Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedअग्रलेख- पाळेमुळे खोलवर

अग्रलेख- पाळेमुळे खोलवर


कुठल्याही विषारी झाडाचं निर्दालन करायचं असेल तर त्याच्या फांद्या तोडून जमत नसतं. त्याच्या मुळावर घाव घातल्यानंतरच ते पुर्णंता नष्ट होत असते. काही प्रमाणात समाजव्यवस्था अशा विषारी झाडाच्या मोहात पडलेली असते. काहींना विषारी झाड प्रिय वाटत असतं, पण हे विषारी झाड किती हाणीकारण आहे याचा अंदाज घेतला जात नाही. काही पैशासाठी, काही मिनिटाच्या नशेसाठी विषारी झाडाला पोसणं म्हणजे स्वत:च्या पायावर स्वत;च कुर्‍हाड मारुन घेण्यासारखं आहे.


नशा कोणतीही असो, ती घातक असते. तिच्यामुळे शरीराची चाळणी होते. माणसाचं आयुष्य घटत, विविध आजाराला आमंत्रण मिळतं. त्यासाठी नशा न केलेली बरी, नशेपासून काही लोकच अंतर ठेवून असतात. काहींना नशा केल्याशिवाय जमत नाही. गुटखा ही एक प्रकारची नशाच आहे. नव्वदच्या दरम्यान, गुटख्याची निर्मीती झाली. नवीन,नवीन गुटखा बाजारात आला, तेव्हा गुटख्याच्या आहारी जाणारांची संख्या मोठी होती. गुटख्याची चव काहींना चांगली वाटली. गुटखा खाल्लयाशिवाय तरुणाईला चैन पडत नव्हती. हा गुटखा सर्रासपणे कुठे ही मिळत होता. गुटख्यात अनेक कंपन्या उतरल्या, काही कंपन्यांनी आपल्या गुटख्याची प्रसिध्दी वाढवण्याचा जोरदार प्रयत्न केला.वृत्तपत्रासह, वृत्तवाहिन्यावर सुरुवातीला स्टार, बाबा, माणिकचंद या गुटख्याची जास्त विक्री होत होती. स्टार नव्वदच्या काळात खुप चलली. त्यानंतर बाबा गुटख्याचं मार्केट आलं. ज्यांच्याकडे जरा जास्त पैसे असायचे, म्हणजे जो बडा माणुस असायचा, त्याच्या खिशात माणिकचंद असायची. ‘उचे लोक उची पसंद’ अशी त्याची जाहीरातबाजीच झाली होती. काहींना भुषाण वाटत होतं, आमका, आमका माणिकचंद खातो. गुटख्याच्या आहारी जाणार्‍यांची संख्या आणि गुटख्यामुळे कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघू लागल्याने यावर सरकारने विचार केला व गुटख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने गुटखा विक्रीवर गेल्या काही वर्षापुर्वी बंदी घातली. गुटख्यावर बंदी आणल्याने त्याचा परिणाम उलटच होवू लागला. पुर्वी कमी पैशात गुटख्याची पुडी मिळत होती,त्याला जास्त पैसे लागू लागले. ज्यांना गुटख्याचं व्यसन जडलेलं आहे. अशी मंडळी जास्तीचे पैसे देवून गुटखा खावू लागली. बंदीमुळे काही प्रमाणातच लोकांची गुटख्याची सवय सुटली, पण काहींना सवय सुटेना. आज ही मुंबई, औरंगाबाद, पुणे, बार्शी या शहरात जे कॅन्सरचे रुग्ण उपचार घेतात. यात सर्वात जास्त गुटख्यामुळे कॅन्सर झाल्याचे निदान झालेलं आहे. तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढले. तोंडाचे कॅन्सर गुटखा, तंबाखूमुळेच होत आहे. गुटख्याने कॅन्सरचा आजार जडल्यानंतर तो बरा होईल याची तितकी गॅरंटी नसते. काहींचे प्राण वाचले तरी त्याच्यावर भलीमोठी शस्त्रक्रिया झालेली असते. तो रुग्ण कायमचा आधू झालेला असतो. अशा दुर्धर आजाराचा खर्च अमाप लागतो. सर्वसामान्यांकडे इतके पैसे नसतात. त्यामुळे त्यांना निष्ठेत बसावे लागते. उपचाराविना कित्येक जण मरण पावत आहेत.
राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गुटख्यावर बंदी आणली. त्याची अंमलबजावणी करुन घेणं हे प्रशासनाचं काम असतं. आपल्याकडचं प्रशासन तोडजोडीत जास्त माहीर आहे. गुटख्यावर बंदी आणल्यापासून भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्‍यांची चांदी झाली. गुटख्यावर कारवाई होवू नये, म्हणुन गुटखा माफिया मोठी डिल करु लागले. यातून मोठा अर्थव्यवहार होत आहे. काहींनी गुटखा तयार करण्यास सुरुवात केली. गुटखा तयार करुन तो विविध जिल्हयात पुरवला जातो. प्रत्येक नाक्यावर गाड्या तपासल्या जातात. तरी गुटख्याची आवक होते. अनेक वेळा गुटख्यावर धाडी पडतात. तरी गुटख्याची विक्री होतच आहे. काही माफियांनी आपलं जाळं मोठया प्रमाणात विणून ठेवलेलं आहे, हे जाळं प्रशासनाला माहित असतं, तरी माफियांवर कठोर कारवाई होत नाही. दोन दिवसापुर्वी बीड तालुक्यातील पिंपपळेनर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटख्यावर धाड टाकण्यात आली. यात लाखो रुपयाचा गुटखा पकडण्यात आला. एवढा मोठा गुटखा विक्री होत आहे. तरी स्थानिक पोलिसांना याची माहिती नाही, माहिती असते, पण लागेबांधे बांधलेले असतात. त्यामुळे कारवाई होत आहे. बीडमध्ये अनेकांनी गुटख्याची माफियागिरी सुरु केलेली आहे. बीड शहरासह, तालुक्यात जो गुटखा विक्री होतो. त्याचा सखोल तपास कधी केला जात नाही. तपास केला तर नक्कीच गुटख्यातील माफियागिरीला अटकाव बसू शकतो. गुटख्याची विक्री पुर्णंता बंद करायची असेल तर हे प्रशासनाच्या हातात आहे. प्रशासनाने ठरवले तर एकाही दुकानात, टपरीत गुटखा विक्रीला दिसणार नाही, पण कारवाईची मानसीकता असते कुणाची? जो तो आपला आर्थिक स्वार्थ पाहत आहे. त्यामुळे कठोर कारवाईच्या भानगडीत पोलिस पडत नाही. लोकांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने गुटख्यापासून सावध राहिलं पाहिजे. गुटख्याची सवय ही फक्त सामान्य जनतेचीच आहे असं नाही. प्रशासनातील अनेकांना गुटखा खाल्लयाशिवाय करमत नाही, मग काही पोलिस असतील, किंवा अन्य विभागातील कर्मचारी असतील, त्यांना दिवसाच्या दोन-चार पुडया लागतातच. गुटख्यावर कायमचा इलाज करायचा असेल तर गुटख्याच्या मुळावर घाव घातला तरच गुटख्याचं विषारी झाड नष्ट होवू शकतं, नसता गुटख्याचा असाच अवैध कारभार सुरु राहणार!

Most Popular

error: Content is protected !!