बीड (रिपोर्टर): अठरा वर्षे वयोखालील मुलींचे बालविवाह आपण सगळ्यांनी रोखले पाहिजेत. विशेषत: ग्रामीण भागामध्ये मुलींचे बालविवाह होतात. ऊसतोड कामगारांमध्ये याचे प्रमाण जास्तीचे आहे. अठरा वर्षे वयाच्या अगोदर मुलींच्या शरीराची वाढ होत नाही. अठरा वर्षाखालील मुलींचा विवाह लावून दिला तर तिला लवकरच मातृत्वाला शरीराची वाढ न होता सामोरे जावे लागते म्हणून अठरा वर्षे खालील मुलींचे विवाह होऊ नये म्हणून सर्व पालकांनी आपली मानसिकता बदलावी, यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे आणि यासाठी अपाण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.
स्वातंत्र्यादिनाच्या पुर्वसंध्येला आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, अनेक सामाजिक संस्था आणि शहरातील पंचवीस ते तीस शाळातील विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्यासाठी भव्य रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप माळीवेस मार्गे जिल्हा स्टेडियम या ठिकाणी झाला. त्याठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी बोलत होत्या. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. अठरा वर्षाच्या अगोदर मुलींचे लग्न लावून दिले तर आणखी एक कोयत्याची भर पडेल आणि कारखान्याकडून या कोयत्याला चांगली रक्कम मिळते म्हणून त्या ठिकाणी बालविवाह लावून दिले जाते. तर मुलीच्या लग्नाचे ओझे पालकांना वाटत असते, या दडपणातून अनेक पालक अठरा वर्षेच्या अगोदरच मुलीचे लग्न लावून देऊन रिकामे होतात. अठरा वर्षेच्या आत लग्न झाले की या मुलीला मातृत्व प्राप्त होते, त्यात तिच्या शरीराची वाढ होत नाही यामुळे अनेक आजारांना तिला सामोरे जावे लागते, त्यामुळे मुलीला शिक्षण दिले पाहिजे, ऊसतोडणी ऐवजी पर्यायी रोजगार उपलब्ध करून घेतला पाहिजे, आणि अठरा वर्षेच्या अगोदर लग्न करणार्या पालक आणि इतरांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, आतापर्यंत सामाजिक संस्ता आणि प्रशासनाच्या वतीने अनेक बालविवाह रोखले आहेत, भविष्यातही बालविवाह करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केकान, अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.