Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडप्रखर- दुध उत्पादकांची परवड

प्रखर- दुध उत्पादकांची परवड

पेंड महाग झाली, दुधाला भाव कमी शेतीला जोड व्यवसाय म्हणुन दुधाचं उत्पन्न घेतलं जातं. दुधाचा व्यवसाय हा पुरातन काळापासून आहे. दुधाळ जनावरे पाळून त्याचं संगोपन करायचं आणि दुधाची विक्री करुन त्यातून आलेल्या पैशातून घर,शेतीचा खर्च भागवायचा असं शेतकर्‍यांचे नियोजन असते. हल्ली आजची परस्थिती पाहता, दुधाचा व्यवसाय धोक्यात आला. शेतकर्‍यांना दुध विक्री करण्यास परवडत नाही. जनावरासाठी लागणारा खर्च वाढल्याने शेतकरी दुग्ध व्यवसायात अडचणीत येवू लागले. शासन व्यवसाय करा, म्हणत असलं तरी जेव्हा व्यवसायीक अडचणीत सापडतात तेव्हा शासन व्यवसायीकांना कुठलीही मदत करत नाही. जगात सर्वात जास्त दुधाचं उत्पन्न भारतात निघतं. उत्पन्नानूसार दुधाला तितका चांगला भाव मिळत नाही. कधी,कधी वाढीव दुध असल्याने त्याची भुुकटी तयार केली जाते. ही दुधाची भुकटी विदेशात विक्री केली जाते. या भुकटी संदर्भात केंद्र सरकार आयात, निर्यात धोरण ठरवतांना सवलत देत नाही. भुुकटीला अनुदान दिले तर नक्कीच त्याचा फायदा शेतकर्‍यांना होवू शकतो. एकीकडे केंद्र सरकार आम्ही शेतकर्‍यांचे हीत जोपासत असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सहकार्याची भावना ठेवत नाही. फक्त शेतकर्‍यांच्या प्रेमाचा देखावा केला जात आहे. दुधाला योग्य तो हमी भाव असला पाहिजे. आज मिळणारे भाव अगदी कमी आहे. दरवर्षी दुधाचे हमी भाव ठरवले पाहिजेत.

