Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- रक्तरंजीत स्वातंत्र्याचा रक्ताळलेला महोत्सव

अग्रलेख- रक्तरंजीत स्वातंत्र्याचा रक्ताळलेला महोत्सवगणेश सावंत
मो. नं. 9422742810
रक्ताचे पाट वाहून बलीदान देत स्वत: च्या घरावर तुळशीपत्र ठेवणार्‍या देशवासियांचा आजचा स्वातंत्र्य महोत्सव रक्ताळलेला होवून बसलाय. स्वातंत्र्य पुर्व काळात जो रक्त मासाचा चिखल व्हायचा तो नतदृष्ट पांढरतोंड्या इंग्रजांच्या जुलमातून. त्या रक्त मासाच्या चिखलातूनच स्वातंत्र्याचे कमळ फुलले अन् भारत मातेच्या अंगाला गुंडाळलेल्या पारतंत्र्याच्या बेड्या निखळून पडल्या. त्या रक्त मासाचा विजयी तिलक आजही मोठ्या गर्वाने देशवासियांच्या भाळी ठळकपणे दिसतो. परंतू आज ज्या सत्ताधार्‍याची निशाणी कमळ आहे त्याच सत्ताधार्‍यांच्या दहशत गर्दीतून देशात जेंव्हा रक्तमासाचा चिखल तुडवण्याचे दुर्भाग्य देशवासियांच्या पदरी पडते तेंव्हा देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहत नाही आणि आज तोच संताप सत्ताधारी भाजपाच्या विरोधात गल्ली ते दिल्ली पहावयास मिळतो. आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांकडे आणि त्यांच्या आंदोलनाकडे डुंकूनही न पाहणार्‍या या सत्ताधिशांकडून शेतकर्‍यांची जी अवहेलना होत आहे ती संतापजनकच. अवहेलनेपेक्षा शेतकर्‍याच्या आंदोलनाला आंदोलनजिवी म्हणून हिनवले जाते हे त्यापेक्षाही अधिक संतापजनक. यापुढे जात भाजपाच्या मंत्री पुत्राकडून जेंव्हा शेतकर्‍यांना चिरडले जाते, त्यांच्या अंगाच्या चिंधड्या उडवल्या जातात हे तर अधिकाधिक संतापजनक. असे होत असतांना एकीकडे आम्ही स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत आहोत तर दुसरीकडे शेतकरी स्वातंत्र्याच्या रक्त महोत्सवात नाहून निघत आहेत. हे या देशाचे दुर्भाग्य नव्हे तर या देशाच्या भविष्याचा ‘शंखनिनाद’ म्हणावा लागेल. हा शंखनिनाद सत्ताधार्‍यांच्या दहशतगर्दपणाच्या विरोधातला असेल यात दुमत असण्याचे कारण नाही. हा देश आजही तेवढाच स्वाभिमानी, अभिमानी, कर्तबगार, आहे. याची जाणीव बहुदा सत्तेच्या मदमस्तीत पिसळलेल्या हत्तीगत वागणार्‍या सत्ताधारी भाजपाला नसावी. जेंव्हा या देशातला तरूण पेटून उठेल आणि या पिसाळलेल्या हत्तीचे गंडास्थळ फाडून काढील तेंव्हा कुठं शेतकर्‍यांच्या बलिदानाचे महत्त्व सत्ताधार्‍यांना पटेल.
लखीमपुर खैरीत
गेल्या आठवड्यात जे काही घडलं ते अधिक संतापजनक म्हणावं लागेल. शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी रस्त्याने जात होते. शेतकर्‍यांचं हे आंदोलन गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारसाठी डोके दु:खी ठरलेलं. उत्तर प्रदेशातल्या लखीमपुरात हे आंदोलन होत असल्याने राज्यात योगी आणि देशात मोदीचे राज्य असल्याने आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही या अपार विश्‍वासात केंद्रीय मंत्री अजय मिश्राच्या कारट्याने थेट शेतकर्‍यांच्या अंगावर थार गाडी घातली. पाठी मागून भरधाव वेगता जाणीवपूर्वक येणार्‍या मंत्री पुत्राला रस्त्यावरून चालणारे शेतकरी दिसले नाहीत. त्याने सरळ किड्या,मुंग्यांवर गाडी घालावी तशी जिवंत चालत्या-बोलत्या माणसांवर त्याने गाडी घातली. अक्षरश: 8 लोक यात मृत्युमुखी पडले. घटनास्थळी रक्त मासाचा चिखल झाला. यात मरणारे कोण होते? याची वर्गवारी करण्याचा बदमुर्खपणा याच भाजपीय सरकारने केला. चार शेतकरी होते, तीन अन्य कोण होते, एक पत्रकार होता असं म्हणत या हत्याकांडाला अपघाताचे स्वरूप देवू पाहत माणसाच्या मृत्यूची वर्गवारी करणार्‍या या सरकारला त्या ठिकाणी देशवासियांचं सांडलेलं रक्त दिसलं नाही हे सर्वात मोठं दुर्दैवं. या घटनेनंतर तो मी नव्हेचा नारा लावण्यात येवू लागला. जेंव्हा व्हिडीओ समोर आला तेंव्हा केंद्रीय मंत्री अजय मिश्राला होय ही आमचीच गाडी असे म्हणावे लागले. त्यानंतर काल-पर्वा त्याचा पुत्रही पोलीसांसमोर आला. दुर्दैवं याचं वाटतं, सत्तेच्या मस्तीत देशवासियांना किड्या,मुंग्यागत चिरडणार्‍या गुन्हेगाराला सत्ताधारीच पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असतील आणि शेतकर्‍याच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून जात, पात, धर्म, पंत याच्या टिर्‍या बडवून घेत असतील तर या पेक्षा या देशाचे दुर्दैवं काहीच नसेल. जगाच्या पाठीवर भारताला महासत्ताक करण्याची गगनभेदी घोषणा देणारे पंतप्रधान
