Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमगुटखा पकडला, माफिया कुठयं?, घोडका राजुरीच्या गोडाऊनमध्ये होता कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पोलिसांनी...

गुटखा पकडला, माफिया कुठयं?, घोडका राजुरीच्या गोडाऊनमध्ये होता कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पोलिसांनी जप्त केला 60 लाखांच्या आसपास, छाप्या दरम्यान माफिया घटनास्थळी असल्याचा काहींचा दावा, मग तो पळाला की पोलीसांनी त्याला सोडून दिले, बीडमधून अवघ्या मराठवाड्याला पुरवला जातो गुटखा, गुटखा माफिया मुळेच्या मुसक्या बांधा, डायरी सापडा, मराठवाड्याचे रॅकेट पोलिसांना मिळेल, पिंपळनेर पोलीस झोपले होते की हप्ता घेत होतेबीड (रिपोर्टर)- महाराष्ट्र शासनाच्या गुटखा बंदीला हरताळ फासत बीड जिल्ह्यात सर्रासपणे राजकीय वरधास्त असलेल्या माफियांचा गुटख्याचा धंदा तेजीत सुरू असल्याचे आज उघड झाले. बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील एका गोडाऊनमध्ये एक-दोन लाखांचा नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा गुटखा मिळून आला. ट्रकमधून गुटखा उतरवताना जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामींच्या विशेष पथकाने ट्रकसह एका छोट्या अन्य वाहनावर छापा मारून ताब्यात घेतले. या वाहनात 60 लाखांच्या आसपास गुटखा असल्याचे सांगितले जात असले तरी गोडाऊनमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. एसपींच्या पथकाने वाहनांना आणि वाहन चालकांना ताब्यात घेतले परंतु मुळे नावाचा गुटखा माफिया पोलीसांच्या हाती लागला नाही. असे सांगितले जात असले तरी जेव्हा ही कारवाई सुरू होती तेव्हा सदरचा माफिया हा त्याठिकाणीच असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कारवाईत सापडलेला माल आणि दोन वाहनचालक यापेक्षा घटनास्थळावरून पसार झालेला माफिया आणि गोडाऊनमध्ये खरा किती रुपयांचा गुटखा होता यावर आता जोरदार चर्चा होत असून राजकीय वरधास्त असलेल्या माफियाच्या मुसक्या बांधत कोट्यवधी रुपयांचा गुटखा पोलिसांनी आज दिवसभरात जप्त करावा, तेव्हाच या कारवाईला महत्व प्राप्त होईल.


गुटखा बंदीनंतरही बीड जिल्ह्यामध्ये सर्वच प्रकारचे गुटखे मोठ्या प्रमाणावर मिळतात. गुटखा माफिये सर्रासपणे या अवैध धंद्यातून कोट्यवधी रुपये कमवतात. गुटखा बंदीमुळे शासनाचा महसूल कोट्यवधींच्या घरात असला तरी अन्न व औषध प्रशासन, पोलीस यांच्या कृपा आशिर्वादाने बीड जिल्ह्यात एका एका गोडाऊनमध्ये कोट कोट रुपयांचे गुटखे सातत्याने सर्रासपणे साठवून ठेवल्याच्या अनेक घटना या आधीही उघडकीस आल्या आहेत. बीड तालुक्यातील घोडका राजुरीत असेच एक गुटखा माफिया मुळे याचे गोडून आहे. या ठिकाणी करोडो रुपयांचा गुटखा साठवून ठेवून बीडसह जिल्ह्याच्या लगत असलेल्या उस्मानाबाद, लातूर, नगर, जालना, परभणी जिल्ह्यात येथूनच गुटख्याचा पुरवठा केला जातो. घोडका राजुरीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती आज सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांच्या विशेष पथकाला झाली. पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास हजारे आपल्या लवाजम्यासह घोडका राजुरी येथे गेले. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान मिळालेल्या टिपनुसार त्यांनी गोडाऊनवर छापा मारला. त्यावेळी ट्रकमध्ये गोडाऊनमधून माल भरला जात होता. ट्रक पुर्णत: काटोकाट भरण्यात आला होता. अन्य एका वाहनातही गुटखा भरणे चालू होते. त्याच वेळी पोलिसांनी छापा मारला आणि दोन वाहनांसह चालक सोमनाथ वारे आणि राहुल खांडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या ट्रक आणि अन्य एका वाहनातला एकूण गुटखा 60 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे मात्र गोडाऊनमधून 2 करोड रुपयांपेक्षा जास्त गुटखा होता असे सुत्रांचे सांगणे आहे. विशेष म्हणजे ज्या वेळी हा गुटखा भरला जात होता त्यावेळी गुटखा माफिया मुळे हा त्या ठिकाणी होता, असे काहींचे म्हणणे आहे मात्र पोलीसांच्या हाती तो लागला नाही. आता एसपींच्या पथकानेही 60 लाखांपर्यंतची अभिनंदनीय कामगिरी केली असली तरी या गोडाऊनमधील एकूण गुटखा हस्तगत करण्यासाठी आणि गुटखा माफिया मुळे याच्या मुसक्या बांधण्यासाठी अटकेपार प्रयत्न करून आपली विश्‍वासार्हता सिद्ध करावी. पिंपळनेर पोलीस ठाण्यात वाहनांसह गुटखा आणण्यात आला असून गुटखा माफिया मुळे याच्यासह वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पिंपळनेर पोलीस झोपले
होते की हप्ता घेत होते

