गणेश सावंत
मो. नं. 9422742810
समाज वेवस्थेच्या भाव विश्वाला समजून घेतो तो साधू ,सामाजिक जीवनात होणार्या परिणामाची खरी व्याख्या समाजासमोर मांडतो तो साधू ,विश्वव्यापी ईश्वराचे चिंतन आणि शिकवण समाजासमोर मांडताना जात पात धर्म पंताला थारा देत नाही तो साधू ,ईश्वर चराचरात सांगताना निसर्गाबरोबर विज्ञानाला महत्व देतो तो साधू ‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू.. ज्याचे अंत:करण लोण्यासारखे मऊ आहे तो साधू.. निराश्रितांना हृदयी धरतो तो साधू.. आपल्या नोकरांवर पुत्रवत प्रेम करतो तो साधू..’ दया, क्षमा, क्षिलता ज्याच्या अंगी तो साधू. ही तुकोबांनी सांगितलेली साधु-संतांची व्याख्या. साधीच. पण असे साधू दिवा लावूनही दिसणे कठीण- ही आजची गत. सतराव्या शतकातही याहून वेगळी अवस्था नव्हती. बुवाबाजीचा टारफुला तसा कोणत्याही भूमीत तरारतो. भूमी दारिद्य्राची, वेदनेची, भुकेची असो की श्रीमंतीची, ऐश्वर्याची असो- असमाधान, असुरक्षितता, भयावी भावना तेथे वस्तीला असतातच. सर्वानाच त्यातून सुटका हवी असते. त्या सुटकेचे मार्ग सांगणारे धर्माच्या हाटात दुकाने मांडून असतातच. धर्माच्या नावाखाली धार्मिक कर्मकांडांची अवडंबरे माजवून हे तथाकथित साधू, संत, बाबा, महाराज स्वत:च्या तुंबडया तेवढया भरत असतात. तुकोबांच्या काळातही अशा भिन्नपंथीय बाबा-बुवांची बंडे माजलेली होतीच. तुकोबा हे काही भारतभर फिरलेले नाहीत. त्यांचा वावर प्रामुख्याने देहू, लोहगाव असा मावळातला. परंतु त्यांच्याकडे दृष्टी होती आणि त्या दृष्टीला पडत होते ते चित्र बुवाबाजीचा बुजबुजाट झालेल्या ‘आणिक पाखांडे असती उदंडें’ अशा समाजाचे होते. त्या परिस्थितीत तुकोबांनी बुवाबाजींवर प्रचंड आसुड ओढले. असे असताना आजही जेव्हा
आसाराम आणि
बाबा रहीम
पुजली जातात. तेव्हा खरच आम्ही खर्या धर्माला अंगीकारले आहे का? खर्या ईश्वराच्या सानिध्यात आम्ही गेलो आहोत का? ईश्वर कशाला म्हणायचे? भगवंत कोण? या प्रश्नाचे उत्तर जसे चरा चरात येते तसे ईश्वर-अल्लाह हा प्रत्येकाच्या हृदयात असतोच. फक्त त्याला सापडायचे असे ते सत्कार्य करून. परंतु लाभ-लोभ, इर्ष्या-मत्सर यात गुंतलेलो तुम्ही-आम्ही केवळ आणि केवळ स्वार्थासाठी जेव्हा ईश्वर-अल्लाहच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा तेव्हा त्या ईश्वर-अल्लाह समोर आपण अखंड विश्वासाठी नव्हे तर स्वत:साठी काही ना काही मागत असतो, म्हणूनच आसाराम आणि बाबा राम-रहिम सारखे भोंदू बाबा जन्म घेतात. त्यांच्या काळ्याकुट्ट कारनाम्यांचे पापाचे घडे जेव्हा भरले जातात तेव्हा अशा बाबांचे मुखवटे जगासमोर येतेे. कित्येक भोंदू बाबांचे मुखवटे गळून पडल्यानंतरही महाराष्ट्रात आजही कित्येक
अवतारी भोंदू बाबा
पुन्हा पुन्हा जन्म घेताना दिसून येतात. काल-परवाची गोष्ट पुन्हा एकदा अशाच अवतारी भोंदू बाबाला याच पुरोगामी महाराष्ट्रात बेड्या पडल्या. बाळु मामाचा मी अवतार असल्याचे सांगणारा मनोहर भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही झाली घटना, परंतु मनोहर भोसलेसारख्या तथाकथीत भोंदू बाबाला अवतारी कोणी केलं? तो अवतारी झाला कसा? हे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा या भोंदू बाबांचा अवतार जन्मास घालणारे बाप हे सर्वसामान्यच. घरामध्ये असंतोष आहे, कोणी आजारी आहे, बायको नांदत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, शांतता नाही, अशा गोष्टीने ग्रासलेले लोक त्यावर मेहनतीचं, कष्टाचं, सामंजस्याचं, तडजोडीचं उत्तर शोधण्यापेक्षा जेव्हा अशा लोकांकडे जातात तेव्हा हे भोंदू बाबा त्याचा फायदा उचलतात. कॅन्सरसारख्या आजारावर उपचार करतो म्हणत, या मनोहर भोसलेने लाखो रुपये घेतल्याचे जेव्हा उघड झाले तेव्हा भोसलेचा अवतार महाराष्ट्रासमोर आला. कित्येक वर्षांपासून साधू, संत, सुफी, समाजसुधारक महाराष्ट्राला ओरडून सांगतायत, ‘देव दगडात शोधण्यापेक्षा बापा हो, देव अंत:करणात शोधा, सत्कार्यात शोधा’, परंतु नाही, आजही आम्ही भुलथापांना बळी पडतोत आणि
