्रमाणात मानधन दिलं जातं, हे मानधन अगदीच तुटपुंज असतं. भिक्षेकर्‍यासाठी गृह स्थापन केलं गेलेे असले तरी हे गृह काही ठिकाणा पुरतेच आहेत. भिकारी तर जिल्हा आणि तालुका पातळीवर असतात. राज्यात भिकर्‍यांची संख्या लाखात आहे. भीक मागू नये म्हणुन कायदा करण्यात आला, हा कायदा प्रथम इंग्रजांनीच केलेला आहे. इंग्रजांनी केलेला कायदा सध्याच्या कार्यकाळात आहे. भिक्षेकरी प्रतिबंधक कायद्याच्या कलम चार नुसार भिक्षा मागतांना कोणी आढळून आल्यास, वारंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले. भारतीय रेल्वे कायदा १९४१ नुसार रेल्वेगाडीत भीक मागण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र सर्वात जास्त भीकार्‍यांची संख्या रेल्वे मार्गावरच दिसून येते. भीक घेणार्‍या बरोबर भीक देणाराही १९५९ च्या कायद्यानूसार गुन्हेगार ठरतो. या कायद्या अंतर्गत कोणावरुन कारवाई होत नाही, हे विशेष आहे.


एैतखावू वृत्ती वाढली
समाजात असे काही लोक आहेत, ते काहीच काम करत नाहीत. मुलांच्या, पत्नीच्या जीवावर बसून खाणारे आहेत. काही नशेच्या आहारी गेलेले असतात. काहींना कामाचा कंटाळा असतो. काम मिळत नाही म्हणुन घरी बसणारे काही कमी नाहीत. माणसाच्या अंगात आळसीपणा भिनल्यास माणुस एैतखावू बनतो. त्याची काम करण्याची तितकी मानसीकता राहत नाही. घरी बसून मुलं, पत्नीच्या जीवावर जगायचं, त्यांना मारहाण करायची, त्यांच्याकडून वाट्टेल ती कामे करुन घ्यायची, अशी प्रवृत्ती समाजात बळावत आहेत. घरातील पुरुष काही काम करत नाही म्हणुन महिला, लहान मुलं रस्त्यावर किंवा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जावून भिक मागत असतात. मद्यपी पती, पत्नीने दिवसभर आणलेल्या पैशावर डल्ला मारला मारतो, त्या पैशातून नशा केली जाते. काही वेळा भीक मागणार्‍या महिला, मुलीवर अत्याचार होतात. त्यांच्यावरील अत्याचाराला कुणी वाचा फोडत नाही. निमुटपणे अत्याचार सहन करत त्या जगत असतात. समाजाला अशा लोकांची कधी कदर करावी वाटत नाही. लहान मुलं आपल्या बापाच्या त्रासाला कंटाळून स्थलांतर करतात. शहराच्या ठिकाणी मिळेल ती कामे करतात, किंवा काही मुलं लहान वयात भिक मागून आपला उदारनिर्वाह करत असतात. अशा घटनातूनच मुलं गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात. मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असते, पण काही पालकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडतो. पुर्वी लहान मुलं इतके भीक मागत नव्हतं. मात्र आता त्यांची संख्या वाढली, ही संख्या का वाढली याचा शोध प्रशासनाने घ्यायला हवा.


फक्त घोषणाच का?
केंद्र सरकारने शिक्षणाचा कायदा केला. या कायद्यानूसार एक ही मुल शिक्षणापासून वंचीत राहू नये, असा शिक्षण कायदा सांगतो. मात्र या कायद्याची अंमलबजावणी होते का? दरवर्षी मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासन फक्त कागदं काळे करण्याचं काम करत आहे. शाळा बाह्य मुलांचा सर्व्हे होतो. या सर्व्हेत किती खरेपणा असतो? सर्व्हे करुन मुलं शाळाबाहय कसे काय आढळून येतात? कित्येक मुलं कमी वयात धोक्याच्या ठिकाणी कामे करतात. कचरा वेचतात. हॉटेल, बिअरबारमध्ये काम करतात. भीक मागतात, हे विदारक चित्र सर्वांना दिसतं. त्यावर कुणीच काही बोलत नाही. फक्त काही समाजसेवकांना शाळा बाह्य मुलांच्या शिक्षणाची काळजी आहे, ते आपल्या परीने जितकं होईल तितकं सहकार्य करुन मुलांना शाळेच्या प्रवाहात आणुन त्यांना शालेय साहित्य उपलब्ध करुन देत असतात. प्रशासन शिक्षणावर करोडो रुपयाचा खर्च करत आहे. शिक्षणावरचा खर्च नेमका कुठं होतो? ज्या ठिकाणी खर्च करायचा आहे, त्या ठिकाणी खर्च केला जात नसल्यामुळेच दरवर्षी देशात हजारो मुलं शाळेपासून वंचीत राहतात. शाळाबाह्य मुलांच्या बाबतीत शासन आणि प्रशासन सर्तक असतं, तर देशात एक ही मुल शिक्षणापासून वंचीत दिसलं नसतं, व मुलांना विविध ठिकाणी काम करण्याची वेळ आली नसती. मुलं हे देशाचं भवितव्य असतात. मुलांना योग्य वयात चांगलं शिक्षण आणि मार्गदर्शन मिळालं तर मुलं नक्कीच यशाचं शिखर गाठू शकतात. आज गरीबी आणि श्रीमंती यात मोठी तफावत निर्माण झालेली आहे. श्रीमंत लोक गरीबाकडे पाहायला तयार नाहीत, मदत करण्याचा प्रश्‍न तर लांब राहिला आहे. आर्थिक दरी संपवण्याचा प्रयत्न झाला तरच समाजात समानता निर्माण होवू शकते. गरीबी, अज्ञानामुळे जे बालपण होरपाळून निघत आहे, ही होरपळ थांबवण्याची गरज आहे. नुसत्याच घोषणा आणि बाता मारुन समाजात विकासाचा प्रकाश पडतो नसतो. त्यासाठी झोकून द्यावं लागतं. तेव्हा कुठं समाजात परिवर्तनाची नांदी सुरु होत असते. असा समाज घडवण्याची गरज आहे. त्या ठिकाणी भीक मागतांना कुणी दिसणार नाही. देश भिकारी मुक्त करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी पावले उचलावीत!

Most Popular

error: Content is protected !!