देशात ५२ % म्हशी म्हशी आणि गाईच्या दुधाची विक्री केली जाते. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जातीचे जनावरे असतात. काही जनावरे कमी दुध देतात, तर काही जनावरे जास्त दुध देत असतात. पुर्वी गावरान जातीचे जनावरे मोठ्या प्रमाणात पाळली जात होते, ही जनावरे कमी दुध देत होते. घरी खाण्यापुरतं दुध निघाले तरी पुरे होत होतं. जेव्हा पासून दुधाच्या व्यवसायाला गती आली. तेव्हा पासून जास्त दुध देणारी जनावरे पाळली जावू लागली. जगातील एकुण म्हशीपैकी भारतात ५२.६ टक्के म्हशी आहेत. दुध उत्पन्नात म्हशीचा वाटा ५२.८ तर गाईचा ४३.६ टक्के आहे. भारतात म्हशीच्या १६ आणि गाईच्या २६ जाती जाती आहेत. हरियाना,महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात,पंजाब,राजस्थान,मध्यप्रदेश या सारख्या राज्यात विविध जातीच्या गाई, म्हशी पाळल्या जात आहे. जास्त दुध देणार्‍या गाई, म्हशीच्या किंमती तितक्या जास्त असतात. किमान एका चांगल्या जातवान म्हशीसाठी एक लाखापेक्षा जास्तीचे पैसे मोजावे लागतात. जातवान म्हैस दहा लिटर पेक्षा जास्त दुध देते. गाईची सत्तर हजाराच्या पुढे किंमत असते. भारतात दुध देणार्‍या गाईची संख्या ५ कोटीच्या पुढे आहे. जगातील गाईच्या संख्येत ३६ टक्के गायी भारतात आहेत. त्यातील २५ टक्के गायी ह्या संकरीत आहे. राज्यात गायीचे १ कोटी ४० लाख लिटर दुध संकलीत होते,६० ते ६५ लाख लिटर थेट ग्राहकांना पिशवीतून विकले जाते. २० लाख लिटर दुधाचे उपपदार्थ केले जातात. उर्वरीत दुधाची भुकटी केली जाते. #१९६० पासून चालना महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून राज्यात विविध उद्योग व्यवसाय उभारण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातच दुध हा प्रमुख व्यवसाय म्हणुन गणला जावू लागला.राज्याने १९५८ साली दुध व्यवसाय विकास विभागाची स्थापना केली. १९६० पासून ग्रामीण भागातील दुध स्वीकृत करुन शहरी भागातील लोकांना ते वितरीत करण्याची योजना सुरु करण्यात आली. जिल्हा पातळीवर दुधशाळा व शीतकरण केंद्रे स्थापन करण्यात आली. १९७० पासून दुधाच्या उत्पन्नात वाढ झाली. राज्यात १३, ४३५ प्राथमिक सहकारी दुध संस्था, २१ जिल्हा सहकारी दुध संघ, ४६ तालुका सहकारी दुध संघ कार्यरत आहेत. दुध संकलनाच्या बाबतीत आजच्या आणि कालच्या परस्थितीत मोठी तफावत निर्माण झाली. १९९० च्या दरम्यान, ग्रामीण भागातील दुध डेअरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुध संकलीत करुन ते जिल्हा किंवा तालुका पातळीवर संकलन केंद्रात पाठवले जात होते. पुर्वी वाहनाची साधने नव्हते. त्यामुळे शेतकरी गावातच डेअरीवर दुध टाकत होते. आज वाहतुकीचे प्रचंड साधनं निर्माण झाले. काही मिनीटात खेड्यातील माणुस शहरात येवू लागला. आवक, जावक वाढल्याने ग्रामीण भागातील बहुतांश डेअरी बुडीत निघाल्या. जिल्हा आणि तालुका दुध संघाला घरघर लागली. काही शेतकरी आपले दुध डेअरीवर टाकण्या ऐवजी हॉटेल, स्वीटहोम, आईसक्रीम,कुल्फी इत्यादी व्यवसायकींना थेट विक्री करु लागले. याचा परिणाम शासकीय डेअरीवर झाला आहे. डेअरीवर दुधाच्या फॅटवर पैसे मिळत असतात. गाईच्या दुधाला तितका फॅट बसत नाही. त्यामुळे गाईच्या दुधाला तीस रुपयाच्या पुढे जास्त भाव मिळत नाही. तीस रुपयाने दुध विक्री करणे शेतकर्‍यांना परवडत नाही. शासन सरकारी डेअरीवर नियमीत भाव वाढ करत नाही. संकटाच्या काळात उत्पादकांना मदत करत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा सरकारी डेअरीवरील कल कमी झाला. काही जिल्हयातील जिल्हा दुध संकलीत केंद्र बंद पडलेले आहेत, तर काही शेवटची घटका मोजत आहेत. सरकारी दुध केंद्र पुन्हा नव्या जोमाने सुरु होतील असं वाटत नाही. एकेकाळी सरकारी दुध डेअर्‍यांना प्रचंड मार्केट होतं. त्यात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत होती. राज्यात दुध संस्थांचं जाळं विणलेलं होतं. आज हे जाळं पुर्णंता तुटून पडलं आहे.

खाजगी डेअर्‍या जागतीकरणामुळे उद्योग क्षेत्रात वाढ झाली. जो तो वेगवेगळे व्यवसाय करु लागला. दुधाच्या व्यवसायात अनेक बडे उद्योजक,राजकीय पुढारी उतरले आहेत. ज्या प्रमाणात सरकारी दुध संघ शेतकर्‍या कडून दुधाची खरेदी करत आहे. त्याच प्रमाणे खाजगी डेअरी शेतकर्‍याकडून दुधाची खरेदी करू लागली व त्या दुधापासून वेगवेगळे उपपदार्थ बनवून बाजारात विक्री करत आहे. आज बाजारात उपपदार्थाना मोठी मागणी आहे. काही व्यवसायीकांचे दुधाचे व उपपदार्थाचे ‘ब्रॅड’ आहेत, त्या ब्रॅडवर त्यांच्या दुधाचे उपपदार्थ विक्री होत आहे. बंद पाकीटातील दुधाची विक्री थेट किंवा एजन्सीच्या माध्यमातून केली जाते. गुजरात, पश्‍चिम महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून दुधाची मोठी आवक असते. शहरी भागात असलेले हॉटेल चहासाठी पाकीटमधील दुधाचा वापर करत असतात. घरगूती लोक ही याच पाकीटाचे दुध वापरत असतात. शेतकर्‍यांकडून कमी दरात दुध खरेदी करायचं आणि त्यातून वेगवेगळे उपपदार्थ बनवून त्यातून लाखो रुपये नफा कमवणार्‍या कंपन्या आहेत. शेतकर्‍यांमुळे व्यवसायीक बडे झाले, मात्र शेतकरी आहे त्याच अवस्थेत आहेत. खाजगी डेअर्‍यांची सरकारी डेअरी स्पर्धा करु शकत नाही. कारण त्यात तितकं अवसान राहिलं नाही. शासनाला त्याचं काही देणं,घेणं राहिलेलं नाही. सरकारी दुग्ध विभाग फक्त नावाला राहिलेला आहे. महाराष्ट्र राज्यात दुग्ध विकास खातं आहे. या खात्याला बजेटच नसतं. रिकामं खातं म्हणुन याची ओळख झाली. अशा ‘भाकाड’ खात्याकडून अपेक्षा तरी काय करणार?


