Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांच्या मदतीसाठी भाजप काळी दिवाळी साजरी करणार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत -आ....

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी भाजप काळी दिवाळी साजरी करणार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत -आ. लक्ष्मण पवार


बीड (रिपोर्टर)- यावर्षीच्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी नेस्तनाबूत झालेला आहे. राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या शासन आदेशानुसार सरकारने जी तुटपुंजी मदत जाहीर केलेली आहे तीही दिवाळीपुर्वी मिळणार नाही, त्यामुळे शेतकर्‍यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. आम्ही ही दिवाळी काळी दिवाळी साजरी करणार आहोत, सोबतच मी दिवाळीपर्यंत मदत मिळाली नाही तर उपोषण करील, असा इशारा आ. लक्ष्मण पवार यांनी दिला.


बीड जिल्हा भाजपाच्या वतीने येथील जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये आ. लक्ष्मण पवार हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आ. पवार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिलेल्या अहवालामध्ये ६३ मंडळापैकी ६१ मंडळात
अतिवृष्टी झाल्याचा अहवाल दिला आहे तर दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा अहवाल देताना ६ लाख ६८ हजार हेक्टरचे नुकसान दाखवण्यात आले आहे. कृषी विभागाच्या सर्वेनुसार १० लाख हेक्टरवर पेरणी झालेली असताना शासनाच्या या अहवालात विसंगती आहे. राज्य प्रशासनाचे कृषी सहायक आणि तलाठी हे घरी बसून पंचनामे करतात. प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधावर प्रशासनाचे अधिकारी जात नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत करताना सरसकट मदत करावी, जी तुटपुंजी मदत केलेली आहे या तुटपुंज्या मदतीवर शेतकर्‍यांचे कोणतेही भले होत नसून किमान ही मदत हेक्टरी ३८ ते ४० हजार दरम्यान करावी, शासन आदेशामध्ये नदीकाठच्या ज्या शेती खरडून गेलेल्या आहेत अशा शेतकर्‍यांचे भविष्यातही कधी नुकसान भरून येणार नाही इतके नुकसान झाले आहे. रस्ते आणि पुलही वाहून गेेले आहेत याचा कुठलाच उल्लेख सरकारने केलेला नाही. त्यामुळे यावर्षीची दिवाळी शेतकर्‍यांना काळी दिवाळी साजरी करावी लागणार आहे. सोबतच आम्ही ही दिवाळी विना फटाके आणि विना दिवे लावता काळी दिवाळी साजरी करू. दिवाळीपर्यंत सरकारने मदत केली नाही तर मी स्वत: उपोषण करेल. भाजपच्या वतीनेही संपुर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या पद्धतीने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आंदोलनाचा लढा तिव्र केला जाईल, असेही आ. पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, राज्य सचिव प्रा. देवीदास नागरगोजे, शहराध्यक्ष भगीरथ बियाणी हे उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!