Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईशेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी जयभवानीची कार्यक्षमता वाढवली - अमरसिंह पंडित

शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी जयभवानीची कार्यक्षमता वाढवली – अमरसिंह पंडित

जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन समारंभा संपन्न

गेवराई (रिपोर्टर)-मागील गळीत हंगामात ऊसाची एफआरपी 1968 रुपये असताना आपण संपुर्ण ऊसाचे पेमेंट 2000 रुपयेप्रमाणे केले असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी मशिनरीमध्ये मोठे बदल केल्यामुळे कारखान्याची कार्यक्षमता वाढली आहे. याचा फायदा ऊस बागायतदार, ऊसतोड कामगार, वाहतुक ठेकेदार आणि कारखाना कर्मचारी या सर्वांना होणार आहे, त्यामुळे या हंगामात देखील ऊसाला अधिकचा भाव देण्यात येईल. जयभवानी कारखाना पंडितांच्या मालकीचा नाही तर तुमच्या मालकीचा आहे. तेंव्हा सर्वांनी प्रमाणिक व शिस्तीत काम करून जयभवानी पुन्हा एकदा नावारुपाला आणा असे आवाहन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. जयभवानी कारखान्याच्या 2021-2022 या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभात ते बोलत होते.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 चा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.महादेव महाराज यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्या उपस्थितीत विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार, दि.15 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. महादेव महाराज व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक भास्करराव खरात यांच्याहस्ते बॉयलरचे विधीवत पूजन करून उपस्थित मान्यवरांच्याहस्ते बॉयलरचे अग्नि प्रदिपन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माजी उपाध्यक्ष पाटीलबा मस्के, संचालक भाऊसाहेब नाटकर, सभापती जगनपाटील काळे, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, अप्पासाहेब गव्हाणे, महम्मद गौसभाई, श्रीराम आरगडे, शिवाजी कापसे, साहेबराव पांढरे, जगन्नाथ दिवान, कुमारराव ढाकणे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, जयभवानी कारखान्यातील बॉयलर, टर्बाईन आदी मशिनरीमध्ये बदल केल्यामुळे कार्यक्षमता वाढली आहे. यावर्षी झाले नाही तरी पुढील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये पाच ते साडेपाच हजार मेट्रीकटन ऊसाचे गाळप करू, आपण सर्वांनी शिस्तीत आणि कार्यक्षमतेने काम केले तर 2022-23 च्या गळीत हंगामात दहा लाख मेट्रीकटन ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन केले जाईल. यावेळी एफआरपी नुसार भाव दिला आणि यापुढेही दिला जाईल. येथे इथेनॉलचे भाव मार्केटमध्ये वाढल्यामुळे इथेनॉलचे उत्पादन जास्त प्रमाणात केले जाईल. जेणेकरून शेतकर्‍यांचे हित त्यामध्ये जपले जाईल. ऊस बागायतदार शेतकर्‍यांचे सर्वांनी हित जपावे, पैसे घेवून काम केले तर ते सहन केले जाणार नाही. जयभवानीचा उत्कर्ष व्हावा, पुन्हा एदा या कारखान्याचे नाव महाराष्ट्रात व्हावे यासाठी सर्वांनी शिस्तीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्षेत्रात ऊसाच्या नोंदी झालेल्या आहेत, त्यामध्ये आता बदल केले जाणार नाहीत. 30 डिसेंबर पर्यंत नोंदणीचा कार्यक्रम तयार झालेला आहे त्यामध्ये बदल होणार नाही. नियोजनाप्रमाणे नियमाला धरूनच हे काम केले जाईल. एखाद्या विरोधकाचा ऊस असेल आणि त्याची नोंद झालेली असेल तो उचलला जाईल तेथे राजकारण केले जाणार नाही. 11 पर्यंत रिकव्हरी आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे असे सांगून मशिनरीमध्ये बदल करताना कर्मचार्‍यांनी अधिकचा वेळ देवून कारखाना गाळप करण्यासाठी तयार केला. त्यांचे कौतुक करून कर्मचारी आणि कामगारांनी जीव ओतून काम करावे असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी शुभाशिर्वाद देताना ह.भ.प.महादेव महाराज म्हणाले की, माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांनी सेवाीावी विचाराने आर्थिक, सहकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सर्वांना सोबत घेवून काम केले. जयभवानी कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणून त्यांचा संसार उभा केला. पंडित घराण्याचा हा आदर्श सेवाभावी वृत्तीचा असून पुढील काळामध्ये या परिवाचाराची आणि जयभवानीची उत्तरोत्तर प्रगती होवून आदर्श सेवा देणारा कारखाना म्हणून पुन्हा एकदा नावारुपाला येईल असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन ठोसर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी बॉयलरचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल अंगद पवार या कर्मचार्‍याचा संचालक रामराव लोणकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किसान सेलचे सुनिल पाटील, विकास सानप, भारत पंडित, अ‍ॅड.एस.एच.पाटील, बंडू मोटे, शेख मिनहाज यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप तसेच अधिकारी, कर्मचारी, कामगार, ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!