तोंडी तंबाखुची नळी
असलेल्या बुवाबाजीला बळी पडतो. अशा भंपक भोंदुबाबांबद्दल तुकोबा संतापून म्हणतात,
‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु॥
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप॥
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा॥
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती॥’
पैशासाठी, ऐश्वर्यासाठी जेव्हा कष्ट करायचे नसतात तेव्हा अंगाला राख लावून, डोळे झाकून वैराग्याचा देखावा निर्माण करून अंत:करणात भोगाचा सोहळा साजरा करायचा. अशा तथाकतीत भोंदू बाबांच्या दर्शनालाच काय तर त्यांची संगत सुद्धा चांगली नाही, असे असले तरी आजही कित्येक बुवा बाबांचे दुकाने महाराष्ट्राच्या मातीत जेव्हा सताड उघडे राहतात आणि ते चांगल्या पद्धतीने चालतात तेव्हा मात्र आम्ही जागतिक महासत्ताकतेकडे जाणारे तेच विज्ञानवादी आहोत का? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र हा एकमेव असा प्रदेश आहे ज्या प्रदेशामध्ये सोळाव्या शतकापासून विज्ञानाला डोक्यावर घेतले. अणु-रेणु-तोडका तुका आकाशाएवढा, हा जर सिद्धांत सोळाव्या शतकात आमचे संत मांडू शकतात तर आजची आमची दृष्टी ही किती सजग असायला हवी. महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यासारखे कितीतरी समाजसुधारक या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले आणि त्यांनी तथाकथीत कर्मकांडांना विरोध करताना वेळोवेळी हा सुर्य आणि हा जयद्रत दाखवून दिला. मात्र तरीही त्याच महाराष्ट्रात मनोहर भोसलेसारखे तथाकथीत अवतारी समोर येतात. हे त्या महापुरुषांचं अपयश आहे की, आजतागायत तुमचं-आमचं अज्ञान आहे हे आता तरी समजून घ्यायला हवं. अंधश्रध्दा निर्मूलनचे नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात
जादू-टोणा
विरोधी
कायदा अमलात आला. आतापर्यंत आठशेपेक्षा जास्त गुन्हेही महाराष्ट्रामध्ये दाखल झाले. तरीही मनोहर भोसलेसारखे काही पिलावळी लोकांच्या श्रध्देशी खेळत अंधश्रध्दा पसरवतच आहेत. हे पसरवताना जी खेळी खेळली जाते ती खेळी उघड उघड जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा असताना आमची व्यवस्थाही याकडे डोळेझाक करते. सोशल मिडियाच्या माध्यमतून असो अथवा टेलिव्हीजन चॅनलच्या माध्यमातून, श्रध्देच्या नावाखाली जो काही चमत्काराचा बलात्कार महाराष्ट्रवासियांवर अथवा देशवासियांवर केला जातो तो दुर्दैवीच. टेलिव्हीजनच्या माध्यमातून जादुटोण्याच्या, चमत्काराच्या घटना दाखवल्या जातात, आम्ही किती अवतारी पुरुष आहोत हे छातीठोकपणे सांगणार्या भोदूंबाबांचे कार्यक्रम जाहिरातीच्या माध्यमातून दाखविले जातात. असे असताना आमचा कायदा मात्र याकडे डोळेझाक करतो आणि त्या डोळेझाकीमुळेच सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या माध्यमातून, सामाजिक दृष्टीकोनातून, अंधश्रध्देतून सरळ सरळ फसवले जाते. अशी फसवणूक करताना अल्प असे ज्ञान, अंगी ताठ अभिमान दाखवणार्या भोंदू बाबांचे तुकोबांच्या भाषेत सांगायचे झाले तर, तुका म्हणे, ‘लंड त्याचे हाणुनी फोडा तोंड’ हीच भूमिका घ्यायला हवी. परंतु आम्ही असे काही भेदरलेले असतो आणि श्रध्देच्या नावाखाली अंधभक्त झालेलो असतो की आपल्याला सत्य काय आणि असत्य काय हे कळत नाही. प्रकाशमान असलेल्या तेजोमय सुर्यालाच आपण सातत्याने ग्रहण लावतो. हे सर्व तेव्हाच संपुष्टात येईल जेव्हा महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाने आपल्या साधू-संत, सुफी, समाज सुधारकांच्या विचारधारेला अंगीकारत आपला मार्ग निवडतील तेव्हा.