Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- ‘आम्ही स्वप्नाळू’

अग्रलेख- ‘आम्ही स्वप्नाळू’


गणेश सावंत
मो. नं. 9422742810
काँग्रेसमुक्त भारताचा अजेंडा घेवून दिल्ली तक्तावर अधिराजीत असलेल्या मोदी सरकारला सत्तेच्या लालसेने अक्षरश: पछाडून सोडले. कुठलेही राज्य असो ते आपल्याच अमलाखाली असावं, या इच्छेखातीर ईर्ष्येला जवळ करत त्या त्या राज्यात आपलं अधिराज्य काबीज केलं. युद्धात आणि राजकारणात सर्वकाही क्षम्य असतं, इथपर्यंत ठिक परंतु राजकीय स्वार्थ आणि सत्तेची हाव जिथं कणा कणात भरली जाते तिथे भयभीत हुकुमशहाचा जन्म होतो हा इतिहास आहे आणि तशाच भयभीत हुकुमशहाचा जन्म पुन्हा एकदा पृथ्वीतलावर झाला, असे स्पष्टपणे अभ्यासक जेव्हा मोदींच्या कारकिर्दीकडे पाहून बोलतात तेव्हा हिटलरचा इतिहास आठवल्याशिवाय राहत नाही. यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जात असलं तरी इथं मात्र जसं नेतृत्व तसं कार्यकर्त्यांचं भ्याड कर्तृत्व राज्या राज्यात आता पहायला मिळत आहे. जेव्हा एक निश्‍चय एखाद्याच्या मनी स्थानबद्ध असतो आणि त्या निश्‍चयात हाव आणि स्वार्थ ठासून भरलेला असतो तेव्हा त्या निश्‍चयी माणसाच्या हातून सत्कार्यापेक्षा दुष्कृत्य अधिक होत असते आणि या दुष्कृत्याला दैवी शक्तीचा साज चढवला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीत देशभक्तीचा डांगोरा पिटवला जात असला तरी देशभक्तीची व्याख्या मात्र डांगोरा पिटवणार्‍यांना आणि या डांगोर्‍यांना साद घालणार्‍यांना नक्कीच माहित नाही. सर्वास पोटास लावणे’ ही इच्छा शक्ती आणि निश्‍चय सर्वश्रेष्ठ देशभक्तीचं लक्षण असतं मात्र इथं सर्वांची वाट लावणे हे धोरण आखलं जात असल्याने आज देशभरातला सर्वसामान्य विविध मार्गाने अडला-नाडला आणि पिळला जात आहे. अशा स्थितीत नेतृत्व म्हणून काम करणार्‍या लोकांना सत्तेची स्वप्न पडतात आणि
आम्ही स्वप्नाळू

असल्याचे गर्वाने छातीठोकपणे सांगतात तेव्हा त्यांच्यातील सत्तेची इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा हावरटपणा पुन्हा एकदा सिद्ध होतो. महाराष्ट्रच नव्हे तर उभा देश दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनाने मेटाकुटीला आलेला होता. यावर्षी कोरोना काही प्रमाणात संपुष्टात येत असताना महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट आलं. राज्यातील अनेके जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीचं पावसाच्या पाण्याने अक्षरश: होत्याचं नव्हतं केलं. पेट्रोल आणि डिझेलची इंधन दरवाढ असल्याने महागाईचा टेंभा प्रत्येकाच्या घरावर आहे. सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या लक्षणीय आहे. अशा संकटमय परिस्थितीतून राज्य सावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत की, राज्याची शासन-प्रशासन व्यवस्था अस्थिर करण्यासाठी आपली ताकद लावावी हे विरोधकांना अद्यापही समजलेलं नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजही आपण मुख्यमंत्री असल्याचा भास होतो. असं जेव्हा होतं तेव्हा तो मानसिक रोगी तर झाला नाही ना ही शंका आल्याशिवाय राहत नाही. परंतु केंद्र सरकार आणि दिल्लीचे तक्त सांभाळणारी मोदी-शहांची जोडी त्या पद्धतीने काम करते, त्यांची जी इर्षाभरी इच्छाशक्ती पहायला मिळते त्यातून त्यांचे कार्यकर्ते असेच स्वप्नाळू आणि इर्ष्येवर स्वार होणारे दिसतात. यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु एकीकडे देशाच्या संस्कार आणि संस्कृतीची भाषा करायची आणि दुसरीकडे सत्तेचा दुरुपयोग करून
हुकुमशाही
गाजवायची
हे धोरण जास्त काळ नक्कीच टिकत नाही. म्हणूनच देशातल्या बहुतांशी राज्यात सत्तेसाठी भाजपाने केलेली खेळी आणि हुकुमशाहीची गराळी ज्या पद्धतीने पश्‍चिम बंगालमध्ये कामाला आली नाही त्या पद्धतीने महाराष्ट्रातही ती कामाला येणार नाही हे दोन वर्षांच्या कालखंडात तीन पक्षांच्या सरकारने दाखवून दिले. सत्तेसाठी कुठल्या टोकाला भारतीय जनता पार्टी जाते हे जगात आता सर्वांना समजून आणि उमजून चुकले आहे. महाराष्ट्रात आपली सत्ता नाही याची खंत जेवढी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आहे तेवढीच मोदी आणि शहा यांना देखील असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र हा देशाचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. महाराष्ट्राकडे लढवय्या आणि कर्तृत्ववान म्हणून पाहितलं जातं. जेव्हा केव्हा या देशावर संकट येतं तेव्हा त्या संकटाचा सामना करण्यासाठी बुलंद महाराष्ट्राचा सह्याद्री छातीचा कोट करतो. इतिहास साक्षीला आहे, हिमालयाच्या मदतीला धावणार्‍या महाराष्ट्राने अखंड हिंदुस्तानचा अभिमान आणि स्वाभिमान सातत्याने जपला आहे. त्याच महाराष्ट्राच्या शासन प्रणालीला अस्थिर करण्या हेतू गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात स्वप्नाळू जगतात जगणार्‍या, अंगी इर्षा बाळगणार्‍या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नुमायंद्यांनी राज्यात ज्या पद्धतीने केंद्रिय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू ठेवला त्यावरून महाराष्ट्र आणि त्यात राहणारा व्यक्ती हा दिल्ली तक्ताला कधीही लखा लखा हलवू शकतो हे दाखवणारेच म्हणावे लागेल. भारतीय जनता पार्टी आणि तिची विचारसरणी ही विशिष्ट समुदायाला सर्वश्रेष्ठ मानत दुसर्‍याला अछूत पहाणारी असल्याचे आता समोर येत आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणार्‍या आणि ज्यांच्या पाठिशी समाज असणार्‍या नेतृत्वाने आता उघड बोलायला सुरुवात केली आहे. सत्याला खोटं खोटं बोलून असत्य ठरवण्याचा घाट काही काळ ठरू शकतो. परंतु सत्य ते सत्यच असतं, ते केव्हा ना केव्हा समोर येत असतं. ते आता या ना त्या मार्गाने समोर येत असून भारतीय जनता पार्टीचे खायचे दात आता उघडपणे दिसून येत आहेत. म्हणूनच अंतर्गत गटबाजी म्हणा अथवा पक्षांतर्गत वरचढपणा, मुख्यमंत्री पदाची लालसा किंवा लोकांच्या मनातले मुख्यमंत्री काहीही म्हणा, परंतु मदमत्सर, इर्ष्या आणि सत्तेची हाव ही कशी असते हे भारतीय जनता पार्टीच्या देशपातळीवरील नेतृत्वाकडून होत असलेल्या अधिकाराच्या गैरवापरातून पहायला मिळते. म्हणूनच या स्वप्नाळू भाजप नेतृत्वाला जेव्हा घरच्या
आहेरातून
खडेबोल

