गणेश सावंत
मो. नं. 9422742810
मुलगा बापाला म्हणतो, बाबा मला राजकारणात जायचयं, मला राजकारण शिकवा, तेव्हा बाप मुलाला म्हणतो, ‘घराच्या सातव्या मजल्यावर जा, मग सांगतो तुला काय करायचे,’ मुलगा सातव्या मजल्यावर जातो, गॅलरीत उभा राहतो, बाप म्हणतो, ‘सातव्या मजल्यावरून उडी मार, मी तुला खाली झेलतो’ मुलाला बापावर प्रचंड विश्वास असतो, बापाच्या सांगण्यावरून मुलगा सातव्या माळ्यावरून उडी मारतो, बाप त्याला झेलण्यासाठी हात पुढे करतो मात्र मुलगा जसाच पहिल्या मजल्यापर्यंत येतो त्याक्षणी बाप हात काढून घेतो. मुलगा ढोपरावर आदळतो, जखमी होतो, त्या अवस्थेत मुलगा बापाला म्हणतो, ‘बाबा तुम्ही असं का केलं? त्यावर बाप म्हणतो, ‘तुला राजकारण शिकायचं ना, तर राजकारणातला पहिला आणि शेवटचा धडा राजकारणात बापावरही विश्वास ठेवायचा नाही’ याचे ज्वलंत उदाहरण सध्या शिवसेनेत घडताना दिसून येतय. ज्या पक्षाने जन्म दिला, करंगळीला धरून मोठं केलं, रिक्षावाल्याच्या हातात शिवबंधन बांधलं, ज्याच्या डोक्यावर रिक्षाचा छत होता त्याच्या डोक्यावर लाल दिवा दिला त्यानेच जन्मदात्या पक्षाचा विश्वासघात केला. म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल आपल्या भाषणात
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
ही मराठमोळी म्हण म्हणवून दाखवत त्यामागची कथा सांगितली. झाडावर कुर्हाडीने वार होतात, याचे दु:ख झाडाला नसते मात्र ज्या कुर्हाडीला दांडा असतो तो त्याच झाडाचा असतो आणि त्या दांड्याच्या सहाय्याने कुर्हाड झाडावर वार करते याचे प्रचंड दु:ख झाडाला होत असते. ते दु:ख शब्दबद्ध करत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं….सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं…. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,,, असं तोंडावर सांगावं, माझ्या सहकार्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत… तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन, हे ठणकावून सांगितलं. कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण हे भाषण नव्हतं तर सह्याद्रीच्या पालकाचं हृदयातून महाराष्ट्राबद्दलचं आणि शिवसेनेसह शिवसैनिकांबद्दलचं प्रेम बोलत होतं. म्हणूनच मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर
वर्षा सोडण्याच्या निर्णयावर पुष्पवृष्टी
चा प्रसंग अभूतपुर्वच. महाराष्ट्राला उद्देशून मुख्यमंत्री बोलले आणि मुख्यमंत्रीपद असताना मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान सोडणारे ठाकरे पहिले मुख्यमंत्री ठरले. कालची ठाकरेंची भूमिका ही महाराष्ट्राला पचली. शिवसेनेतल्या बंडखोर शिंदेशाहीने त्यांच्यावर ही वेळ आणली हे एकीकडे बोलले जात असताना ठाकरेंचं पुरतं वस्त्रहरण झालं या प्रतिक्रिया येत असताना उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राचं केलेलं नेतृत्व आणि त्या नेतृत्वानंतर सत्तेचा कुठलाही मोह नसल्याचे आपल्या वर्षा सोडण्याच्या निर्णयातून दाखविलेलं दातृत्व हे महाराष्ट्रातील जनतेला मोहून सोडणारं ठरलं. एखादा मुख्यमंत्री बाहेर पडतं, पक्षप्रमुख शासकीय निवासस्थान सोडतो त्यावेळी त्याच्यासोबत सत्तेची उब घेणारा कोणीही नसतो, असतो तो केवळ सर्वसामान्य शिवसैनिक. ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या गगनभेदी घोषणा अन् फुलांचा वर्षाव बरच काही सांगून जातो. उद्धव ठाकरेंनी नुसतं मुख्यमंत्री पदच नाही तर पक्षप्रमुख पदही सोडण्याची तयारी दाखविली. असं प्रेम शिवसैनिक आणि एखाद्या पक्षप्रमुखात कधीही दिसून आलेलं नव्हतं. अशा स्पष्ट प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहेत. या प्रतिक्रिया असल्या तरी सत्य स्वीकारावा लागेल. शिवसेना ही तुटली, फुटली आणि खुळखुळी झाली. सत्ताकारणामुळे आणि
ईडीच्या दट्ट्यापुढे
