बीड (रिपोर्टर)ः-दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या सशस्त्र पाच दरोडेखोरांना स्थानीक गुन्हे शाखेने जेरबंद करुन त्यांच्याकडील दरोडा टाकण्याच्या साहित्यासह 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल करण्यात आली.
गेवराई शहरापासून जवळ असलेल्या गेवराई बायपासवरील झमझम पेट्रोल पंपाजवळ काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसले असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांनी एपीआय खटावकर यांच्यासह त्यांच्या टिमला तेथे पाठवले. पोलीसांनी मोठया शिताफिने पाचही दरोडेखोरांना जेरबंद केले. यामध्ये अविनाश दिलीप कांबळे, विशाल चंद्रकांत भोसले (दोघे रा. खंडेश्वरी, रमाईनगर, पेठ बीड), अनंता गेणा जाधव, अयान शफीक शेख (रा. चांदण्याचा मांगवाडा), उमेश मधुकर शिंदे (रा. अंथरवणपिंप्री) यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे दोन लोखंडी कटावणी, एक लोखंडी पक्कड, दोन चटणी पुडया, नायलॉन दोर्या, यासह मोबाईल,एक इंडिका व्हिस्टा गाडी असा एकूण 5 लाख 1 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. दरोडेखोरांसह साहित्य गेवराई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, डिवायएसपी संतोष वाळके, स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एपीआय खटावकर आणि त्यांच्या टिमने केली.