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडका राजुरी या ठिकाणी गुटख्याचे एवढे मोठे गोडाऊन असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना नसावी हे अश्‍चर्यच! एकतर पिंपळनेर पोलिसांना याचा मोठा हप्ता असावा नसता पिंपळनेर पोलीस ही अकार्यक्षम आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार खरंतर घोडका राजुरी ज्या बिटमध्ये आहे तो बिट अमलदार या प्रकरणात दोषी ठरवून त्याला आधी निलंबीत करावं.

गुटखा माफिया
मुळेवर अनेक गुन्हे

राजकीय वरदहस्त असलेल्या गुटका माफिया मुळे हा साधासुधा नाही. आतापर्यंत त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे आहेत. औरंगाबादच्या सिडको पोलिस ठाण्यात 328 चा तर उस्मानाबाद, नेकनूरमध्ये दरोडा आणि अपहरणाचा, पेठ बीड पोलीस ठाण्यात 328 सह 353 सारखा गुन्हा दाखल आहे. असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असताना हा मुळे नावाचा गृहस्थ एखाद्या डॉनप्रमाणे अवघ्या मराठवाड्याला बीडमधून गुटखा पुरवतो हे विशेष.

एसपींच्या पथकाचे अभिनंदन माफियाकडून चंदन लागण्याची भिती
जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांचे विशेष पथक आणि पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांचे या कारवाईबद्दल नक्कीच अभिनंदन. परंतु कारवाई केल्यापासून हजारे यांना आलेले अनगिणत राजकीय फोन, त्यात माफियाच्या अटकेची चर्चा, कमी माल दाखवण्याबाबतची बोली यासह अन्य बाबींमुळे माफियांकडून या पथकाला चंदन लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे निडरपणे कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता बीड जिल्ह्यघातली गुटखा माफियेगिरीचा बिमोड या पथकाने करावा आणि मराठवाड्यातला सर्वात मोठं रॅकेट महाराष्ट्रासमोर आणावा.

आजची कारवाई मोठी !
पुढे काय?

पोलिसांच्या दृष्टीने आजची कारवाई सर्वात मोठी आहे, 60 लाखाच्या आसपासचा गुटखा पोलिसांनी ठाण्यात आणून ठेवला आहे, परंतु गोडाऊनमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा असण्याची शक्यता सुत्रांनी जी वर्तवली आहे त्याचे काय? पुढे हा माफिया पोलिसांच्या हाती कधी लागणार? त्याच्या मुसक्या बांधल्या जाणार का? असे एक ना अनेक उपस्थित होणारे प्रश्‍न तेव्हाच बंद होतील. तेव्हा या माफियाची माफियागिरी बंद करण्यात पोलिसांना यश येईल.

मराठवाड्याला पुरवला
जातो बीडमधून गुटखा

राजकीय वरदहस्त असलेला मुळे नावाचा हा गुटका माफिया केवळ बीड शहरातील दोन-चार पान टपर्‍यांना गुटखा पुरवत नाही तर हा संपुर्ण मराठवाड्यामध्ये गुटख्याची तस्करी करतो. करोडो रुपयांच्या गुटख्याचा व्यवहार हा आठवडाभराचा असतो. मुळेची डायरी हस्तगत केली तर मराठवाड्यातील गुटख्याचे मोठे रॅकेट उघडकीस येईल.

कारवाईत गुटखा सापडतो, माफिया का सापडत नाही?
महाराष्ट्र पोलिसांच्या यशोगाथा जगाच्या पाठीवर सांगितल्या जातात. कितीही सराईत गुन्हेगार अथवा अतिरेकी महाराष्ट्र पोलीस अवघ्या काही दिवसात सापडतात. मात्र बीड जिल्ह्यातून अवग्या मराठवाड्याला गुटखा पुरवणारा गुटखा माफिया मुळे हा बीड पोलिसांना का सापडत नाही? आज सकाळी कारवाई दरम्यान हा मुळे नावाचा माफिया तिथे होता असे सुत्रांचे सांगणे आहे, मग तो पोलिसांच्या हाती का लागला नाही. हा प्रश्‍न उपस्थित होत असून बीड पोलीस संशयाच्या घेर्‍यात आहेत.

कोण कोणता आहे गुटखा…
जळगाव, दिल्लीतून राजनिवास आणला जातो, निपाणी येथून हिरा गुटखा आणला जातो, परभणीतून बाबा तर सुरतमधून आरएमडी गुटखा बीडमध्ये आणण्यात येतो. त्यानंतर हा गुटखा वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतो. घोडका राजुरी इथला मुळेचा हा गोडाऊन मुख्य गोडाऊन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गोडाऊनमध्ये पाच-पन्नास लाखांचा गुटखा मिळणे अशक्य आहे, या ठिकाणी करोडो रुपयांचा गुटखा होता, असा दावा प्रथमदर्शींनी केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!