Monday, January 24, 2022
No menu items!
Homeदेश विदेशअखेर ठरलं! ६७ वर्षांनंतर एअर इंडियावर पुन्हा टाटा समूहाची मालकी

अखेर ठरलं! ६७ वर्षांनंतर एअर इंडियावर पुन्हा टाटा समूहाची मालकी

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडियाच्या मालकीच्या मुद्द्यावर आता पडदा पडला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. मात्र, शेवटी टाटा सन्सनं बाजी मारली असून आता एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली होती. त्यामुळेच एअर इंडिया ६७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा सन्सकडे गेलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये केद्रीय पातळीवरून निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

टाटा समूहाने १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारत सरकारने १९५३ साली आपल्या ताब्यात घेतली होती.

एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया जानेवारी २०२० पासून सुरु झाली होती. मात्र करोना संकटामुळे यात विलंब झाला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने पुन्हा एकदा कंपन्यांना बोली लावण्याचा प्रस्ताव दिला. २०२० या वर्षात देखील टाटा ग्रुपनं एअर इंडिया खरेदीसाठी प्रस्ताव दिला होता. यापूर्वी २०१७ मध्ये सरकारने एअर इंडियाचा लिलाव सुरु केला होता. मात्र तेव्हा कोणत्याही कंपनी स्वारस्य दाखवलं नव्हतं. २००७ मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलिनीकरण झाल्यानंतर एअर इंडियाला तोटा होण्यास सुरुवात झाली होती. सध्या एअर इंडियावर ६०,०७४ कोटी रुपयांचं कर्ज आहे. मात्र खरेदी करणाऱ्या कंपनीला २३,२८६.५ कोटी द्यावे लागणार आहेत. उर्वरित कर्ज विशेषतः तयार केलेल्या एअर इंडिया अॅसेट होल्डिंग्स लिमिटेडला हस्तांतरित केले जाईल. याचा अर्थ उर्वरित कर्ज परत फेडण्याचा भार केंद्र सरकार उचलणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!