Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमगावकर्‍यांनी मृतदेह महामार्गावर ठेवला गेवराई-शेगाव महामार्ग ६ तासांपासून बंद, संतप्त महिलांनी नादुरुस्त...

गावकर्‍यांनी मृतदेह महामार्गावर ठेवला गेवराई-शेगाव महामार्ग ६ तासांपासून बंद, संतप्त महिलांनी नादुरुस्त रस्त्यावरून उपजिल्हाधिकार्‍यांना गावात चालवत नेले


गेवराई (रिपोर्टर)- दोन वर्षांपासून नादुरुस्त असलेला पुल वेळोवेळी मागणी करूनही दुरुस्त करण्यात येत नाही, त्यात दुर्घटना होऊन लोकांचे जीव जातात. काल भोजगाव येथील तरुण याच पुलावरून वाहून गेल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आज त्या तरुणाचा मृतदेह गेवराई-शेवगाव महामार्गावर ठेवत ठिय्या आंदोलन केले. तब्बल सहा तासांच्या आंदोलनानंतर आ. लक्ष्मण पवार यांच्या मध्यस्थीने ते आंदोलन मागे घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र आंदोलनस्थळी आलेले उपजिल्हाधिकारी नामदेव टिेळेकर यांनी महिलांना घेराव घालत त्यांना चालत त्याच अवघड वाटेने भोजगावात नेले. यावरून येथील ग्रामस्थांचा संताप दिसून येत असून पुलाबाबत वेळोवेळी आवाज उठवल्यानंतरही केवळ विरोधी पक्षाचे आमदार आहोत म्हणून मागणीकडे दुर्लक्ष होत असेल तर या रस्त्यासाठी राजीनामा देणार, असे टोकाचे पाऊल या वेळी संतप्त होत आ. लक्ष्मण पवार यांनी उचलले.

lazman pawar


भोजगाव लगत अमृता नदी असून या नदीवरील पूल दोन वर्षापूर्वी पुरात वाहून गेलेला असून केवळ दिड फुटाचा कठडा याठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळे नदीला पूर येताच गावाच नेहमीच संपर्क तुटत आहे. तर नदीचे पाणी कठड्याच्या खाली गेल्यानंतर ग्रामस्थ या दिड फुटाच्या कठड्यावरुनच जीव धोक्यात घालून रहदारी करतात. दोन दिवसांपूर्वी गावातील निकिता दिनकर संत (वय १७) या मुलीने आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना अक्षरशः नातेवाईकांना तो खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागल्याने अखंड महाराष्ट्राचे मन हेलावून गेले होते. दरम्यान या मुलीचा सावडण्याचा कार्यक्रम आज होता. त्यामुळे तीची राख आणण्यासाठी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुदर्शन संदीपान संत (वय ३५) हा कठड्यावरुन नदी पार करत होता. यावेळी पाय घसरून तो नदीत पडून वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे या पुलाकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा एकदा तरुणाचा बळी गेला, यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेवराई-शेवगांव महामार्गावर मृतदेह ठेवून ठिय्या मांडला आहे. याठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. तब्बल सहा तासांच्या आंदोलनानंतर आ. लक्ष्मण पवार यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्या तआला मात्र संतप्त महिलांनी घटनास्थळी डेरेदाखल झालेले उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करत त्या नादुरुस्त रस्त्यावरून त्यांना भोजगावात चालवत नेले.

पुलाचा प्रश्‍न मार्गी लागला नाही तर
राजीनामा देईल, आ.लक्ष्मण पवार आक्रमक

संबंधित पूल हा सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असून या वाहून गेलेल्या पुलामुळे गेल्यावर्षी भोजगाव येथील महादेव संत पुलावरून जात असताना पाण्यात वाहून गेले व त्यांना आपला जीव गमवावा लागला. याची गंभीर दखल घेऊन मी स्वतः यांनी कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद बीड व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाने आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण याबाबत विधानसभेत दोन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित करून भोजगाव येथील वाहून गेलेल्या पुलाच्या बांधकामासाठी निधीचा मुद्दा उपस्थित केला होता, असे आ.पवार यांनी भोजगाव ग्रामस्थांच्या आंदोलन स्थळी भेटी दरम्यान सांगितले व याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून लवकरच या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत माघार न घेण्याचा पवित्रा घेतला होता. दरम्यान पुलाचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास मी राजीना देईल, असा आक्रमक पवित्रा आ. लक्ष्मण पवार यांनी घेतला असून मी विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे निधी देण्याबाबत जाणीवपुर्वक अडवणूक होत असल्याचा आरोपही या वेळी त्यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!