Home क्राईम भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार

भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार


दोन वर्षांच्या बाळासह वडील बालंबाल बचावले; बीड-परळी मार्गावरील जरूड फाट्यावर पहाटे तीन वाजता घडली घटना
बीड (रिपोर्टर):- तापेने फणफणलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन दवाखान्यात निघालेल्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दीर- भावजय जागीच ठार झाले तर दोन वर्षांच्या बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले. ही घटना बीड-परळी मार्गावरील जरूड फाट्यावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.


रवि नागोराव मिटकर (२५), सोनाली माधव मिटकर (२५) अशी मयत दीर- भावजयीची नावे आहेत. चालक विशाल अर्जुन मिटकर (२७) हा जखमी असून गौरव माधव मिटकर (२) आणि माधव नागोराव मिटकर (३५) हे थोडक्यात वाचले. घाटसावळी तांडा (ता.बीड) येथील रहिवासी असलेल्या मिटकर कुटुंबातील गौरवला रात्री ताप आला. त्यामुळे पहाटे ३ वाजता त्याला घेऊन कुटुंबीय बीडकडे जीपमधून (एमएच ०६ एएस – ०४६७) बीडला निघाले होते तर भूम (जि. उस्मानाबाद) येथून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच २५ एजे- ३४०३) जात होती. बीड-परळी मार्गावर जरूड फाट्यानजीक मालवाहू जीपचालकाचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोराची धडक झाली. यानंतर जीप शंभर दीडशे मीटरवर जाऊन उलटली. यात रवि मिटकर व सोनाली मिटकर हे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव आणि त्याचे वडील माधव हे अपघातानंतर जीपमधून बाहेर झेपावले. त्यामुळे ते सुरक्षित आहेत. अपघातात जीपचा अक्षरशः चुराडा झाला असून मालवाहू जीपचे देखील नुकसान झाले. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे आत्माराम गर्जे आणि जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन जीपची समोरसमोर धडक झाल्यावर मोठा आवाज झाला. या आवाजाने किशोर काकडे व जालिंदर काकडे धावत आले. त्यानंतर दादासाहेब लांडे यांनी देखील तेथे पोहोचून मदतकार्य केले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मालवाहू जीपचालकास त्यांनी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

error: Content is protected !!