भंडारा उधळून आजपासून राज्यभर एल्गार -भारत सोन्नर
बीड (रिपोर्टर): मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यातील शिंदे – फडणवीस – पवार सरकारच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.
धनगर समाज सुद्धा आता पेटून उठला असून रस्त्यावर उतरून राज्य सरकारला जाब विचारणार असल्याचे यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी म्हटले आहे. आतापर्यंत केवळ आश्वासनावर धनगर समाजाची बोळवण करण्यात आली मात्र आता शांत बसणार नाही. आता काठी अन् घोंगड हातात घेऊनच रस्त्यावर उतरून राज्य सरकारला जाब विचारू असा इशारा सोन्नर यांनी दिला असून माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथून आज दि.5 सप्टेंबर पासून भंडारा उधळून राज्यभर एल्गार करणार असल्याचे भारत सोन्नर यांनी सांगितले.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी कायमस्वरुपी बाजूला ठेवली. धनगर समाजाने काय घोडे मारले ? आजही राज्यातील 50 पेक्षा अधिक विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची ताकद निर्णायक आहे.
मात्र धनगर समाजावर सातत्याने अन्याय केला जात आहे. डोंगर भागात राहणार्या धनगरांना वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. फक्त धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवायचा, नंतर वापरा आणि फेका ही निती आता सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. राजकारण्यांना केवळ निवडणुकीपुरता या समाजाच्या वेदनांची जाणीव होते.
आश्वासने दिली जातात , गोड गोड बोलून मते पदरात पाडून घेतली जातात मात्र मूळ मुद्द्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. धनगर समाजाच्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिधिनींकडून देखील यासाठी कसलेच प्रयत्न होत नाहीत. धनगर समाजाच्या एकाही प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा कोणताही निर्णय घेतला नाही. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसह मेंढपाळांचे रखडलेले प्रश्न, अनेक धनगर वस्त्या आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे समाज आता पेटून उठणार आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथून भंडारा उधळून एल्गार करण्यात येत आहे. आता आरक्षण घेतल्या शिवाय माघार नाहीच असे भारत सोन्नर यांनी स्पष्ट केले.