एक वर्षापुर्वी पतीचे कोरोनाने झाले निधन
नांदूरघाट (रिपोर्टर):- माहेरी आलेल्या महिलेचा मुलीसह विहिरीत मृतदेह आढळून आला. मुलगी खेळता-खेळता विहिरीजवळ गेली आणि ती पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. दोघींचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बाणेगाव येथे घडली. घटनेची माहिती गावकर्यांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात आला. पाणी उपसल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. आईच्या कुशीत मुलगी बिलगल्याचे दिसून आल्याने उपिस्थतांचे डोळे पाणावून गेले होते.
आशा सुंदर जाधवर या महिलेचा तीन वर्षापूर्वी वाशी तालुक्यातील वडजी येथील सुंदर जाधवर यांच्याशी विवाह झाला होता. हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते, एक वर्षापूर्वी महिलेचा सुंदर जाधवर यांना कोरोनाची लागण झाल्याने यामध्ये त्यांचे निधन झाले. दोन दिवसापूर्वी आशा या आपली मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगाव येथे आल्या होत्या. दि.16 सप्टेंबर रोजी वडिल बाहेरगावी गेले होते तर आई शेती कामात व्यस्त होती. खेळता-खेळता मुलगी विहिरीजवळ गेली. तिचा तोल गेल्याने धावत जावून आशा यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघी मायलेकीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह जेंव्हा बाहेर काढण्यात आले तेंव्हा मुलगी आईच्या कुशीत बिलगलेली दिसूून आली. हे चित्र पाहताच उपस्थितांचे डोळे पाणावून गेले होते. दोघी मायलेकीवर एका चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती केज पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या घटनेने केज येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.