Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईशेतकर्‍याच्या संतापाची खदखद रस्त्यावर, आ.लक्ष्मण पवारांच्या नेतृत्वात गेवराईत सर्व पक्षीय मोर्चा

शेतकर्‍याच्या संतापाची खदखद रस्त्यावर, आ.लक्ष्मण पवारांच्या नेतृत्वात गेवराईत सर्व पक्षीय मोर्चा


उद्धवस्त शेती पिकांची सरसकट 50 हजाराने नुकसान भरपाई द्या
पश्‍चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विशेष पॅकेज जाहिर करा

गेवराई (रिपोर्टर):- गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, शेतातील उभे पिके, नागरिकांची रहाती घरे, पशु धन, रस्ते, पुल व तलाव, शेततळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई पोटी सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. मात्र शेतकर्‍यांना भरघोस मदत मिळावी यासाठी झोपलेल्या या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज गेवराई येथे आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय भव्य संताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला तालुक्यातील विविध पक्ष संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
या संताप मोर्च्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देवून गेवराई विधानसभा मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करणे, पिक नुकसानीचे शेतकर्‍यांना
सरसकट 50 हजार रू मदत द्या, अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमीनीला हेक्टरी 38 हजार रूपये मदत द्या, फुटलेले तलाव व धोका सदृष्य स्थितीमधील तलावांची दुरुस्ती करणे, बाहुन गेलेले रस्ते व पुलांची दुरुस्ती करणे, पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर विशेष पॅकेज जाहीर करा, विद्यार्थ्यांची शैक्षणीक फिस माफ करा, सक्तीची कर्ज वसुलो व विज बिल वसुली थांबवून, गायरान धारक शेतकर्‍यांना नुकसानीचे अनुदान द्यावे अशा मागण्या घेऊन हा भव्य संताप मोर्चा काढण्यात आला सकाळी 11 वा.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघालेला हा मोर्चा शास्त्री चौक, बेदरे गल्ली, मेनरोड, चिंतेश्वर गल्ली या मिरवणूक मार्गे थेट तहसिल कार्यालयावर धडकला. यावेळी आ. लक्ष्मण पवार, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जे.डी. शहा, युवा नेते शिवराज पवार, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, ऍड.सुरेश हात्ते, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, उद्धव खाडे, शेतकरी संघटनेचे रामेश्वर गाडे, शेतकरी नेते अशोक भोसले, किसान आघाडीचे देविदास फलके, जि.प.सदस्य पांडुरंग थडके, प्रल्हाद माने, पंचायत समिती सभापती दीपक सुरवसे, पंचायत समिती सदस्य प्रा.शाम कुंड, संजय जाधव, अनिल पौळ, सिद्धार्थ नरवडे, राजेंद्र भंडारी, राहुल खंडागळे, सचिन मोटे, कृष्णा मुळे, मनसे तालुकाप्रमुख जयदीप गोल्हार, शेतकरी नेते किशोर हिंदोळे यांच्यासह विविध पक्षाचे नेते , पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


आघाडी सरकारने शेतकर्‍याची
चेष्टा केली-आ.लक्ष्मण पवार


बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या पीकाचे अतोनात नुकसान झाले म्हणण्यापेक्षा शेतातले सर्व पीके उद्धवस्त झाले. असे असतांना आघाडी सरकारने गडबडीत जाहिर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकर्‍यांची एकप्रकारे चेष्टा आहे. अतिवृष्टी सारख्या आस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍याच्या तोंडाला पाने पुसण्याची काम आघाडी सरकार करत आहे. सरकारने केलेली ही मदतीची घोषणा निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप आ.लक्ष्मण पवारांनी यावेळी केला. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी आयोजित सर्व पक्षीय संताप मोर्चाला ते संबोधीत करत होते. यावेळी राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी होत होती.

Most Popular

error: Content is protected !!