अक्षय विधाते । आष्टी
तालुक्यात दि.8 जून रोजी पाऊसाच्या काही भागात सरी बरसल्या परंतु मागिल 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या सरी बरसल्याने शेतकर्यांनी पेरणी पूर्व मशागतीची कामे बियाणे खते खरेदी केली परंतु अर्धा जुन संपला तरी पाऊसच गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे आता बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असून, खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.
तालुक्यात रोहिणी नक्षत्रातच पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकर्यात आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगलाच पडेल अशी आशा शेतकर्यांना वाटू लागली. त्यामुळे शेतकर्यांनी महागडे बी- बीयाणे विकत घेवुन खरिपाच्या पेरण्या काही भागात केल्या तर काही भागात अल्प पावसाने पेरणी झाली नाही दि.8 जून सायंकाळी काही भागात पाऊस झाला दि.9 जून रोजी नांदुर परिसरात वादळी वार्यासह पाऊस झाला दि.11 जून रोजी सावरगांव परिसरात अतिवृष्टी सदृश्य पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,आठ दिवस उलटून नही पावसाने दडी मारल्याने अर्धा जून संपला तरी अद्यापर्यंत पेरण्या झाल्या नाहीत. शेतकर्यांना याही वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे इतर पिकांना अपेक्षित भाव मिळू शकला नसल्यामुळे शेतकर्यांच्या हाती फारसे उत्पन्न लागले नाही. यावर्षी सुरुवातीच्या काळात दडी दिल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली असून शेतकर्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहे.
कमी पावसावर पेरणी
केल्यास दुबार पेरणीचं संकट
खरीप पेरणीसाठी 80 ते 100 मि.मी. पाऊस होऊ पर्यंत शेतकर्यांनी पेरणी करू नये. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकर्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यास उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व जळण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकर्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते यामध्ये आर्थिक फटका बसतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.दुबार पेरणीचा खर्चही शेतकर्यांना करावा लागतो. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये .
– गोरख तरटे(तालुका कृषी अधिकारी,आष्टी )
4 दिवसांत पाऊस न
झाल्यास दुबार पेरणीचे संकट
पावसाने दमदार हजेरी लावल्याने यंदा पाऊस चांगला राहील या आशेने बि- बियाणे, खते खरेदी केली आहेत.मागिल 8 दिवसांपासून पावसाने दडी माल्याने शेतकर्याच्या चिंता वाढली आहे.माझे 4 एकर क्षेत्रावर पेरणी झाली असून तुर, उडिद,मुगाचे महागडी बियाणे पेरणी करुन उगवून आले आहेत.4 ते 5 दिवसांत पाऊस न आल्यास आता कुठे वर दिसु लागलेले पिक कडक उन्हामुळे करपण्याची भीती वाटत आहे.
-दादासाहेब नागरगोजे (प्रगतशील शेतकरी,कर्हेवडगांव)