रोहीत पवारांचे महाराजांच्या
पुतळ्यासमोर धरणे
अजित पवार भडकले,
मराठवाड्यातील अवैध धंद्यांवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले
मुंबई (रिपोर्टर): विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा विरोधी पक्ष विविध प्रश्नांनी सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत असून वारकर्यांवर जालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 40 खोक्यांवर डल्ला, वारकर्यांवर हल्ला, अशी घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसनेते भाई जगताप यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांनी आंदोलन केले तर दुसरीकडे आ. रोहीत पवार यांनी एमआयडीसीला मंजूरी मिळालीच पाहिजे, कर्जत, जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, अशा आशयाचे निषेध फलक हातात घेऊन विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे धरले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार रोहीत पवार यांच्यावर चांगलेच भडकले.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळ पायर्यांवर ‘चाळीस खोक्यांवर डल्ला, वारकर्यांवर हल्ला’ अशा घोषणा दिल्या. पंढरपूर येथे वारकर्यांवर झालेल्या लाठीचार्जचा विरोधकांनी निषेध केला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी डोक्यावर टोपी आणि हातात टाळ घेत हे अनोखे आंदोलन केले. टाळ वाजवत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला. तसेच ’40 खोक्यांवर डल्ला, वारकर्यांवर हल्ला’ अशा घोषणा देखील विरोधी पक्षाच्या आमदारांनी दिल्या आहेत.आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीसाठी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली होती. पाटेगाव व खंडाळा येथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भू-निवड समितीने 18 नोव्हेंबर 2021 रोजी पाहणी केली होती. त्यानंतर या क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण जानेवारी 2022 मध्ये करण्यात आले. 14 जुलै 2022 रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत येथील 458.72 हेक्टर क्षेत्राला तत्वत: मान्यता देण्यात आली.
मात्र, पुढे याची अधिसूचना निघाली नाही. त्यासाठी आमदार पवार यांनी हिवाळी अधिवेशनात 23 डिसेंबर 2022 रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे याला सरकारने तत्वतः मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली होती. त्यानंतरही पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
तर दुसरीकडे मराठवाड्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस न पडल्यामुळे शेतकर्यांवर संकट ओढावले आहे. या विषयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचनांचे निवेदन सादर करत शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली. आजच्या कामकाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तेतील आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. विरोधकांना निधी देण्यात आला नाही. यावरून चांगलेच रणकंद माजले.