Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमआधी वाढदिवसाला बोलावलं, नंतर मारहाण करत पोत्यात गुंडाळलं, तरुणाला पेट्रोल ओतून पेटवलं...

आधी वाढदिवसाला बोलावलं, नंतर मारहाण करत पोत्यात गुंडाळलं, तरुणाला पेट्रोल ओतून पेटवलं धारूरच्या घाटातला थरार

आधी वाढदिवसाला बोलावलं, नंतर मारहाण करत पोत्यात गुंडाळलं, तरुणाला पेट्रोल ओतून पेटवलं
धारूरच्या घाटातला थरार, तरुणाने यमाला मागे हटवलं

आलेल्या संकटावर तरुणाची मात, रात्रभर वेदनेने विव्हळत अखेर जखमी अवस्थेत तरुण पोलीस ठाण्यात
माजलगाव (रिपोर्टर)- वाढदिवस साजरा करावयाचा आहे, असे खोटे सांगत एका १९ वर्षीय तरुणास गावाबाहेर बोलावून मारहाण करत त्याला पोत्यात टाकून थेट धारूरच्या घाटात नेऊन परत मारहाण करत नंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना काल घडली. आज सकाळी जेव्हा जखमी अवस्थेत तरुण विव्हळत होता तेव्हा जीप चालकाने त्याला मदत केली. सदरचा तरुण हा नाकलगाव येथील असून आरोपीविरोधात दिंद्रुड पोलिसात ३६५ सह जिवे मारण्याचा प्रयत्न ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न कशासाठी केला हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील नाकलगाव (नाकले) येथील कृष्णा अर्जुन गायकवाड या १९ वर्षीय तरुणास मंगरुळ पीर नं. २ येथील आदिनाथ सुधाकर गायकवाड याने भ्रमणध्वनी करून वाढदिवस साजरा करायचा आहे, असं म्हणत त्याला गावाबाहेर बोलावलं. एका पांढर्‍या रंगाच्या गाडीमध्ये आदिनाथसह अन्य तीन अनोळखी तरुणांनी कृष्णा यास मारहाण करत गाडीमध्ये टाकून थेट सोनीमोहा ते धारूर रस्त्यावरील घाटात आणून त्याला खाली उतरवत लाथा बुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. अशा परिस्थितीतही जखमी कृष्णाने स्वत:ला सावरले. मात्र रात्रभर तो घटनास्थळ पडून होता. आज सकाळी एका जीप चालकाला त्याच्या विव्हळण्याचा आवाज आला आणि त्याने त्याला घरी सोडले. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपींनी कृष्णा यास जिवे मारण्याहेतु जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड होते. या प्रकरणी भीमराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथसह अन्य तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा र.नं. १९७/२०२१ कलम ३०७, ३६५, ३४२, १२० (ब), ३२३, ५०४, ५०६ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने दिंद्रुड पोलिसांनी यात गांभीर्याने घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. सदरील तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न का झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!