पेंडीचे भाव गगनाला जनावराचं संगोपन करतांना खुप काळजी घ्यावी लागते. जनारांची चांगली देखभाव केली तरच उत्पन्न चांगलं निघतं. जनावरांना सकस आहार गरजेचा असतो. पुर्वी जनावरासाठी कुरण असायचे आज ती परिस्थती राहिली नाही. बहुतांश जनावरे हे बांधूनच असतात. बांधून असलेल्या जनावरांना तीन वेळेस सकस चारा लागतो. ज्या शेतकर्‍याकडे घरचा चारा आहे. त्या शेतकर्‍यांना जास्त खर्च लागत नाही. ज्यांच्याकडे स्वत:चा चारा नाही. त्यांना खरेदी करुन चारा आणावा लागतो. घास, कडबा, भुसा अशा पध्दतीचा चारा जनावरांना लागतो. शेती वहेती मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे बांधावरचा चारा कमी झाली. जनावरासाठी स्पेशल चार्‍याची लागवड करावी लागते. घास, मका,कडोळ इत्यादी प्रकारच्या चार्‍याची निर्मीती केली जाते. कधी जास्तीचा पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे जनावरांच्या चार्‍याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे चार्‍याचे भाव वाढतात. दोन वर्षापुर्वी कड्‌ब्याचे भाव चार हजाराच्या पुढे गेले होते. सध्या चार्‍याचे भाव जरा स्थिर असले तरी पेंडीचे भाव गगनाला भिडले. पेंड ४० रुपये किलो पर्यंत गेली आहे. पेंडीचे भाव अचानक वाढल्याने व्यवसायीकांना व्यवसाय करावा की नाही असाच प्रश्‍न पडला. पेंडीच्या भावाचं कापसाच्या उत्पन्नाशी निगडीत आहे. मराठवाडा, विदर्भात कापूस मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मात्र गेल्या दोन, तीन वर्षापासून कापसाचं उत्पन्न घटल्याने त्याचा परिणाम पेंडीवर झाला. कापसाची आवक कमी होवू लागल्याने पेंडीचे उत्पन्न घटले आणि पेडींचे भाव वाढले. म्हशीचं दुध ५० ते ६० रुपये या प्रमाणे विक्री होते. गाईच्या दुधाला तीस रुपया पर्यंत भाव आहे. दुधाचा भाव आणि जनावरांची पेंड, खाद्य याचं गणीत जुळेना. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना तोटयात दुधाचा व्यवसाय करावा लागत आहे. दुधाचे भाव वाढले की, लोकांची ओरड असते. दुधाचे भाव वाढले, पण पेंडीच्या वाढलेल्या भावा बाबत कुणी काही बोलत नाही. म्हशीच्या दुधाला जवळपास शंभर व गाईच्या दुधाला ५० ते ६० रुपयापर्यंत भाव हवा, तेव्हा या उत्पादकांना काही तरी चार पैसे पाठीमागे राहू शकतात. शेतकर्‍यांचा विचार कुणी करत नाही. शेतकर्‍यांनी आपला माल किती रुपयामध्ये विकण्यास परवडतो याचा विचार करुनच तो विक्री केला तरच शेतकरी तग धरु शकतो. नसता शेतकरी वर्षानुवर्ष कर्जाच्या आणि तोटयाच्या व्यवसायात रुतलेला दिसेल.

Most Popular

error: Content is protected !!