सुनावले जातात तेव्हा मात्र तथाकथीत देशभक्तीचा बुरखा फाटला जातो. आज महाराष्ट्र वेगवेगळ्या संकटांनी त्रासलेला आहे. एकीकडे नैसर्गिक संकट आहे दुसरीकडे महागाईचा भस्मासूर आहे, तिसरीकडे बेरोजगारी एखाद्या हडळीसारखी थयाथया नाचत आहे. लोक आर्थिकदृष्ट्या निसनागवे झाले आहेत. कुणाला अन्न-पाण्याची तर कुणाला निवार्‍याची गरज आहे आणि अशा स्थितीत राज्य भाजपाचे नेते गेल्या दोन वर्षांपासून राज्याचं सरकार पडावं यासाठी देव पाण्यात घालून बसतात तेव्हा पंकजा मुंडेंसारख्या नेत्या बीडमधूनच अशा नेत्यांना सुनावतात. ‘सरकार पडणार की नाही, यावरच सगळे अडलेले आहेत, विरोधी पक्ष सरकार रोज पडण्याचे मुहुर्त देत आहे, सत्ताधारी सरकार पडणार नाही, असे सांगत आहे, असे किती दिवस चालणार, आता तरी यातून बाहेर पडा’ विरोधी पक्ष आणि सत्ताधार्‍यांनी आपआपली भूमिका पार पाडली पाहिजे. त्यावर लक्ष दिले पाहिजे. असं म्हणत लोकांच्या प्रश्‍नाकडे, जनहित कामांकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले तेव्हा भाजपाचे सत्य आणि सत्तेची हाव त्याच पक्षाच्या एखाद्या नेतृत्वाकडून उभा महाराष्ट्र आणि देश जाणतो तेव्हा भाजपाचं स्वप्नाळू राजकारण उजेडात येतं. या
स्वप्नाळू
राजकारणात

भारतीय जनता पार्टीने मनुस्मृतीला प्रचंड महत्व दिल्याचे दिसून येते. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर नाहीतर मनुस्मृतीवर हा देश चालला पाहिजे ही जी भूमिका भाजपाच्या काही नेत्यांच्या वक्तव्यातून समोर येते तेव्हा त्यांचे स्वप्न स्पष्टपणे दिसून येते. म्हणूनच सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा भास होतो. भाजपाच्या या स्वप्नाळू जगतात बोटावर मोजण्याइतक्या धर्म आणि कर्म मार्तंडांना अनन्यसाधारण महत्व असेल परंतु हा देश धैर्याने, त्यागाने, बलिदानाने रक्ताचे तिलक लावून उभा राहिलेला आहे. तिथं कर्म आणि धर्म मार्तंडांना स्वप्नातलं मनुचं राज्य कधीच प्रस्थापित करता येणार नाही हेही तेवढच खरं, परंतु या स्वप्नाळू राजकारणातून आता भाजपाने बाहेर यावं आणि उभा भारत याची डोळा याची देही पाहत ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हे धोरण आखावं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!