Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रहिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

मुंबई:ऑनलाईन रिपोर्टर
‘हिंदुत्व हे अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्टी अशी सोडता येत नाही. हिंदुत्वाचंही तसंच आहे. सोडून द्यायला ते काही धोतर नाही,’ असा जोरदार टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हाणला. (Uddhav Thackeray slams BJP over Hindutva in Saamana Interview)

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं ‘सामना’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलते होते. राज्यात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू करताना मंदिरं उघडण्याची मागणी भाजपनं लावून धरली होती. त्यासाठी राज्यात आंदोलनंही करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं होतं. हिंदुत्व सोडून ‘सेक्युलर’ झालात का, असा प्रश्नही राज्यपालांनी केला होता. ‘सामना’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं.

‘मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. देवळात घंटा बडवणारा नव्हे तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू त्यांना हवा होता. ते ९२-९३ साली त्यांनी करून दाखवलं. पूर्ण बहुमताचं सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची यांची (भाजपची) हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळं झालं. त्यामुळं आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं हे हिंदुत्व आहे काय? त्यानं करोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्यामुळं निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व शिकवू नका. तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व नकोच,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

शरद पवार कमी उंचीचे नेते?, उद्धव ठाकरे म्हणतात…

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक विधान केलं होतं. त्या राजकीय विधानावरून बराच राजकीय वाद रंगला. पाटील यांनी पवारांविषयी केलेल्या विधानाबद्दल संजय राऊत यांनी अभिनंदन मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांचं मत जाणून घेण्यासाठी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.

“शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत…प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शनसुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपाचे नेते सांगताहेत की, ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”होय, आता त्यांना ८० वर्षे पूर्ण होत आहेत. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही… ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. हा महाराष्ट्राचासुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात!,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!