न.प.गटनेते अस्लम कुरेशी यांचे 50 हजार चोरीला गेले
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खात्यात पैसे भरण्यासाठी गेलेल्या नगरपंचायतीचे गटनेते अस्लम कुरेशी हे पैसे भरण्याची स्लिप भरत असतांना त्या ठिकाणी बाजूला ठेवलेल्या एकूण 84 हजार रुपयांपैकी 50 हजार रुपयांवर एका अज्ञात अल्पवयीन चोरट्याने डल्ला मारल्याची घटना काल दि. 20 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी बाजारच्या दिवशी सकाळी 10:30 ते 11 वाजताच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वडवणी शाखेत घडली असून आता जर बँकेतून ग्राहकांच्या पैशांची चोरी होत असेल तर या संपूर्ण बँकेची सुरक्षा रामभरोसे असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांतून उमटत होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी येथील रहिवासी तथा नगरपंचायतीचे गटनेते अस्लम अन्सार कुरेशी हे काल दिनांक 20 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजारातून शेळी विक्री करून आलेले पैसे 84 हजार रुपये ही रक्कम खात्यावर भरण्याकरिता स्टेट बँक ऑफफ इंडियाच्या वडवणी शाखेत गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पैसे भरण्यासाठी स्लिप घेतली व स्लिप भरत असताना त्यांनी आपल्या जवळील 84 हजार रुपये त्याठिकाणीच स्लिप लिहिण्याच्या काउंटरवर बाजूला ठेवले.
त्यांनी त्यांची स्लिप भरली मात्र त्याचवेळी त्यांच्या ओळखीच्या एक महिला आल्या व त्यांनीही त्यांची स्लिप भरून देण्याची विनंती केली. त्यानंतर अस्लम कुरेशी यांनी सदरील महिलेची स्लिप भरून दिली व त्यानंतर त्यांनी त्यांचे ठेवलेले पैसे घेण्यासाठी पाहिले असता त्या ठिकाणी 84 हजार रुपयांपैकी केवळ 34 हजार रुपयेच असल्याचे आढळून आले. 50 हजार रुपयांचे एक बंडल दिसेनासे झाले. त्यांनी लागलीच आजूबाजूला पाहिले वयाविषयी अनेकांना विचारणा केली मात्र कोणीही त्या चोरट्याला पाहिले नसल्याचे सांगितले.
याबाबत त्यांनी तात्काळ बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना कल्पना दिली व त्यानंतर वडवणी पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडवणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गु.र.नं. 243 / 2023 कलम 379 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या सर्व चोरीच्या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज वडवणी पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतला असून त्यामध्ये एक अल्पवयीन चोरटा सदरील चोरी करत असतांना दिसत आहे. वडवणी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. आता जर बँकेतून ग्राहकांच्या पैशांची चोरी होत असेल तर या संपूर्ण बँकेची सुरक्षा रामभरोसे असल्याची प्रतिक्रिया उपस्थित ग्राहकांतून उमटत होती.