नरेंद्र मोदी
जगाच्या पाठीवर जिथे जातील तेथे सद्गुणाची परंपरा, संस्कार आणि संस्कृतीची भाषा करतात, भाषणे देतात. परंतू लखीमपुर खैरीत शेतकर्‍यांची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. लखीमपुर खैरीत अक्षरश: रक्त मासाचा चिखल झाला तरीही नरेंद्र मोदी यावर भ्र शब्द काढत नाहीत, भाष्य करत नाही. बीडच्या पोलीस दलातला कुत्रा मरण पावला त्याची दखल नरेंद्र मोदींनी घेतली परंतू जिवंत चालत्या बोलत्या शेतकर्‍यांना भाजपाच्याच मंत्र्याच्या पोराने आपल्या गाडीखाली चिरडले, त्यांच्या अंगातून रक्क्ताच्या चिळकांड्या उडाल्या त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हृदय हेलावलं नाही, डोक्यात झिणझिण्या आल्या नाहीत, कंठ दाटला नाही, डोळ्यात आश्रू आले नाही की साधी भोवळही आली नाही? नाही तेंव्हा, नाही विषयात देशाच्या नव्हे तर परदेशातल्या व्यासपीठावर नरेंद्र मोदींचे अनेक वेळा कंठ दाटून आले. अनेक वेळा त्यांच्या आश्रूला बांध फुटले मात्र शेतकरी धारातिर्थ पडला. तिथं मोदींना काहीच वाटलं नाही. मोदींच्या या वागण्यावरूनच देश कुठल्या दिशेने जातोय? हे सुर्य प्रकाशा इतके स्पष्ट आणि स्वच्छ देशवासियांना दिसून येते. यापेक्षाही मोठं दुर्दैवं मोदींच्या कार्याचा गवगवा करणारे, नमो-नमो म्हणत रूग्ण झालेले भक्त या विषयात जेंव्हा बोलत नाहीत तेंव्हा अशा लोकांसाठी एवढे तुम्ही षंढ कसे, पायाखाली आग तरी थंड कसे? हा संतापजनक सवाल विचारावा लागेल. शेतकर्‍यांच्या मृत्यूवर राजकारण करणारे आणि शेतकर्‍यांच्या मृत्यूला दुर्लक्षित करत
काश्मिर आणि लखीमपुर
यांची बराबरी करणारे बदमुर्ख लोक आज जेंव्हा इथं पहायला मिळतात तेंव्हा तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. काश्मिरात गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे, काश्मिर खोर्‍यामध्ये ओळखपत्र पाहून काश्मिर पंडितांची आणि शिखांची हत्या केली जात आहे. हे सत्ताधारी भाजपाचं अपयश नव्हे काय? ज्यांनी 370 कलम रद्द केल्यामुळे काश्मिर पंडितांची वापसी होत असल्याचा ढोल बडावला. आता काश्मिर खोरं सुरक्षित असल्याचा बडेजावपणा केला, काश्मिरात सर्व काही अलबेल असल्याचा देखावा देशासमोर आणि जगासमोर आणला. त्याच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या बाशिंद्यांना तिथलाही रक्त महोत्सव दिसला नाही का? या उलट लखीमपुर मधल्या शेतकर्‍यांचा रक्त मासाचा चिखल दिसतो, काश्मिर पंडितांचे रक्त दिसत नाही? असा हस्यास्पद सवाल जेंव्हा जातीयवादी बदमुर्ख, हरामखोर विचारतात तेंव्हा संताप आल्याशिवाय राहत नाही. काश्मिर असो या कन्याकुमारी, दिल्ली असो या गल्ली या देशात राहणार्‍या प्रत्येक जात, पात, धर्म, पंताच्या माणसाच्या जान आणि मानची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही सत्ताधिशांची असते. लखीमपुरात हिंदुंची हत्या होतेय, त्याचं दायित्व केंद्र सरकारने घ्यायला हवं, लखीमपुरात भारतीय जनता पार्टीच्या नुमंद्याकडून शेतकर्‍याची हत्या होतेय त्याचं दायित्व ही केंद्र सरकारनेच घ्यायला हवं. एकीकडे स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत असल्याचं दिसत असलं तरी हा महोत्सव रक्तरंजीत स्वातंत्र्याचा रक्ताळलेला महोत्सव होतांना दिसून येत आहे. अशा वेळी धर्माचे पाळण अन् पाषांड खंडन करण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने आता उभं रहावं लागेल. इंग्रजांना पळताभुई करतांना जो रक्तपात झाला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो रक्त तिलक लावून विजयोत्सव साजरा केला त्या विजय उत्सवाची लाज राखण्याची वेळ आता आली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं अथवा गैर वाटणार नाही. आज देशभरात आपण स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत आहोत. हा महोत्सव साजरा करताना काश्मिरातले दहशतवाद्यांकडून होत असलेले हत्याकांड आणि उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजप मंत्र्याच्या पुत्राकडून झालेली शेतकर्‍यांची हत्या हे या महोत्सवातले सत्य देशाला ओरडून सांगत आहे. रक्ताळलेल्या स्वातंत्र्य महोत्सवाची कथा.

Most Popular

error: Content is protected !!