बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा हा शरद पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. आपण जरी जिल्ह्यात एकटे पडलेलो असलो तरी बीड मतदार संघाची ताकत खूप आहे. मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जिल्ह्यात पवार साहेबांचे विचार प्रसारीत करण्यासाठी तुटून पडायचे आहे, असे म्हणत आ. संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या स्वागताला उत्तर दिले. बीड मतदारसंघात येताच त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांनी राजूरी येथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या मातोश्रीच्या समाधीस्थळी जात नतमस्तक झाले. त्यानंतर आज दुपारी बीड शहरातून संदीप क्षीरसागर समर्थकांनी भव्य रॅली काढली.
राज्याच्या राजकारणात घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले, तेव्हा बहुतांशी राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या काफिल्यात गेली मात्र बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत राहिले. तीन दिवसांपूर्वीच संदीप क्षीरसागर यांच्यावर पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर ते प्रथमच बीडमध्ये आज आले असता आ. क्षीरसागरांचे मतदारसंघात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. राजूरी येथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मातोश्रींच्या समाधीस्थळी जात नतमस्तक झाले. राजूरी येथे समर्थक कार्यकर्त्यांनी आ. क्षीरसागरांचे जल्लोषात स्वागत केले. पुढे ते बीड येथे आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून त्यांची भव्य रॅली निघाली. यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना बोलताना आ. क्षीरसागर म्हणाले की, हा जिल्हा शरद पवार साहेब यांना मानणारा आहे. आज आपण जरी एकटे पडलो असलो तरी बीड मतदारसंघातील ताकत मोठी आहे. मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जिल्ह्यात जावून पवार साहेबांच्या विचाराची पेरणी करायची आहे.