शिवसेना कोणाची? सोमवारी सुनावणी; शरद पवारांचे आमदार-खासदार अजित दादांच्या गळाला
मुंबई (रिपोर्टर)- महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हिट वाढताना दिसून येत असून शिवसेना कोणाची? यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावणी दरम्यान बोलावण्याची दाट शक्यता आहे. सुप्रीम कोेर्टाने फटकारल्यानंतर या प्रकरणात हालचाली पहावयास मिळत असतानाच काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीवारी करून आल्याने या निर्णयाबाबत आणखी काय पहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच तिकडे राष्ट्रवादीतही काका-पुतण्यात वरचढपणा पहावयास मिळत आहे. शरद पवारांच्या गटाचे एक खासदार आणि एक आमदार अजितदादांच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी (21 सप्टेंबर) दुपारी नवी दिल्लीला गेले. त्यानंतर या दिल्ली भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच राहुल नार्वेकरांनी दिल्लीत कुणाला भेटले आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (22 सप्टेंबर) दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
राहुल नार्वेकर म्हणाले, काही भेटीगाठी कायदेतज्ज्ञांबरोबर होत्या. एकूण अपात्रतेबाबतचा हा कायदा बदलत जाणारा आहे. त्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार या कायद्यात बदल होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे त्याबाबत आलेले आदेश किंवा या कायद्यात आणखी काय दुरुस्ती करण्याची गरज आहे किंवा या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणं आवश्यक आहे या संदर्भातील अनेक विषयांवर माझी अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली.
काका-पुतण्यात लोकप्रतिनिधींची ओढाताण
कायदेशीर लढाईतही दोघे सतर्क
दोन गट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांनी आपापले म्हणणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडले असून, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सुनावणी होणार आहे. यातच शरद पवार गटातील एक आमदार आणि एक खासदार अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा असून, या दोन बड्या नेत्यांनी अजित पवार गटाला समर्थनपत्रही दिल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे कायदेशीर लढाईतही दोघे सतर्क झाल्याचे पहावयास मिळत असून अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे याचीका गेली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यानंतर आमदार, खासदार, नेते मंडळींना वळवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शरद पवार गटाकडील दोन बडे नेते अजित पवार गटात जाणार असून, या दोन्ही नेत्यांनी अजित पवार गटाला समर्थन पत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.
अजित पवार गटाला समर्थन देणार आमदार-खासदार कोण?
राष्ट्रवादीतील या आमदार आणि खासदाराने अजित पवार गटाला समर्थन देत असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. अजितदादांना समर्थन देणारे ते आमदार आणि खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार यांना लोकसभेतील खासदार अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील यांचा पाठिंबा आहे. तर राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान या शरद पवार गटात आहेत. या चार खासदारांपैकी समर्थन देणारा तो खासदार कोण? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पार पडलेल्या शपथविधीवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा शरद पवार गटाकडे आले.