मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत ३० हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील काही उर्वरित आमदार देखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अशी राजकीय स्थिती असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. आपण अत्यंत जबाबदारीने हे विधान करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बंडोखर आमदारांबाबात बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा त्या सर्व आमदारांची असेल. तर त्याआधी त्यांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं आणि त्यांची जी मागणी आहे, ती त्यांनी अधिकृतपणे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरें ंपुढे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल. पण आधी त्यांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी.”
बंडखोर आमदारांना उद्देशून त्यांनी पुढे म्हटलं की, “तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण सच्चे शिवसैनिक आहात, शिवसैनिक असल्याचं तुम्ही सांगता आणि शिवसेना सोडणार नाही असंही तुम्ही सांगता, मग मुंबईत या आणि आपली भूमिका मांडा. आमची भूमिका केवळ सध्याच्या सरकारविषयी आहे. पण महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही येथे येण्याची हिंमत दाखवा, उद्धव ठाकरेंसमोर या, आपली भूमिका मांडा, तुमच्या भूमिकेचा नक्की विचार केला जाईल. २४ तासांत परत या, हे मी जबाबदारीनं सांगतोय. मी हवेत भूमिका मांडत नाहीये, असंही राऊत यावेळी म्हणाले.