Friday, January 28, 2022
No menu items!
Homeसंपादकीयमॅराथॉन अग्रलेख भाग 1 ‘स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत गांधींची अहिंसा शुरांची कशी’ यावर भाष्य...

मॅराथॉन अग्रलेख भाग 1 ‘स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत गांधींची अहिंसा शुरांची कशी’ यावर भाष्य करणारेमोठं डोकं, सुपासारखे कान, हडकुडे गांधीच शूर

गणेश सावंत
मो. नं. 9422742810
महात्मा मोहनदास करमचंद गांधी नावाचं अनन्यसाधारण व्यक्तिमत्व येसूखिस्तानंतर हजारो वर्षांनी भारतात जन्माला आला. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये सौराष्टाच्या काटेवाडा प्रांतातील पोरबंदरात झाला. 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी ते प्रार्थनास्थळाकडे जात असताना मारेकर्‍यांनी अवघ्या हाताच्या अंतरावरून महात्मा गांधींच्या छातीत 3 गोळ्या झाडल्या. ते खाली कोसळले आणि अनंतात विलिन झाले. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत महात्मा गांधींचा आणि त्यांच्या अहिंसेचे महत्व तितकेच अनन्यसाधारण. म्हणूनच आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या विचाराला नतमस्तक होत गांधींचं उभं आयुष्य तीन दिवसांच्या मॅराथॉन अग्रलेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.


अखंड हिंदुस्तानाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारत-पाकिस्तान अशी फाळणी आम्हाला मान्य करावी लागली. 5 लाख ते 20 लाखांपर्यंत हिंदू-मुस्लिमांची भयंकर कत्तल झाली. अशा या फाळणीला महात्मा गांधीच जबाबदार असल्याचा धादांत खोटा प्रचार राजकारणामध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या हिंदू महासभेच्या मुठभर पांढरपेषांंकडून सातत्याने करण्यात आला आणि आजही तो करण्यात येत आहे. गांधींच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणे, महात्मा गांधींना टकल्या म्हणून हिणवणे हे हिंदू महासभेच्या पिलावळांचं जणू जगणच झालं होतं. त्यांच्या मुला-बाळांची ही खासियत होती. वास्तविक पाहता महात्मा गांधी यांनी फाळणीला प्रथम पासून अखेरपर्यंत कडवा विरोध केला होता. प्रथम माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, त्यानंतरच भारताची फाळणी होईल, असे ठणकावून सांगितले होते. परंतु पाकचे निर्माते बॅरिस्टर जिना हे प्रचंड हटवादाला पेटले होते. पाकिस्तान घेणारच, अशी गर्जना करत होते. धर्मांधता पेटवत होते, हिंदू-मुस्लिमात तेढ निर्माण करत होते. वातावरण अत्यंत प्रक्षुब्ध झालं होतं. हिंदू मुसलमानांकडे तर मुसलमान हिंदूंकडे शत्रुच्या नजरेने पाहत होता. या प्रश्‍नावर उत्तर शोधण्याची इंग्रजांची जबाबदारी होती, परंतु इंग्रजांनी फोडा व झोडाच्या राजकराणात ‘तुम्ही तुमचे पहा, आम्ही येथून जातोय,’ अशी भूमिका घेतल्याने पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे मनातून धास्तावले आणि त्यांनी फाळणीला परवानगी दिली. इथच महात्मा गांधींच्या डोक्यावर फाळणीचे खापर फोडण्यात येऊ लागले. फाळणी झाली तरी महात्मा गांधींनी हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई यांच्या एकतेसाठी आपले जिवाचे रान करणे कायम ठेवले. फाळणीनंतर नौखालीत हिंदूंची जी कत्तल झाली ती नौखाली अक्षरश: लाव्हा रसासारखी तप्त होती. तिथे पाय ठेवला तर पाय भाजायचे. परंतु महात्मा गांधी नौखालीत गेले, एकटे गेले, साधं पोलीस संरक्षणही घेतलं नाही. त्यांना ते आवडतही नव्हतं. काठी टेकत-टेकत गेलेल्या महात्मा गांधींचं छायाचित्र पहितल्यानंतर आजही भारताचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते कवी रविंद्रनाथ टागोरांची ‘एकला चलो रे’ ही कविता आठवणीत आल्याशिवाय राहत नाही. सत्य आणि अहिंसा अंगी बाळगणारे महात्मा गांधी खरचं महात्मा होते का? त्यांची अहिंसा ही कुठली अहिंसा होती, तर त्याचं उत्तर महात्मा गांधींची अहिंसा ही
वीरांची अहिंसा

होती हे छातीठोकपणे सांगावेच लागेल. महात्मा गांधींची उंची पाच फुट, वजन 114 पाऊंड, दिसायला पुर्ण कुरुप, डोके मोठे, कान सुपासारखे, शरीराची हाडे दिसायची अशा वार्‍यानेही हेलकावणार्‍या माणसाने इंग्रजांच्या साम्राज्याला वाकविले. हे शुराच्या अहिंसेने नव्हे काय. जेव्हा दिल्लीत सत्तेचे सोहळे सुरू होते तेव्हा महात्मा गांधी सत्तेच्या सोहळ्यात रमले नाही, माझ्यामुळेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले हे छाती पिटवून सांगण्यासाठी त्या व्यासपीठावर थांबले नाहीत. एकीकडे स्वातंत्र्य मिळालं आहे आणि दुसरीकडे देशभरात जातीय आगडोंब उसळला आहे, हिंदू – मुस्लिमांच्या कत्तलीने कलकत्ता अक्षरश: रक्ताने माखलं आहे, जाळपोळीने तप्त झालेल्या कलकत्त्यात शांतता राखण्यासाठी, शांततेचे आव्हान करण्यासाठी गांधींनी तिथे जाणे पसंत केले. दुर्दैव याचं वाटतं, जेव्हा गांधी तिकडे गेले तेव्हा तेथेच गांधींचा मुडदा पडेल, गांधींचा खून होईल, असे वाटत होते. हिंदू गांधींवर तपले होते, शिव्या-शाप देत होते. याच दंगलीत गांधी परत येतील का नाही, असे वाटत होते. परंतु दुर्दैवाने
गांधींचा वध