अनेक कडवट शिवसैनिकांनी कंबरेचंही सोडून टाकलं, मग ते कंबरेचं फडकं पुढं डोक्याला बांधायचं की त्या फडक्याचा भाजपाशी ‘संग’ करून त्यांच्यासोबत सत्तेची सेज सजवायची हे पुढे दिसूनच येईल. एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली, सोबत अनेक आमदार, मंत्रीही गेले. हे केवळ हिंदुतत्वासाठी गेले, असा आव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्राच्या जनतेला हे पटेल काय? हिंदुत्वाविषयी एवढेच प्रेम होते तर मग अडीच वर्षे ‘काशी’का केली नाही? शिवसेनेत असताना अयोध्येत तर गेले अन् अयोध्येतून आल्यानंतर काशीची आठवण व्हावी, एवढे समजायला महाराष्ट्रातली जनता दुधखुळी नाही. आम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही ही शिंदेशाहीची भूमिका अडीच वर्षे डोक्यावर लाल दिवा घेऊन फिरणार्यांना का समजले नाही? ठीक आहे पक्षाचा निर्णय होता, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा परंतु पद घ्यायचं की नाही हा निर्णय तर स्वत:कडे होता ना हिंदुत्वासाठी मंत्रिपद नाकारून हिंदुत्वाचा स्वाभिमान तेव्हाही दाखवता आला असता परंतु धादांत खोटारडेपणा या वक्तव्यातून दिसून येतो. केंद्रस्थानी असलेल्या भाजपाने ज्या पद्धतीने सत्ताकारणासाठी लचके तोडण्यास केंद्रीय संस्थांचे लांडगे बाहेर सोडले. त्यामुळेच हा हिंदुत्वाचा पुळका म्हणावा लागेल. भावना गवळी, प्रताप सरनाईक, प्रशांत जाधव यासह अन्य जे सुरत दाखवायला गुवहाटीला गेले त्यांचा गेल्या दोन वर्षाचा इतिहास तपासला की लक्षात येते. राजकारणामध्ये बापावरही विश्वास ठेवायचा नाही हा धडा प्रत्येकाने गिरवलेला असतो परंतु त्या धड्याचा योग्य वापर करताना अन्य पक्षांना यश येत नाही ते या भाजपाला येतय. म्हणूनच जेव्हा
सेनेने भाजपाची साथ सोडली
तेव्हाच भाजपेयींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. परंतु ही आग ओकताना त्याच्या झळा नेमक्या लोकांनाच लागल्या पाहिजेत, काहींना त्याची झळही लागणार नाही याची दक्षता भाजपाने आधीच घेतली. महाराष्ट्रात हातची सत्ता घेतली तेव्हाच राज्यातलं हे सरकार अस्थिर करायचं, कुठल्याही परिस्थितीत ते पाडायचं हा मनसुबा घेऊनच भाजप गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात अनेक मंत्र्यांवर आरोप करण्यात आले, ईडीचे छापे मारण्यात आले, अनेकांना आतमध्ये जावे लागले, अनेकांच्या चौकश्या सुरू आहेत. नगरविकास मंत्रालयसारखं मलाईदार खातं एकनाथ शिंदेंकडे आहे या खात्यात कधी भ्रष्टाचार झालाच नाही, लाखो-करोडो रुपयांचं हे खातं जणू राजा हरिश्चंद्रच चालवतो, या पद्धतीने या खात्याकडे भाजपाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केलं, किरीट सोमय्यासारख्या आरोपांचा पिटारा घेऊन बसलेल्या व्यक्तीनेही कधी एकनाथ शिंदेंवर आरोप केला नाही. याचाच अर्थ हे काल-परवाचं बंड नव्हतं, बंडासाठी केव्हाच पेरा सुरू झाला होता. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात त्या पेर्याचं पीकही बहारदार आलं होतं. आता फक्त राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत ते बंडाचं पीक भाजपाच्या नेत्यांना खुडून नेता आलं.
बेभरवशाचा राजकारण
हे काही आजचं नाही. केंद्रस्थानी असलेले आजच काही राज्या राज्यांना त्रास देत नाही, इंदिरा गांधींच्या काळातही जो केंद्राच्या विरुद्ध बोलेल, जे नेतृत्वाच्या विरुद्ध बोलेल, त्याची घुसमट कशी होईल, याची काळजी घेतली जायची. फरक एवढाच आता घुसमटच नाही तर अक्षरश: त्याचा नाक-तोंड दाबून राजकीय जीव जाईपर्यंत बुक्क्यांचा मारा भाजप वेगवेगळ्या संस्थांकडून देत आला आहे, शिवसेना फोडण्यामागे भाजपाला यश आले, शिवसेना फोडली हे त्रिवार सत्य स्वीकारताना ती फोडण्यासाठी ज्या यंत्रणेचा वापर करण्यात आला अथवा येतोय, त्यामुळे राजकारण आणखीच बेभरवशाचं होतोय. लोकशाहीवर बलात्कार होतोय, तिचे वस्त्रहरण होतेय हेही सत्य स्वीकारावे लागेल. शिवसेना फुटली, की फोडली यापेक्षा देशातले सत्ताधारी ज्या पद्धतीने एखादा पक्ष फोडण्यासाठी तपासी यंत्रणेचा उपयोग करून घेतायत तो देशाचे भवितव्य अंधाराच्या दिशेने घेऊन जाणारा म्हणावा लागेल. शेवटी हा देश लोकशाहीवर चालतो, भारतीय संविधानावर चालतो तेवढाच लोकांच्या प्रेमावर आणि बलिदानावर उभा राहतो. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जात्यात दिसतात आणि शिवसेनेकडून निवडून आलेले सुपात आहेत, हे झालं पक्षापुरतं. महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रातील जनतेचं काय? तिथल्या मुलभूत सुविधांचं काय? याचाही विचार व्हायला हवा आणि राजकारणामध्ये पहिला आणि शेवटचा धडा गिरवताना बापावरही विश्वास ठेवायचा नाही हा धडा आता स्वीकारावा लागला.