बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा परिषदेने 538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून ही भरती प्रक्रिया एका खासगी कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी जवळपास 21 हजार विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी अर्ज दाखल केले असून परीक्षा शुल्कापोटी बीड जिल्हा परिषदेला 1 कोटी 90 लाखांचा घसघशीत निधी जमा झालेला आहे.
परीक्षा शुल्कासाठी वारंवार विद्यार्थ्यांनी इतके मोठे शुल्क का?अशी ओरड केली मात्र राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1 हजार आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 900 रुपये शुल्क आकारले जाते. बीड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रीकी सहायक असे विविध 538 पदांसाठी ही भरती प्रक्रिया खासगी कंपनीच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली असून परीक्षा शुल्कापोटी बीड जिल्हा परिषदेला 1 कोटी 90 लाख रुपये जमा झालेले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी बीड जिल्हा परिषदेने काही पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र ती काही कारणास्तव रद्द झाली होती.