Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडपाटबंधारे विभागात जाळून घेतलेल्या शेतकर्‍याचा मृत्यू शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

पाटबंधारे विभागात जाळून घेतलेल्या शेतकर्‍याचा मृत्यू शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात
न घेण्याचा नातेवाईकांचा निर्णय
बीड (रिपोर्टर)- पाटबंधारे विभागाने कर्मचारी वसाहतीसाठी दहा गुंठे जमीन जास्तीची संपादीत केली असून याचा ना मावेजा देण्यात आला ना ती जमीन परत देण्यात आली. जमीन परत द्या नसता मावेजा द्या यासाठी एक शेतकरी पाटबंधारे कार्यालयामध्ये गेल्या काही वर्षापासून खेटे घालत आहे. कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने काल नैराश्येत येऊन त्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले होते. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रुग्णालय आणि पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आज दुपारी १ वाजेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होते. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन न जाण्याचा आक्रमक पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता.

अर्जुन कुंडलिक साळुंके (वय ४५, रा. पाली) यांची ३४ गुंठे जमीन पाटबंधारे विभागाने गेल्या काही वर्षांपूर्वी कर्मचारी वसाहतीसाठी संपादीत केली होती. पाटबंधारे विभागाने ३४ गुंठ्याएवजी ४४ गुंठे जमीन संपादीत केल्याचे साळुंके यांचे म्हणणे होते. एकतर जमीन परत द्यावी नसता त्या जमिनीचा मावेजा तरी द्या, अशी मागणी साळुंके वारंवार पाटबंधारे विभागाकडे करत होते. त्यांच्या या मागणीकडे कार्यालय दुर्लक्ष करत होते. अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकर्‍याने आत्मदहनाचा इशाराही दिला होता. तरीही याची दखल घेतली गेली नाही. काल शेतकर्‍याने कार्यालयात जावून स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. जखमी अवस्थेत शेतकर्‍यास काही नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान सदरील शेतकर्‍याचा रात्री मृत्यू झाला. या घटनेने पाटबंधारे विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत पाटबंधारे विभागाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. याबाबत आ. विनायक मेटे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करत दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर आज दुपारी अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्राही मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता. तणावाची परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालय आणि पाटबंधारे कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रुग्णालय परिसर सुन्न
नातेवाईकांचा हंबरडा

शेतकरी अर्जुन साळुंके यांनी जाळून घेऊन आत्मदहन केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात हंबरडा फोडला होता. यामुळे रुग्णालय परिसर अगदी सुन्न झाला होता.

जीवंत असताना शेतकरी साळुंके मावेजासाठी पाटबंधारे विभागाकडून अवहेलना झाली त्यातच त्यांनी जाळून घेतल्यानंतर ज्या वार्डामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्या वार्डात मोठ्या प्रमाणात उंदरं असल्याने त्यांच्या मृतदेहाकडे कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्या मृतदेहाची एकप्रकारे अवहेलनाच झाली. उंदरांनी त्यांचा चेहरा कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी दोषी संबंधित कर्मचार्‍यांविरोधात कारवाईची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!