Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकापसाला पाणी लागलं, सोयाबीनच्या बुचाडाला तळ्याचे स्वरुप

कापसाला पाणी लागलं, सोयाबीनच्या बुचाडाला तळ्याचे स्वरुप


बळीराजाच्या डोळ्यातून वाहताहेत अश्रूचे पूर; जिल्हा प्रशासनाने कागदी घोडे नाचवणे बंद करावे, ठाकरे सरकारने शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी
बीड (रिपोर्टर)- गेल्या पंधरवाड्यात बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील काढलेल्या सोयाबीनच्या बुचाडाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले तर कापसाला पाणी लागल्याने कापूस पुर्णत: लाल झाला. अन्य पिकेही पावसामुळे उद्ध्वस्त झाले. शेतात जो खर्च केला, मेहनत केली ती पुर्णत: वाया गेल्याने बीड जिल्ह्याच्या बळीराजाच्या डोळ्यात अश्रूचे पूर वाहत असून अजूनही शासन-प्रशासन शेतकर्‍यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात उदासीनता दाखवत आहे. कागदी घोडे नाचवत पंचनाम्याचे थोतांड गावोगावी पहायला मिळत आहे. आता लोकांचा संयम तुटत असल्याने शासन-प्रशासनाने शेतकर्‍यांना तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.


कोरोनाच्या कार्यकाळात दोन वर्षे गेली, तिथे आर्थिक स्थिती खालावली. यावर्षी पुन्हा तेवढ्याच उमेदीने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात खरीपाची पेरणी केली, पिकेही चांगले डोलू लागले. मात्र गेल्या पंधरवाड्यात धुव्वाधार पाऊस झाला. २४ तासामध्ये अनेक ठिकाणी अकरापेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झाली. रोज पावसाचा मारा होत असल्याने शेतातील नगदी पिक असलेला कापूस हा पाण्यामुळे लाल पडला. तर उभे सोयाबीन कोंब फुटले, ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन काढले, त्याचे बुचाड लावले, त्याच्या आजुबाजुला पाण्याचे तळे साचले, अन्य पिके पावसानेच उद्ध्वस्त केले. हजारो रुपये खर्च करून, मेहनत करून पुर्णत: पाण्यात गेल्याने शेतकरी अक्षरश: मरण यातनेत असून त्याच्या डोळ्यातून अश्रूचे पूर वाहत आहेत. हा पंधरवाडा पूर्णत: मुसळधार पावसात गेल्याने शंभर टक्के शेतीचे नुकसान झाल्यानंतरही निर्णय घेण्यात ठाकरे सरकार उशीर करत आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहे. शेतीचे पंचनामे, पिक विम्याचे थोतांड, गावोगावात दिसून येत आहे. आता लोकांचा संयम तुटत आहे. घरात होतं नव्हतं ते शेतात घातलं, शेतातलं पावसाने हिरावून नेलं, आता सहा लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खिशात आणि घरात काहीच उरंलं नाही, सरकारने तातडीने मदत करण्याची गरज असून सरकार मात्र अद्यापही तातडीच्या मदतीकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकर्‍यात संताप विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!