Monday, January 24, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- काँग्रेस तरुण होतेय का?

प्रखर- काँग्रेस तरुण होतेय का?


राजकारणात कोणाला मोठं करायचं, कोणाला खाली आणायचं हे जनतेच्या हाती असतं. ज्या राजकीय पक्षाचे नेते आपली छाप जनतेवर पाडू शकले, त्यांनी सत्तेचे स्थान मिळवलं. कधी,कधी बलाढ्य नेतृत्व पराजीत होतं, ते त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे, कधी फाटका माणुस ही सत्तेवर विराजमान होतो, हा इतिहास आहे. भारताच्या राजकारणात अशा अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात 50 वर्ष कॉग्रंेस पक्षाने एक हाती सत्ता भोगली. जिकडं, तिकडं काँग्रेसचं वारं असायचं, इतर पक्षाला राजकारणात तितकी संधी मिळत नसायची, काँग्रेसमध्ये नेहरु नंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी हे बलाढ्य नेतृत्व उदयाला आले. इंदिरा गांधी यांची जबरदस्त छाप होती, तरी त्यांना अनेक वेळा संकटाला सामोरे जावे लागले. काँग्रेसमधील गटबाजी, जनतेचा रोष, विरोधकांचा आक्रमकपणा त्यांना पत्थकारावा लागला होता. अनेक अडचणीत आल्या पण इंदिरा गांधी ह्या मागे हाटल्या नाहीत. राजीव गांधी यांच्या नंतर काँग्रेसला घरघर लागली. 1989 ला त्याची सुरुवात झाली.
आजची काँग्रेस
आज काँग्रेसची अवस्था अंत्यत वाईट आहे. काँग्रेसला चोहीकडून घेरलेलं आहे. अंतर्गत वाद आणि पक्षातील नेत्यांची नाराजी जाहीरपणे समोर येवू लागली. त्याचा फटका पक्षाला बसू लागला. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुका काँग्रेस प्रंचड मताने हरलेली आहे. बोटावर मोजण्या इतक्या जागा या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसच्या निवडून आल्या. या दोन्ही निवडणुकीत राहूल गांधी यांना पुढे करण्यात आलं होतं. राहूल गांधी हे तरुण आहेत. तरुणांवर ते नक्कीच जादू टाकलीत असा काँग्रेसचा अंदाज होता, पण तो अंदाज पुर्णंता चुकीचा ठरला. देशातील तरुणाई मोदी यांच्याकडे झुकली. दोन्ही निवडणुकीत मोदी यांना भरभरुन मताचं दान दिलं गेलं. मोदी यांनी इतिहास रचना. भाजपाला कधी नव्हे ते इतकं मोठं यश मिळालं ते मोदी यांच्यामुळेच, मोदी लाटेत भलेभले वाहून गेले. दोन्ही निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेस अजुन सावरलेली नाही. काँग्रेसला अजुन सुर सापडलेला नाही. काँग्रेस अध्यक्षपदाचा राहूल गांधी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. प्रभारी म्हणुन सोनिया गांधी यांच्याकडे हे पद आहे. एवढ्या मोठ्या पक्षाला कायमचा अध्यक्ष नसावा ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. काँग्रेसचं अध्यक्षपद द्यायचं कोणाकडे हे अजुन निश्‍चीत झालेलं नाही. गांधी कुटूंबा व्यतिरिक्त इतरांना अध्यक्षपद मिळेल का? हा ही प्रश्‍नच आहे. इतरांना पद दिल्यानंतर त्याचा फायदा पक्षाला होईल का? याचं चिंतन आणि मंथन कधी काँग्रेस करणार आहे की, नाही? पराभव झाला म्हणुन मागे हाटायचं नसतं. यश आणि अपयश येत असतं. अपयश आलं तर त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. पराभव झाला म्हणुन मैदान सोडणं हे काही योग्य नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणुन राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. पराभवातून बरचं काही शिकता येतं हे सुत्र राजकारणात लक्षात असायचं हवं.
कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये
जेएनयुचा माजी नेता कन्हैया कुमार याने काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. त्याच्या सोबत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस प्रवेश केला. कन्हैया कुमार चर्चेत आला तो जेएनयुच्या एका कार्यक्रमातून, त्यानंतर त्याच्यावर विविध आरोप, प्रत्यारोप झाले. कन्हैया हा डाव्याचा ‘हिरो’ झाला होता. डावे पक्ष राजकारणातून संपल्यागत झालेले आहे. अशा परस्थितीत कन्हैय्या सारखा नेता उदयास येणं हे डाव्यासाठी भाग्याचचं म्हणावं लागेल. 2016 साली कन्हैय्याचा उदय झाला. त्यांच्या विरोधात उजवे ही तितक्याच आक्रमणपणे उतरले होते. त्यांना जशास तसे उत्तर तो देवून, विरोधकांना पुरुन उरत होता. त्याची बोलण्याची शैली, अभ्यास पुर्ण भाषण यामुळे तो डाव्या विचाराच्या आणि एकूणच समाजवादी विचाराच्या तरुणांना आणि लोकांना भावला. त्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असे, त्याला अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आमंत्रण मिळत होतं. वृत्तवाहिन्यावर त्याला चांगली मागणी असायची,अवघ्या काही कालावधीत कन्हैया चर्चेत आलेला युवा नेता होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षाने त्याला बिहारच्या बेगूसराय येथून उमेदवारी दिली होती. कन्हैयाच्या प्रचाराला देशभरातील डाव्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि काही सिनेअभिनेते, अभिनेत्री बेगुसरायमध्ये दाखल झाले होते. त्याला आर्थिक मदत ही देण्यात आली होती, पण त्याचा पराभव झाला. त्याला तेथील समविचारी पक्षांनी तितकी साथ दिली नाही, म्हणुन त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. एखाद वेळेस त्याच्या विजयाची तेथील प्रस्थापीतांना भीती ही वाटत असेल, म्हणुन की काय त्याला मदत केली नसेल. डाव्या पक्षात जडण-घडण झाल्यानंतर कन्हैयाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच्या या कॉग्रेस प्रवेशाने अनेकांना आश्‍चर्य वाटलं. राजकारणात काही ही होवू शकतं हे यातून दिसून आलं. आपलं भवितव्य घडवण्यासाठी कन्हैय्याने काँग्रेसची वाट धरली असावी.
तीन तरुण नेते
काँग्रेसला जितकं बदनाम करता येईल तितकं बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. विशेष करुन राहूल गांधी यांची टिंगल टवाळी देखील भाजपा नेहमीच करत आलेला आहे. काँग्रेसला एकमेव चेहरा आहे तो राहूल गांधी यांचा, सोनिया गांधी यांचे वय झाले, त्यामुळे त्या तितक्या राजकारणात सक्रिय दिसत नाहीत. प्रियंका गांधी ह्या मर्यादीतच राजकारणात दिसतात. काँग्रेसची सर्व जबाबदारी राहूल गांधी यांच्यावर आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या काही नेत्यांनी इतर पक्षाचा हात धरुन पक्षांतर केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये जे काही नेते राहिले आहेत. त्यांचा दोन डगरीवर होत असतो. भाजपाने अनेकांच्या मागे ईडी, सीबीआयचा भुंगा लावला. त्याची भीती काही प्रस्थापीत मंडळींना आहे. त्यामुळे काहींनी कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी भाजपात जाणं पसंद केले. काहींचे आतून भाजपासोबत संबंध आहेत हे लपून राहिलं नाही. जे निष्कलंक आहेत. अशांना आपलं भवितव्य दिसत नसल्याने ते ही थोडे विचलीत दिसतात. अशा संकटाच्या काळात काँग्रेसमध्ये कुणी प्रवेश करतयं हा मोठा दिलासा म्हणायचा, कन्हैया कुमार यांच्या सोबत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुजरात हे राज्य मोदी, शहा याचं आहे. या राज्यात पंचवीस वर्षापासून भाजपाचीच सत्ता असून गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगला फटका बसला. सत्ता भाजपाच्या ताब्यात आली असली तरी भाजपाचं जनमत कमी झालं, जिग्नेश मेवाणी हे अपक्ष म्हणुन निवडून आलेले आहेत. त्यांचे सामाजीक कार्य पाहून लोकांनी त्यांना निवडून दिलं. मेवानी हे सतत मोदी,शहा यांच्यावर टिका करत असतात. ते कधी सत्तेला घाबरले नाहीत. एक तरुण चेहरा म्हणुन गुजराचे समविचारी त्यांच्याकडे पाहत आहेत. त्यांच्यामुळे काँग्रेसला फायदाच होईल हे ही तितकेच खरे आहे. त्यांच्या जोडीला हार्दिक पटेल आहे. पटेल यांनी यापुर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. पटेल यांनी आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं. अगदी कमी वयात त्यांच्या पाठीशी एवढा मोठा जनसुमदाय हा भाजपासाठी नक्कीच हादरा आहे. जातीचं समीकरण समोर ठेवून गुजराचा मुख्यमंत्री बदलण्यात आला. ही धास्ती नक्कीच भाजपाने हार्दिक पटेल यांची घेतली असावी, काँग्रेसला गुजरात मध्ये जिग्ननेश मेवाणी, आणि हार्दिक पटेल हे दोन युवा नेते मिळाले. या दोन्ही तरुण नेत्यांमुळे गुजरात काँग्रेसला बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.
