मुंबई (रिपोर्टर) शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकारबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून विधानसभा बरखास्तीच्या मार्गावर प्रवास करत असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 आमदार असल्याचा दावा करत आणखी आमदार आपल्याकडे येणार असल्याचे म्हटले तर सुरतहून नागपूरला परतलेले शिवसेना आमदार चव्हाण यांनी आपणास कुठलाही अटॅक आला नसल्याचे सांगून आपल्याला कुठले तरी इंजेक्शन दिले, असे म्हणत आमदारावर दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला. हा सर्व प्रकार भाजपाकडून घडवून आणला जात असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत असून मंत्रीमंडळाची महत्वपुर्ण बैठक आता सुरू झाली आहे. या बैठकीला शिवसेनेचे केवळ तीन मंत्री उपस्थित आहेत.
सुरतेत दाखल झालेल्या बंडखोर आमदारांनी भाजपाच्या मदतीने थेट गुवाहाटी दाखवल्यानंतर आणि तेथील बंडखोरांचे संख्याबळ अधिक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. कुठल्याही क्षणी सरकार पडेल, असे चिन्हे दिसून येत असतानाच थेट विधानसभाच बरखास्तीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होत असताना जोपर्यंत सर्व आमदार मुंबईला परतत नाहीत तोपर्यंत सरकार कुठलाही निर्णय घेणार नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले. राज्यात प्रचंड अस्थिरता असून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात बैठका सुरू आहेत. ठाकरे मंत्रिमंडळाची महत्वपुर्ण बैठक सुरू झाली असून या बैठकीला उद्धव ठाकरे हे ऑनलाईन सहभागी झाले आहे तर शिवसेनेचे केवळ तीन मंत्री या बैठकीला उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. दस्तुरखुद्द आदित्य ठाकरेही या बैठकीला उपस्थित नाहीत.
राजीनामा द्यायचा की नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील -एकनाथ शिंदे
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, सत्तेसाठी हिंदुत्व सोडणार नाहीत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ असल्याचे सांगून आज संध्याकाळी आमची बैठक होणार आहे. सर्व आमदार काय म्हणतात, या बैठकीमध्ये काय ठरते त्यानंतर पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे शिंदेंनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील का या प्रश्नावर शिंदे म्हणाले, राजीनामा द्यायचा की नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील. उद्धव ठाकरेंना तुम्ही नेता मानता का? हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी फोन कट केला.
बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसेनेची कारवाई सुरुच
शिवसेना नेता एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे निशान फडकवल्यानंतर तात्काळ त्यांच्याविरुद्ध शिवसेनेने कारवाई केली. अन्य बंडखोर आमदारांबाबत शिवसेनेने कुठलीही कारवाई केली नव्हती, आज मात्र शिवसेनेने बंडखोर आमदारांना पत्र पाठवले आहेत. आज सायंकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीला उपस्थित रहा, बैठकीस गैरहजर राहिल्यानंतर आपण स्वखुशीने शिवसेना सोडत आहात, असे समजून आपल्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशा आशयाचे पत्र संबंधित आमदारांना दिले आहेत.