महाराष्ट्रात झाला. ज्या मराठी माणसाचे मनगट अन्यायाविरुद्ध उसळते, ज्या मराठी माणसाने सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आणि स्वाभिमानासाठी कार्य केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात दुर्दैवाने महात्मा गांधींची हत्या झाली. जणू नियतीनेच एका माथेफिरूला महाराष्ट्रात जन्माला घातले. नथ्थूराम नावाच्या मराठी माणसाने महात्मा गांधींच्या छाताडात गोळ्या घातल्या. तो हिंदू महासभेशी संलग्न होता. त्याच्यामुळे हिंदू महासभा व त्यांची पांढरपेशी जात कायमची बदनाम झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भरून न येणारे नुकसान झाले. आज त्यातील काहींना स्वाभिमान वाटत असेल, गर्व वाटत असेल परंतु मराठी माणसाच्या हातून या वीराची हत्या झाल्याने महाराष्ट्र कायम अकारण बदनाम झाला. महात्मा गांधी सायंकाळी प्रार्थनेचा कार्यक्रम घेताना हे सर्व झालं. महात्मा गांधी जेव्हा प्रार्थनास्थळाकडे येत होते तेव्हा नथ्थूराम तेथे आला, त्याने गांधींना नमस्कार केला, गांधींनी हसत हसत नमस्कार स्वीकारला आणि त्याच क्षणी खिशातून पिस्तूल काढून गांधींवर गोळ्या झाडल्या. या वेळी गांधी हसत-हसत खाली कोसळले. गांधींचं हे हसणं अखंड महाराष्ट्राच्या माणसाच्या शौर्यावर होतं की मुर्खपणावर होतं हे एकट्या नथ्थूरामसारख्या बदमुर्खाच्या कृत्यातून आजही उमजत नाही. महात्मा गांधी लहानपणापासूनच
महात्मा होते का?
जन्मापासूनच महात्मा गांधींच्या वागण्या-बोलण्यात मोठेपणाचे लक्षण दिसून येत होते का? येसूख्रिस्त, भगवान बुद्ध, श्रीकृष्ण, संत तुकाराम महाराज यांच्यासारखे बालपणापासूनच त्यांच्या अंगी दैवी गुण दिसून येत होते का? तर या सर्व प्रश्‍नांचे उत्तर ‘सत्याचे प्रयोग’ वाचल्यानंतर ‘नाही’, असे येईल. कारण गांधींचे जेव्हा बालपण होते, ते जेव्हा मित्रासमवेत शाळेत जात होते तेव्हा त्यांच्या नादी लागून मास, मच्छी खाणे, वेश्येकडे जाणे (परंतु ते तसेच परतले), सोने विकणे आदी गोष्टी केल्याचे दिसून येते. वाचकांच्या माहितीस्तव जेव्हा महात्मा गांधी शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार होते तेव्हा त्यांच्या आईने मास-मच्छी खाणार नाही, दारू पिणार नाही अशी शपथ घेतल्यावरच त्यांना इंग्लंडला जाऊ दिले. महात्माजींची कारकिर्द ही घडवण्यापेक्षा घडल्याचे आपल्याला स्पष्ट म्हणता येईल. महात्मा गांधींच्या चरित्राला खरीखुरी सुरुवात झाली ती दक्षिण आफ्रिकेतील एका रेल्वे प्रवासातून. गांधी अपटुडेट पोशाखात रेल्वेने जात होते तेव्हा एक गोर्‍या मस्तवाल युरोपियन तेथे आला आणि गांधींना म्हणाला, ‘येथून उठ’, गांधी म्हणाले, ‘मी तिकिट घेतले, मी उठणार नाही’, तेव्हा त्या गोर्‍याने गांधींचे सामान फेकून दिले आणि म्हणाला, ‘इंडियन्स अ‍ॅन्ड डॉग्स नॉट अलाऊड’, इंडियन लोक आणि कुत्र्यांना या क्लासमध्ये बसण्याची परवानगी नाही आणि तिथेतच गांधींचा स्वाभिमान जागा झाला आणि या देशाला
अहिंसक योद्धा
मिळाला. अन्याय सहन करायचा नाही हे महात्मा गांधींच्या आयुष्याचे तत्व होते खरे पण निशस्त्र आणि दुर्बल माणसाने काय करायचे? इंग्रजांविरुद्ध लढताना नुसत्या अहिंसेने विजय प्राप्त करता येईल का, एखाद्या माणसाकडे शस्त्रच नसतील, एखादा व्यक्ती दुर्बल असेल तर त्याने कसे लढायचे, यावर मार्ग सूचवताना महात्मा गांधींनी सविनय सत्याग्रह सुरू केला. या सविनय सत्याग्रहामुळे दुबळ्यांमध्ये आंदोलनाची उर्मी आली. महिलाही आंदोलनात तेवढ्याच पद्धतीने उतरल्या. (क्रमश:)
उद्याच्या अंकात
रक्त न सांडता भारताला स्वातंत्र्य मिळालं का?

Most Popular

error: Content is protected !!