माजलगाव (रिपोर्टर)- ‘आमच्या मागण्या मान्य करा नसता खुर्च्या खाली करा,’ ‘या जुल्मी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय,’ ‘पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ ‘बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा’, या घोषणांसह शेतकर्यांनी आज अंबाजोगाईत जनआक्रोश करत प्रचंड घोषणाबाजी केली. तर इकडे माजलगावमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरभरती व सरकारी शाळांचे खासगीकरण थांबवावे, सामाजिक आरक्षण व विद्यार्थी हक्कासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळीस्थिती निर्माण असताना शेतकर्यांना पीक विमा अद्याप देण्यात आला नाही. शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
कंत्राटी पद्धतीने नोकरभरती व सरकारी शाळांचे खासगीकरण थांबवावे, सामाजिक आरक्षण व विद्यार्थी हक्कासाठी महाविकास आघाडीने आज माजलगाव शहरात मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. हा मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दत्ता कांबळे, महावीर मस्के, मालुजीराव गलांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. तर तिकडे शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी अंबाजोगाईत आज शेतकर्यांचा मोर्चा निघाला. या मोर्चाला सर्व पक्षातल्या नेते-पदाधिकार्यांनी उपस्थिती दर्शवत समर्थन दिले. बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना अंबाजोगाईसह जिल्ह्यातील शेतकर्यांचा जुना पीक विमा अद्याप सरकारने दिला नाही. तो पीक विमा तात्काळ शेतकर्यांना द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नसता खुर्च्या खाली करा, ‘या जुल्मी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’, ‘पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, अशा घोषणांनी अंबाजोगाई शहर दणाणून गेलं.
हा मोर्चा अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. या वेळी शेतकरी नेते कालीदास आपेट, कॉ. अजय बुरांडे, भाई गंगाभीषण थावरे, गणेश पवार, यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.