भग्न वाडा
काँग्रेसची अवस्था भग्न वाडयासारखी झाली. वाड्याला चोहीकडून चिरा पडल्या. या चिरा बुजवण्याऐवजी वाड्याला आणखी भनदाड पडतयं का? याचा प्रयत्न काँग्रेसमधीलच काही मंडळीकडून होत आहे, ही आश्‍चर्याची बाब आहे. ज्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगली, त्यांनी संकटाच्या काळात कॉगे्रंेसला वार्‍यावर सोडलं. राज्यात आणि जिल्हा पातळीवर पक्ष वाढवण्याची जबाबदारी ज्या नेत्यावर असते, त्या नेत्यांनी पक्ष वाढवण्याऐवजी स्वत:चा विस्तार वाढवला. त्यात पक्ष मागे पडला, आणि नेते फक्त समोर येत राहिले. ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्या सारखी बडी मंडळी कधी काळी कॉग्रंेस पक्षात होती. मात्र काळाच्या ओघात ही मंडळी बाहेर पडली आणि त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. यामुळे काँग्रेसला बराच फटका बसला. काँग्रेसने काळाच्या प्रवाहासोबत प्रवास करणं नेहमीच टाळलं. परस्थितीनूसार निर्णय घेतले गेले नाही. त्यामुळे अनेकांनी काँग्रेसचा हात सोडून इतर पर्याय निवडले, ही कॉग्रंेसची चुक आहे. काही बाबतीत योग्य निर्णय घेणे हे पक्षाच्या हिताचे ठरत असतात ते घेतले गेले नाही. जेव्हा नुकसान झाले तेव्हा जुन्या चुका दिसून आल्या. काँग्रेससोबत सर्वच जाती,धर्माचे लोक मोठया प्रमाणात होते, आज ते तितक्या प्रमाणात नाहीत. काँग्रेस हा सर्वाचा पक्ष म्हणुन ओळखा जात होता. आज तो फक्त काही ठरावीका पुरताच मर्यादीत राहिला आहे. देशात एक ही असं गाव नव्हतं तेथे काँग्रेस नव्हतं. आज जिल्हा परिषद सर्कलमध्ये कॉग्रेसला शोधावे लागत आहे. काँग्रेसने जुन्या नेत्यांना आजही बाजुला ठेवले नाही. त्यामुळे नवे कार्यकर्ते प्रवाहात आले नाहीत. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसने संधी दिली असती तर इतके नुकसान आज काँग्रेसला पाहण्याची वेळ आली नसती. पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्ते जोडण्याची हातोटी असली पाहिजे. ज्या नेत्याला कार्यकर्ते जोडता येतात. तो नेता राजकारणात अपयशी ठरत नाही. फक्त सोशल मीडीयाच्या माध्यमातून भाजपाने तरुणांची फळी निर्माण केली. आज मोदींना टक्कर देणारा देशात दुसरा नेता नाही, पण राहूल गांधी हे मोदींना टक्कर देवू शकतात. राहूल गांधी यांना आपल्या पक्षातील विस्कटलेली घडी सुधरावी लागेल. तरुणांना जास्तीत जास्त जोडण्याचं काम करावं लागेल. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल हे तरुण नेते आपल्या राज्यात बरचं काही करुन दाखवणारे नेते आहेत. या तरुणांच्या पाठीशी मोठी तरुणाई उभी राहू शकते, तितकी त्यांच्यात धमक आहे. आता या तरुण नेत्यांना काँग्रेसमध्ये कशा पध्दतीने सन्मान मिळतो यावर बरच काही अवलंबून आहे. काँग्रेसमधील काही दृढ्ढाचार्य आपल्याच पक्षावर टिका टिपन्नी करुन स्वत;च आणि पक्षाचं हसू करुन घेवू लागले. दृढ्ढाचार्यांना बाजुला सारुन 130 वर्षाच्या काँग्रेसने तरुणांना संधी दिली तर नक्कीच बदल होऊ शकतो!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!