सर्व बंडखोर सुरतमध्ये, राज्यातलं सरकार अस्थिरतेच्या काठावर
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात महत्वपुर्ण असलेल्या शिवसेनेत आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात उभारल्याने महाराष्ट्रात राजकीय धरणीकंप झाला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे 25 ते 30 आमदार घेऊन सुरतमध्ये गेल्याची माहिती रात्री शिवसेना नेतृत्वाला झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचे सरकार मान्य नसल्याचे प्रथमदर्शी सांगितले आहे. राज्यात राजकीय घडामोडींना त्यामुळे प्रचंड वेग आला आहे.
काल विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेने विरुद्ध बंडाचं निशान फडकवलं. सुरतमधील एका हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह अन्य शिवसेनेचे बंडखोर आमदार त्याठिकाणी मोठ्या बंदोबस्तात असल्याचे सांगण्यात येते. 25 ते 30 आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत असून मातोश्रीवर हे बंड शमवण्यासाठी खलबते सुरू आहेत. इकडे भाजपामध्येही प्रचंड हालचाली सुरू झाल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात महत्वपुर्ण बैठक सुरू असल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामध्ये राज्यातले महाविकास आघाडी सरकार अस्थिरतेच्या काठावर आल्याचे बोलले जाते. यासर्व घटनाक्रमातून महाष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे.
नार्वेकर, फाटक सुरतेकडे
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी शिवसेनेने मिलिंद नार्वेकर आणि रवी फाटक यांच्यावर जबाबदारी सोपविली असून हे दोघेही सुरतेकडे रवाना झाले आहेत.
सरकार योग्य चालतं म्हणून हे षडयंत्र -शरद पवार
आघाडीचं सरकार स्थापन करण्याआधी अशी बंडाळी झाली होती. सरकार अडीच वर्षेे सरकार योग्य पद्धतीने चालल्यानंतर भाजपाकडून हे षडयंत्र असल्याचे सांगत या राजकीय पेचातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाला बनवायचे हे सेना ठरवेल, क्रॉस वोटींग होऊ नये, सरकार चांगल्या पद्धतीने चालतय हा पन्नास वर्षाचा अनुभव आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं हे माझ्या कानावर नाही. सध्याचं नेतृत्व अत्यंत योग्य आहे. शिवसेनेनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू, असेही पवारांनी म्हटले.
शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता
पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून
अकोल्यात पोलीस तक्रार
शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे तक्रार दाखल, मतदानानंतर सायंकाळी 6 वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
गुजरातमध्ये एकनाथ शिंदे
थांबलेल्या हॉटेलबाहेर कडेकोट सुरक्षा
प्रत्येक वाहनाची तपासणी
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या जवळपास 13 आमदारांसोबत संपर्काबाहेर आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. दरम्यान सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणार्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.
शहा-नड्डांची महत्वपुर्ण बैठक
महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडाळीचा फायदा उचलण्या हेतू आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडून त्या ठिकाणी पुन्हा भाजपाचं सरकार आणण्यासाठी भाजपाने प्रचंड हालचालींना वेग आणला असून देवेंद्र फडणवीस दिल्लीत डेरेदाखल झाल्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नड्डांच्या घरी गेले. त्याठिकाणी दोघांची बैठक सुरू झाल्याचे सांगण्यात येते.