Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडदौर्‍यादरम्यान मुख्यमंत्र्यांचा केंद्रेकरांना फोन केंद्रेकरांनी सांगितलं, शेतकर्‍यांचं उद्ध्वस्त भयावह वास्तव

दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्र्यांचा केंद्रेकरांना फोन केंद्रेकरांनी सांगितलं, शेतकर्‍यांचं उद्ध्वस्त भयावह वास्तव


भाटसांगवीच्या पुलाचा, ईरगावच्या कोल्हापूर बंधार्‍याचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मागितला प्रस्ताव, दोन्ही प्रश्‍न तात्काळ मार्गी लागणार
बीड (रिपोर्टर)- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी काल शेतात पोतात, राना-वणात चिखल तुडवित शेतीच्या नुकसानीची पाहणी करत असताना अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांना फोन आला. परिस्थितीचा आढावा घेत असताना केंद्रेकरांनी या भागातलं शेतकर्‍यांचं भयावह वास्तव सांगितलं. त्याचबरोबर भाटसांगवी येथील वाहून गेलेला पूल आणि ईरगाव येथील बंधार्‍याबाबतची माहिती देत हे दोन्हीही कामे तात्काळ करावे लागतील, असे सांगताच मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे प्रस्ताव तात्काळ पाठवण्याच्या सूचना आयुक्तांना दिले. केंद्रेकरांच्या दौर्‍याचा सकारात्मक परिणाम शासन दरबारी दिसून येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रेकर यांच्यात झालेल्या संवादातून दिसून येते.


विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर काल गेवराई, बीड, शिरूर तालुक्यात शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते. नांदूर हवेली, माळापुरी, कुर्ला, भाटसांगवी, औरंगपूर या भागातून पाहणी करत ते नागापूर (खुर्द) येथील एका शेतात जेवण करण्यासाठी थांबले असता त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन केंद्रेकर यांना आला. या वेळी केंद्रेकरांनी बीड जिल्ह्यातल्या शेतातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांची इत्यंभूत माहिती दिली. शेतात पिक उभे असले तरी ते पाण्यात असल्याने त्याला काहीच येणार नाही, जी परिस्थिती बीड जिल्ह्यातली आहे तीच परिस्थिती मराठवाड्यातली असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर भाटसांगवी येथील वाहून गेलेला पूल आणि ईरगाव येथील कोल्हापूर बंधार्‍याबाबत माहिती दिली. सदरचे दोन्ही प्रश्‍न तात्काळ मार्गी लावणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कामांचे प्रस्ताव तात्काळ पाठवण्याच्या सूचना आयुक्त सुनिल केंद्रेकरांना दिल्या. पाच ते सात मिनिटांच्या या संभाषणात मुख्यमंत्र्यांनी बीडसह मराठवाड्याचा आढावा केंद्रेकर यांच्याकडून घेतला. केंद्रेकरांच्या दौर्‍यामुळे शासन दरबारी शेतकर्‍यांची वस्तूस्थिती पुन्हा एकदा गेल्याने शेतकर्‍यांना याची मोठी मदत होईल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!