गेवराई (रिपोर्टर)- गेल्या दोन-तीन दिवसात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील भेंडखुर्द व भेंड बुद्रुक येथील तलाव फुटल्याने भेंडटाकळी येथील शेतकर्यांनी गोठ्यात बांधलेले जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे तर अनेकांचे शेत पिकासह वाहून गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भेंडटाकळी येथील रामविलास भुतडा यांची एक गाय व एक वासरू त्यांनी गोठ्यात बांधले होते मात्र भेंड खुर्द आणि भेंड बुद्रुक येथील पाझर तलाव अचानक फुटल्याने जनावरे शोधण्यापुर्वीच पाण्याचा जास्त लोंढा आला आणि दोन्ही जनावरे पाण्यात वाहून गेली. त्याचबरोबर उभ्या पिकातही पाण्याचा लोंढा आल्याने संपुर्ण शेती पिकासह वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक जनावरे वाहून गेली आहेत.