Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपरप्रांतीयांची नोंद ठेवा; ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती ठेवा: मुख्यमंत्री

परप्रांतीयांची नोंद ठेवा; ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती ठेवा: मुख्यमंत्री


मुंबई (रिपोर्टर)- साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत, असे सांगत राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत.

आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी गृहविभागाला पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणार्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षेशी संबंधित अनेक महत्वाच्या सूचना पोलिसांना केल्या. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ऑटो रिक्षांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंद करण्यात यावी. तसेच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करण्यात यावे, अशी महत्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातून येणार्‍यांची नोंद ठेवणे आवश्यक असून ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटनांचा जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो, पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. निती आयोगाची आज मंगळवारी बैठक होणार असून जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर द्यावा, तसेच महिला पोलीसांनी पीडित महिलांशी संवाद साधत त्यांच्याशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. शिवाय त्यांच्या छोट्या तक्रारींकडेदेखील दुर्लक्ष होता कामा नये,असे मुख्यमंत्री म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!