मंत्र्यांच्या रोषाचे लोण आमदारांच्या दारापर्यंत
आरक्षणाच्या पाठींब्यासाठी आ. मुंदडांच्या दारात 11 गावांचा ठिय्याचा इशारा
अमजद पठाण । नेकनूर
नेकनूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून उभ्या महाराष्ट्रात वणवा भडकलेला दिसून येत असून मराठ्यांच्या रोषाला मोठमोठ्या नेत्यांसह मंत्र्यांना सामोरे जावे लागत आहे. शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांना जाब विचारल्यानंतर आता गावगावचे समाज बांधव मराठा आरक्षणाच्या पाठींब्यासाठी थेट आमदाराच्या दारात ठिय्या मांडणार असल्याचे केज विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे. आज सकाळी केज मतदारसंघातल्या तब्बल 11 गावची बैठक कळसंबर येथे झाली. या बैंकीत आ. नमिता मुंदडा यांच्या पाठींब्यासाठी बारा सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेतल्याने मंत्र्यांपाठोपाठ आता राज्यभरातल्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे धाबे दणाणले आहेत.
15 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे सराटे अंतरवलीत आमरण उपोषण करत आहेत. दरम्यानच्या काळात त्याठिकाणी पोलिसांकडून लाठीमार झाला, गोळीबार झाला. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटूएन जाळपोळ झाली. त्यानंतर या आंदोलनाचा भडका अधिकच उडाला. महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार हे सराटे अंतरवलीत गेले तेव्हा त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. अजित पवारांनाही मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. देवेंद्र फडणविसांविरुद्ध तर समाज आक्रमक आहे. हरीभाऊ बागडेंना सवाल विचारण्यात आला. माजी मुक्यमंत्री अशोक चव्हाण यांना भर कार्यक्रमात अडवून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पोलीसांच्या सुरक्षेत त्यांना सभास्थळावरून बाहेर जावं लागलं. प्रशांत बंब यांनाही मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यासह अन्य नेते समाजाच्या रोषावर असून आता गावगावचे मराठे आपल्या आमदारांना जाब विचारण्यासाठी तयार आहेत. आज केज तालुक्यातील मांडवखेल, वडगाव क., सोनपेठवाडी, भंडारवाडी, रत्नागिरी, जैतळवाडी, नेकनूर, आनंदवाडी, येळंब घाट, वळेवाडीसह अन्य काही गावच्या नागरीकांनी
कळसंबर येथे एकत्रित येऊन बैठक घेतली. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा द्यावा नसता उद्या 12 सप्टेंबर रोजी नमिता मुंदडांच्या दारात ठिय्या मांडणार असल्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला. समाजाची आक्रमकता पाहता सत्तेतील नेते समाजासमोर जाण्यास धजत नसताना आता मराठ्यांनी आमदारांना टार्गेट केले अहे.